एकीच मारा लेकीन सॉलिड मारा! कंगना समर्थक विक्रम गोखलेंवर अतुल कुलकर्णीचे मार्मिक ट्विट

marathi actor atul kulkarni tweet on vikram gokhle statement kangana ranaut
एकीच मारा लेकीन सॉलिड मारा ! कंगना समर्थक विक्रम गोखलेंवर अतुल कुलकर्णींची मार्मिक ट्विट

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी रविवारी पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान कंगणा रनौतच्या देशाच्या स्वातंत्र्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचे समर्थन केले. मात्र या समर्थनामुळे कंगनासोबत विक्रम गोखले यांच्यावरही टीकेची झोड उठवली जात आहे. राज्यातील काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी विक्रम गोखलेंना धारेवर धरले. विक्रम गोखले यांनी “कंगना रनौतच्या मताशी मी सहमत आहे”. असं म्हणत “महागाई काय मोदींमुळे वाढली का?” असा सवाल उपस्थित केला. मात्र कंगनाच्या वक्तव्याचे समर्थन करत विक्रम गोखले यांनी नव्या वादाला सुरुवात केली आहे. यातच आता अभिनेता अतुल कुलकर्णी यानेही ट्विटरच्या माध्यमातून विक्रम गोखलेंवर अत्यक्षरित्या निशाणा साधला आहे. ट्विटरवर अवघ्या सात शब्दांत अतुल कुलकर्णीने कंगना समर्थक विक्रम गोखलेंवर मार्मिक टीका केली आहे. सध्या सोशल मीडियावर हे ट्वीट तुफान व्हायरल होत आहे.

अतुल कुलकर्णीने ट्वीटमध्ये काय म्हटलंय?

अभिनेता अतुल कुलकर्णीने ट्विटर तसेच फेसबुकवर एक पोस्ट केलीय. यामध्ये त्याने, “ज्येष्ठता आणि प्रगल्भता या दोन भिन्न गोष्टी आहेत,” असं म्हटलं आहे. या ट्विटमध्ये त्याने कोणाच्याही नावाचा उल्लेख केला नाही. मात्र ट्विट करताना त्यांनी #globalphenomenon असा हॅशटॅग वापरला आहे. परंतु नेटीझन्सकडून या ट्विटचा अर्थ आणि रोख विक्रम गोखलेंवर असल्याचे म्हटले जातेय. अभिनेत्याने या ट्विटवर रिप्लाय करण्याचे ऑप्शन ऑन ठेवले नाही. मात्र तरीही अनेकांनी त्याचे ट्वीट रिट्विट करतं विक्रम गोखलेंना सुनावले आहे.

नेमकं विक्रम गोखले काय म्हणाले?

ब्राह्मण महासंघातच्या अमृतमहोत्सवानिमित्त रविवारी अभिनेते विक्रम गोखले यांचा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी ते पत्रकाराशी बोलताना म्हणाले, स्वातंत्र्य भीक मागून मिळाले, या कंगना रनौतच्या मताशी मी सहमत आहे. कोणाच्याही मदतीने स्वातंत्र्य मिळाले नाही, तर ते भीक मागूनचं मिळाले. विक्रम गोखलेंच्या या वक्तव्यांमुळे आता अनेक नेत्यांकडून टीका होतेय. तसेच त्यांना भाजपा समर्थक म्हटले जातेय.

“शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या कारणाकरिता शिवसेना स्थापन केली. त्या बाळासाहेबांच्या मनाला किती यातना होत असतील याचा प्रत्यय मला आहे. सध्याचं जे गणित आहे ते चुकलेलं आहे. हे सुधारायचं असेल तर शिवसेना आणि भाजप एकत्रं आल्याशिवाय पर्याय नाहीच. हे दोन पक्ष एकत्र येण्यासाठी मध्यस्थी करायला देखील तयार आहे,” असं मतही ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केलं आहे.

“बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या कारणाकरिता शिवसेना स्थापन केली. त्या बाळासाहेबांच्या मनाला किती यातना होत असतील याचा प्रत्यय मला आहे. माझी सख्खी आत्या सासू ही बाळासाहेबांच्या महिला आघाडीची पहिला महिला प्रमुख होती. बाळासाहेब माझे मामेसासरे. बाळासाहेबांची भाषणं ऐकून महाराष्ट्र गेली ४० वर्ष तृप्त झाला. मात्र, त्यांच्या निधनानंतर राजकारणात जे खेळ सुरु चालू आहेत ते इतके विचित्र स्तरावर पोहोचले आहेत, त्यात महाराष्ट्रातले लोक भरडले जात आहेत. याची कल्पना तुम्हाला नाही आहे, प्रसारमाध्यमांना नसते. हे गणित चुकलं आहे. हे सुधारायचं असेल तर अजून वेळ गेलेली नाही. ज्या संकटाच्या कड्यावरती आपला देश उभा आहे, त्यातून मागे खेचायचा असेल तर भाजप-शिवसेनेने एकत्र आलंच पाहिजे. भाजप-शिवसेनेने एकत्र आणण्याचे माझे प्रयत्न आहेत,” असं विक्रम गोखले म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी मी यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो असल्याचं गोखले म्हणाले. “शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर तुमचं काय बिघडलं असतं, असा सवाल मी फडणवीसांना केला होता त्यावर फडणवीसांनी झाली चूक असं उत्तर दिलं,” असं विक्रम गोखले यांनी सांगितलं.

देश कधीही हिरवा होणार नाही

लाल बहादूर शास्त्री सोडून आतापर्यंत देशातील सर्व पंतप्रधानांना मी शंभराच्या खाली गुण देतो. पण त्यांची जयंती ही २ ऑक्टोबर ला येते ती हेतुपुरस्सर पुसली जाते. त्याचा विसर पाडला जातो. किती वर्षे कारस्थान आहे? हा देश कधीही हिरवा होणार नाही हा देश भगवा राहिला पाहिजे, असं वक्तव्य विक्रम गोखले यांनी म्हटलं.

शाहरुख माझं वाकडं करू शकत नाही

विक्रम गोखले यांनी आर्यन खान प्रकरणावरही भाष्य केलं. मी अत्यंत स्पष्ट सांगतो. शाहरुख खान आणि आर्यन माझं काहीही वाकडं करू शकणार नाही. देशाच्या बॉर्डरवर २१ वर्षाचा जवान गोळी लागून मरतो तेव्हा तो खरा हिरो असतो. आर्यन हिरो नाही, असं विक्रम गोखले म्हणाले.

अतुल कुलकर्णींच्या ट्विटवर रिट्विटचा पाऊस