घरमनोरंजनमन सुद्द तुजं, गोस्ट हाय प्रिथ्वीमोलाची!

मन सुद्द तुजं, गोस्ट हाय प्रिथ्वीमोलाची!

Subscribe

चित्रपटसृष्टीमध्ये ज्यांची हमखास दखल घ्यावीच लागते असे व्यक्तिमत्व म्हणजे ‘शांताराम वणकुद्रे’ म्हणजेच चित्रपती व्ही. शांताराम. सिनेमा हे माध्यम खऱ्या अर्थाने कळलेल्या काही निवडक ‘फिल्म मेकर्स’मध्ये शांताराम बापूंचे नाव येते. चित्रपट माध्यमातून नवे विचार, नवे प्रयोग आणि त्यांना लाभलेली प्रतीकात्मकतेची जोड, ही शांताराम बापूंची खासियत होती. यावरही ‘सोने पे सुहागा’ म्हणजे कथेतील आशयघनता, दृश्यात्मक सौंदर्याच्या माध्यमातून अधिकाधिक भव्य करत नेणे त्यांना चांगलेच जमले होते. त्यांनी निर्माण केलेली कलाकृती तांत्रिक दृष्ट्या संपन्न करण्याचा अधिकाधिक प्रयत्न ते करत. जेमतेम प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेल्या शांताराम बापूंचे भारतीय चित्रपट सृष्टीला मोलाचे योगदान आहे.

१८ नोव्हेंबर म्हणजे शांताराम बापूंचा वाढदिवस. शांताराम बापूंचा जन्म १८ नोव्हेंबर १९०९ साली कोल्हापूर येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये झाला. वडील राजारामबापू यांचे हुबळीमध्ये एक छोटेसे हॉटेल होते. घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच होती त्यामुळे शांताराम बापूंना त्यांचे शालेय शिक्षण अर्धवट सोडावे लागले. शांताराम बापू वडिलांच्या हॉटेलमध्ये कपबशा विसरण्याचे काम करायचे. प्रसंगी त्यांनी रेल्वेमध्ये गड्याचेही काम केले आहे.अशातच त्यांनी ‘बालगंधर्व नाटक मंडळी’मध्ये प्रवेश मिळवला. वयाच्या १९ व्या वर्षीच ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’पासून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. तिथेच ‘सुरेखाहरण’ या मूकपटाच्या माध्यमातून ते श्रीकृष्णाच्या भूमिकेत पडद्यावर अवतरले. या मूकपटाचे दिग्दर्शन शांताराम बापूंचे मावस भाऊ बाबूराव पेंटर यांनी केले होते. शांताराम बापू बाबूराव पेंटर यांच्यासोबत त्यांचे सहाय्यक म्हणून काम सांभाळत होते. या दरम्यान चित्रपट कंपनीत पडेल ते काम करण्याची त्यांची तयारी होती. तिथेच ते हळूहळू चित्रपटाचे तंत्र ते शिकत गेले.

- Advertisement -

१९२५ साली त्यांनी ‘सावकारी पाश’ या मराठी चित्रपटातून एका तरुण शेतकऱ्याची भूमिका केली, तर ‘नेताजी पालकर’या मूकपटाच्या माध्यमातून त्यांनी दिग्दर्शनामध्ये प्रवेश केला. नऊ वर्षे बाबूराव पेंटर यांच्याकडे नोकरी केल्यानंतर काही सहकाऱ्यांबरोबर भागीदारीत ‘प्रभात फिल्म’ ही चित्रपटनिर्मिती करणारी संस्था त्यांनी उभी केली. प्रभातचा पहिला मराठी बोलपट १९३२ साली प्रदर्शित झाला. त्याचे नाव होते ‘अयोध्येचा राजा’. असे म्हटले जाते की, त्यानंतरच दुसऱ्या वर्षी व्ही शांताराम यांनी एक वेगळे धाडस केले. ‘सैरंध्री’ नावाचा भारतातील सर्वात पहिला रंगीत चित्रपट त्यांनी बनविला. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा तो प्रयत्न फसला, ज्यामध्ये प्रभातला खूप नुकसान सहन करावे लागले. १९२९ ते १९३२ या दरम्यान प्रभातने एकूण सहा मूकपट निर्मित केले. त्यातील पाच मूकपट शांताराम बापूंनी दिग्दर्शित केले होते.

शांताराम बापूंचा चित्रपट निर्मितीचा ध्यास एवढा होता की, ते कोणत्याही संकटाने डगमगले नाहीत. प्रयोगांवर प्रयोग करतच राहिले. १९३७ साली त्यांची निर्मिती असलेला ‘संत तुकाराम’ याची दखल थेट साता समुद्रापार घेण्यात आली. तो ‘व्हेनिस’ चित्रपट महोत्सवांमध्ये दाखवण्यात आला. भारताबाहेर गेलेला हा पहिलाच चित्रपट… त्याची मुहूर्तमेढ शांताराम बापूंनी केली. चित्रपट हे कलेचे आणि मनोरंजनाचे माध्यम तर आहेच पण त्यातून समाजाला योग्य तो संदेशही दिला जाऊ शकतो ही समाजाभिमुख दृष्टी शांताराम बापूंकडे होती. म्हणूनच एकीकडे ऐतिहासिक पौराणिक चित्रपटांची चलती असतानाच दुसरीकडे कुंकू, माणूस, शेजारी असे सामाजिक संदर्भ असलेले चित्रपट त्यांनी बखुबी निर्माण केले.

- Advertisement -

१९४२ साली प्रभात कंपनीमधून बाहेर पडलेल्या शांताराम बापूंनी पुढे ‘राजकमल कलामंदिर’ ही स्वतःची चित्रपट संस्था उभी केली. त्यांनी ‘राजकमल कलामंदिर’ हे नावच मुळात वडील राजारामबापू मधील ‘राज’ आणि आईचे नाव ‘कमल’ यांच्या संयोगातून प्रेरित होऊन ठेवले होते.

राजकमलच्या माध्यमातून दर्जेदार चित्रपटांची निर्मिती तर झालीच परंतु अनेक नामवंत कलाकार शांताराम बापूंनी विविध चित्रपटांमधून पेश केले. चित्रपट निर्मितीची त्यांची स्वतःची एक वेगळी शैली निर्माण झाली होती. अमर भूपाळी, दो आँखे बारह हाथ, नवरंग, पिंजरा अशा चित्रपटांमधून ती शैली अधिक उठून दिसते.

डॉक्टर कोटणीस यांच्या जीवनावर आधारित ‘डॉक्टर कोटणीस की अमर कहानी’ आणि ‘दो आँखे बारह हाथ’ या चित्रपटांमधून त्यांनी स्वतः नायकाची भूमिका केली होती. ‘दो आँखे बारह हाथ’ला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता. त्यांचा पिंजरा हा १९७२ साली प्रदर्शित झालेला सिनेमा मराठीतला पहिला संपूर्ण रंगीत सिनेमा होता. त्यांच्या ‘अमृतमंथन’ या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदाच ‘क्लोजअप लेन्स’चा वापर केल्याची नोंद आहे. ‘चंद्रसेना’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी त्यांनी पहिल्यांदा `ट्रॉली’चा वापर केला होता . भारतीय चित्रपटात पहिल्यांदाच ऍनिमेशनचा वापर केला तोही शांताराम बापूंनीच… `बॅक लिट’ प्रोजेक्शनचा वापर करणारे ते पहिले दिग्दर्शक होते असे जाणकार सांगतात. चित्रपट निर्मिती करत असताना शांताराम बापू अतिशय कडक शिस्तीचे होते. कलाकारांवर तर त्यांची नजर असायचीच, परंतु तंत्रज्ञावरही त्यांचा तेवढाच वचक होता.

व्ही. शांताराम यांनी फक्त चित्रपटाबाबतच नव्हे, तर चित्रपटसृष्टीसाठीही काही महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. फिल्म ऍडव्हायझरी बोर्ड, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सेंसोर या संस्थांचे अध्यक्षस्थान त्यांनी काही काळ सांभाळले होते. भारतीय निर्मात्यांची संस्था ‘इम्पा’ आणि भारतीय चित्रपट समस्यांना हाताळणारी संस्था ‘इम्पडा’ या संस्थांच्याही अध्यक्ष स्थानी ते होते.

शांताराम बापूंच्या ८९ वर्षांच्या कारकिर्दीतील सहा दशके चित्रपट निर्मितीच्या ध्यासाने प्रेरित होती. याचीच दखल म्हणून की, काय शासनाच्या वतीने व्ही. शांताराम यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येतो. १७ नोव्हेंबर २००१ ला भारतीय पोस्ट खात्यातर्फे शांताराम बापूंच्या सन्मानार्थ त्यांची छबी असलेले पोस्टाचे तिकीट प्रसिद्ध करण्यात आले होते. १९९३ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या ‘व्ही. शांताराम मोशन पिक्चर सायंटिफिक रिसर्च अँड कल्चरल फाउंडेशन’तर्फे चित्रपट निर्माण करणाऱ्या कलाकारांना विविध पुरस्कार देण्यात येतात. दरवर्षी हे पुरस्कार १८ नोव्हेंबर म्हणजे शांताराम बापूंच्या जन्म दिवशीच प्रदान करण्यात येतात.

शांताराम बापूंनी त्यांच्या एकूण कारकिर्दीमध्ये हिंदी आणि मराठी मिळून २५ चित्रपटांमध्ये अभिनेत्याची भूमिका साकारली आहे. ५५ चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे आणि आणि ९२ चित्रपटांचे निर्माते होते. प्र. के. अत्रे यांनी शांताराम बापूंना ‘चित्रपती’ ही पदवी दिली होती. चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींना दिला जाणारा दादासाहेब पुरस्कार हा सर्वोच्च पुरस्कार शांताराम बापूंना १९९५ साली देण्यात आला. भारत सरकारनेही त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेत १९९२ साली त्यांना ‘पद्मविभूषण’ हा पुरस्कार देऊन सन्मानित केले.

त्यांच्या चित्रपटातील एक गाणे त्यांना यथार्थ शोभते…
मन सुद्द तुजं गोस्ट हाय प्रिथ्वीमोलाची
तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची
पर्वा बी कुनाची…

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -