यावेळच्या महाकुंभात अनेक साध्वी आणि साधू वेगवेगळ्या कारणांनी प्रसिद्ध होत आहेत. यापैकीच एक नुकतीच प्रसिद्ध झालेली साध्वी म्हणजे अभिनेत्री ममता कुलकर्णी. सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री ममता कुलकर्णी आता महाकुंभमेळ्यात दाखल झाली आहे. ममता आता गृहस्थाश्रम जीवनातून निवृत्त होऊन संतांचे जीवन जगणार आहे. शुक्रवारी भगवे कपडे परिधान करून ममता कुलकर्णी महाकुंभाच्या सेक्टर क्रमांक 16 मध्ये असलेल्या किन्नर आखाड्याच्या शिबिरात पोहोचली. तिचा येथे पट्टाभिषेक झाला . ममता कुलकर्णी हिच्या येण्याची बातमी कळताच नागरिकांची यावेळी मोठी गर्दी झाली होती. अध्यात्मिक मार्गाचा अवलंब करून, ममता हिने प्रयागराज येथे आयोजित महाकुंभ 2025 मध्ये किन्नर आखाड्यात संन्यासाची दीक्षा घेतली. तिने किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर ही पदवी देऊन गौरवण्यात आले आहे.
किन्नर आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी डॉ.लक्ष्मी नारायण त्रिपाठी आणि जुना आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी जय अंबानंद गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली ममता कुलकर्णी महामंडलेश्वर झाल्या आहेत. शुक्रवारी दुपारी ममता हिने संन्यासाची दीक्षा घेऊन संगमच्या काठावर पिंडदान केले. यासोबतच तिचे नावही आता बदलण्यात आले आहे. महामंडलेश्वर बनण्यासोबतच ममता कुलकर्णी ‘ श्री यमाई ममता नंद गिरी’ या नावाने ओळखल्या जाणार आहेत.
ममता कुलकर्णी महाकुंभ मेळ्यात पोहोचली तेव्हा स्वामी महेशद्रानंद गिरी देखील येथे मुक्कामी होते. यावेळी त्यांनी किन्नर आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांची भेट घेतली.त्यांच्यासोबत जुना आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी जय अंबानंद गिरी हेही उपस्थित होते. ममता कुलकर्णी हिने आचार्य महामुदलेश्वर यांच्याशी महाकुंभाबद्दल चर्चा केली. महाकुंभमेळ्याचे कौतुक केले. व्यवस्था अतिशय उत्तम असल्याचे सांगितले. आखाड्यात जाऊन संतांचे आशीर्वादही घेतले. अभिनेत्रीने गंगेत स्नान केले.

दीक्षा घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना तिने म्हटले की, ” माझे चाहते माझ्यावर नाराज आहेत. परंतु देवाची सेवा करण्यासारखे दुसरे काही पुण्याचे काम नाही. सर्वात महत्त्वाचे तेच आहे.”
ममता कुलकर्णीचा चित्रपट प्रवास :
ममता कुलकर्णीने 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नन्नाबर्गल’ या तमिळ चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. एका वर्षानंतर, 1992 मध्ये, तिने बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. ‘मेरा दिल तेरे लिए’ हा तिचा पहिला हिंदी चित्रपट होता. तिला खरी ओळख 1995 मध्ये रिलीज झालेल्या ‘करण अर्जुन’ या चित्रपटातून मिळाली, ज्यामध्ये ती सलमान खानसोबत दिसली होती. राकेश रोशनच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात काजोल आणि शाहरुख खानही दिसले होते. ममता आजही या चित्रपटासाठी ओळखली जाते.
त्यानंतर ममताने ‘नसीब’, ‘सबसा बड़ा खिलाडी’, ‘वक्त हमारा है’, ‘घातक’ यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, त्यानंतर तिचे नाव ड्रग्ज प्रकरणात समोर आले. तिचे नाव डॉन विकी गोस्वामीसोबत जोडले गेले, त्यानंतर ती चित्रपटांपासून दूर गेली.
हेही वाचा : Rapper Emiway Bantai : प्रसिद्ध रॅपर एमीवेची न्यू इनिंग? बंटाय अडकला लग्नबेडीत
Edited By – Tanvi Gundaye