घरमनोरंजनजयवंत वाडकर उर्फ आनंदयात्री 'वाड्या' !

जयवंत वाडकर उर्फ आनंदयात्री ‘वाड्या’ !

Subscribe

दोन महत्वाच्या हरकतींसाठी तो मराठी मनोरंजन क्षेत्रात ओळखला जातो. त्याला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या वाढदिवसाची नोंद त्याच्या डायरीत आहे. इतकेच नाही, तर न चुकता त्या प्रत्येक व्यक्तीसाठी गाणे म्हणून आणि चियरअप करून त्याच्या वाढदिवसाला तो हमखास शुभेच्छा देतो. तेही कामांच्या व्यस्ततेतून वेळ काढून !… तर दुसरी हरकत म्हणजे… भेटणाऱ्या प्रत्येकासोबत सेल्फी काढण्याचा त्याचा शौक तर काही औरच आहे ! याबद्दल बऱ्याचदा त्याची मस्करी केली जाते, पण तो ते मनावर घेत नाही. उलट हसून दाद देतो आणि स्वतःचं ‘जगणं’ साजरं करतो. गेली अनेक वर्षे रंगभूमीवरून, कधी छोट्या पडद्यावर तर कधी मोठया पडद्यावर तो रसिकांना हसवतोय. चित्रपटसृष्टीत ‘वाड्या’ या नावाने ओळखला जाणारा असा हा, एकमेव निखळ आनंदयात्री म्हणजे अभिनेता जयवंत वाडकर !

कुणालाही अगदी पहिल्या भेटीतच लक्षात येते की, जयवंत जसा आतून आहे, अगदी तसाच बाहेरूनही आहे. म्हणूनच ‘वाड्या’ हा त्याच्या नावाचा अपभ्रंश म्हणजे चित्रपट सृष्टीतील कलाकारांचे त्याच्यावर असलेल्या प्रेमाचे प्रतिक आहे, एवढा तो त्यांच्या हक्काचा माणूस आहे. मुलाखतीच्या निमित्ताने जयवंत-दादाच्या घरी जाण्याचा योग्य आला. त्यानिमित्त त्याच्या दारावर पोहचता क्षणीच त्याच्या विनोदबुद्धीचा नमुना पाहायला मिळाला. दारावरच्या पाटीवर पाहिले नाव होते ‘विद्या’ म्हणजे त्याची पत्नी… तर दुसरे नाव होते… “वाड्या”. त्याची हि जिंदादिली हीच त्याची खरी ओळख आहे.

- Advertisement -

जयवंत-दादा उपजतच प्रेमळ. त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा सिलसिला जेंव्हा तो बँकेत कामला होता तेंव्हापासूनचा… डिपार्टमेंटमधील सर्वांचे वाढदिवस काँट्रीब्युशन काढून साजरे करण्याची प्रथा त्यानेच तिथे रुजवली. आज जवळ जवळ बारा हजार माणसं त्याच्या मित्र यादीत आहेत. यावर तो मिस्किलपणे म्हणतो, ” बायकोने जर घराबाहेर काढलं तर किमान दोन वर्ष बाहेर सहज राहीन. एवढं हि सगळी माणसं मला प्रेम देतात !” हे खार तर त्याने कमावलेले प्रेम आहे.

तसे पहायचे झाले तर जयवंत-दादाला पूर्वीपासून क्रिकेटचा भारी शौक होता. तो एके काळी दिलीप वेंगसरकर आणि रवी शास्त्री यांच्या विरोधात क्रिकेट सामने खेळाला होता. बँक ऑफ इंडियाच्या वतीने त्याने क्रिकेट मैदान गाजवले होते. आठ रनमध्ये पाच विकेट, हा त्याचा रेकॉर्ड आहे. त्यामुळे क्रिकेटरच व्हायचे असे नक्की ठरले होते. परंतू कॉलेज जीवनात अचानक सतीश पुळेकर हे वादळ त्याच्या जीवनात नाटक घेऊन अवतरले !… आणि त्याची पावलं एकांकिकांच्या निमित्ताने रंगभूमीकडे वळली. पुळेकर आणि विनय आपटेंकडे जयवंत-दादाने अभिनयाचे धडे गिरवले. हे सांगताना आजच्या अभिनयाकडे वळणाऱ्या नव्या पिढीला तो सांगतो की, ” अभिनय शिकायचं तर मास्तर हवेच, मीही तेच केलं. आजच्या घडीला चार मास्तर आपल्याकडे आहेत. वर्कशॉप्स करत बसण्यापेक्षा, त्यांच्याकडे नक्की शिकायला जा. ते म्हणजे … चंद्रकांत कुलकर्णी, वामन केंद्रे, अजित भगत आणि पुण्याचे पेठे ”

- Advertisement -

आपल्या अभिनय कारकिर्दीतील यशाचे श्रेय तो सोबतच्या मित्रांना म्हणजे विजय पाटकर , प्रदीप पटवर्धन , प्रशांत दामले , मिलिंद वैद्य , हर्ष शिवशरण या सर्वांना देतो. विजय पाटकरबद्दल जयवंत-दादा मजेत म्हणतो की , ” त्याचं अन माझं तर नवरा बायकोच नातं आहे.” या दोघांचीही मैत्री ते सिद्दार्थ कॉलेजला होते तेंव्हापासूनची… रंगभूमीवर, सिनेमामध्ये आपण दोघांनाही एकत्रच पाहिले आहे. जिथे पाटकर तिथे वाडकर अशी त्यांची मैत्री आजही अखंडित आहे. त्याचा आता विजय पाटकर दिग्दर्शित ‘वऱ्हाडी वाजंत्री’ हा मराठी सिनेमा येत्या ११ नोव्हेंबरला प्रदर्शित होतोय. त्याबद्दल तर तो भरभरून बोललाच, पण अभिनय बेर्डेच्या येऊ घातलेल्या ‘मन कस्तुरी रे’ चे प्रमोशन करायलाही विसरला नाही. चित्रपट आपला असो व इतर कलाकारांचा तो मोठ्या मनाने प्रमोशन करतो. हा सुद्धा त्याच्या व्यक्तिमत्वाचा एक पैलूच !

१९७९ ते २००० पर्यंत जयवंत दादाने रंगभूमीवरील अनेक पात्र साकारली. १९८५ साली जयवंतदादाचा पहिला मराठी चित्रपट पडद्यावर झळकला. दामू केंकरे दिग्दर्शित ‘तुझ्या वाचून करमेना’ या चित्रपटात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, वर्ष उसगांवकर, चेतन दळवी अश्या कलाकारांसोबत त्याने काम केले होते. लक्ष्मीकांत बेर्डे स्वतःच्या चित्रपटात त्याला हमखास घ्यायचेच हे तो आवर्जून सांगतो. १९८८ साली एन चंद्राच्या हिंदी सिनेमात वाडकर आणि पाटकर जोडगोळीची वर्णी लागली. त्यानंतर हिंदी सिनेमांची शृंखलाच सुरु झाली. मराठीतून हिंदी सिनेमासृष्टीत हजेरी लावणाऱ्या मोजक्या कलाकारांमध्ये जयवंत वाडकर या नावाची गणना होते.

आज जयवंत-दादाला सिनेमा आणि वेबसिरीज यांच्या चित्रीकरणाच्या वेळेअभावी रंगभूमीवर काम करता येत नाही याचे शल्य आहे. परंतु रंगभूमीवरील त्याचे प्रेम आजही अबाधित आहे. त्याच्या एकूण कारकीर्दीत त्याला सगळे चांगले दिग्दर्शक मिळाले याबद्दल तो कृतद्न्य आहे. चित्रपटांसोबतच येणाऱ्या अनेक वेबसीरीजमध्ये जयवंत वाडकर उर्फ आनंदयात्री ‘वाड्या’ला आपण सगळेच पाहणार आहोत.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -