घरमनोरंजनदिलखुलास अदिती सारंगधर!

दिलखुलास अदिती सारंगधर!

Subscribe

आज नाटक संपल्यावर मिळालेल्या मानधनाचं पाकीट किती जड आहे यापेक्षा किती लोकं आपल्याला भेटायला येतात, आपल्याबद्दल, आपल्या कामाबद्दल, नाटकाबद्दल बोलतात हे जास्त महत्त्वाचं आहे. एका कलाकाराला यापेक्षा जास्त काय हवंय! - अदिती सारंगधर

वडील डॉक्टर, आई परिचारिका म्हणजे घरात एकूणच वैद्यकीचं वातावरण. अदितीलाही रुईया महाविद्यालयात आल्यावर मानसशास्त्राकडे जाण्याची ओढ होती, परंतु नियतीचे काही वेगळेच प्रयोजन होते. कॉलेजला असताना ती सहज म्हणून मैत्रिणीसोबत नाटकाच्या ऑडिशनला गेली. थोडंसं काहीतरी बोलली आणि तिचे सिलेक्शन झाले. तिचा अभिनेत्री म्हणून नवा प्रवास सुरू झाला. नाटक असो, मालिका असो किंवा मराठी सिनेमा अदिती सारंगधर स्वतःच्या अभिनयाची छाप हमखास सोडते.

अदिती सांगते की, मंगेश सातपुतेंच्या ‘अगं अगं डिग्री’ या रुईया कॉलेजच्या एकांकिकेतून मी पहिल्यांदा रंगभूमीवर आले. नंतर आय. एन. टी.साठी काय करायचे म्हणून ‘मंजुळा’ ही एकांकिका बसवण्यात आली होती, त्यात मी होते. मंजुळासाठी अदितीला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर तिच्या वाट्याला आलेल्या अनेक भूमिका पुरस्कारासाठी पात्र ठरल्या. मराठी नाटक, मालिका, सिनेमा करीत आज दोन दशके उलटली. अदिती म्हणते की, आज नाटक संपल्यावर मिळालेल्या मानधनाचं पाकीट किती जड आहे यापेक्षा किती लोकं आपल्याला भेटायला येतात, आपल्याबद्दल, आपल्या कामाबद्दल, नाटकाबद्दल बोलतात हे जास्त महत्त्वाचं आहे. एका कलाकाराला यापेक्षा काय हवंय!

- Advertisement -

आजपर्यंत चाकोरीबाहेरील विविध भूमिका साकारणार्‍या काही अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे अदिती सारंगधर आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अदितीने साकारलेली ‘मंजुळा’मधील मंजुळा, ‘वादळवाट’मधील रमा, ‘प्रपोजल’ या मराठी नाटकातली शब्बो, ‘लक्ष्य’मधील सलोनी देशमुख, ‘हम बने तुम बने’ मधील तुलिका, ‘येऊ कशी तशी मी …’ मधील मालविका खानोलकर या सर्व भूमिका प्रशंसनीय ठरल्या आहेत.

वाट्याला येणार्‍या भूमिकांबद्दल काय अभ्यास करावा लागतो, यावर ती प्रांजळपणे सांगते की, अभ्यास किंवा रोलमध्ये शिरणं वगैरे काही मला माहिती नाही, पण हृदयाला जे भिडतं, ते मी करते. आय एम अ डिरेक्टर्स अ‍ॅक्टर !… मला काही वेगळ्या गोष्टी त्यात सुचल्या तर मी असं करू का? हे डिरेक्टरला विचारते. सध्या तिच्या ‘चर्चा तर होणारच’ या नाटकातील कट्टर डाव्या विचारांची मृणाल करताना पात्राचा सांगली, सातार्‍याकडील भाषेचा लेहजा अदितीने बखुबी पकडला आहे, तर ज्येष्ठ विचारवंत, कार्यकर्त्या मृणाल गोरेंच्या अभ्यासातून त्यांची पाय खेचत चालण्याची लकब अदितीने उचलली आहे. स्वतः डावखुरी नसूनही ‘वादळवाट’ मधील रमा आणि ‘लक्ष्य’मधील सलोनी देशमुख अदितीने प्रयत्नपूर्वक डावखुरी प्रॅक्टिस करून साकारली. ‘स्वराज्य जननी जिजामाता’साठी केलेल्या बडी बेगम या पात्रासाठी अदिती जाणीवपूर्वक उर्दू शिकली. प्रपोजल नाटकामधील शब्बू साकारणं हे तिच्यासमोर एक मोठं आव्हान होतं. त्याबद्दल अदिती सांगते की, अगदी रंगीत तालीम होईपर्यंत पाहणार्‍यांना मी साकारलेल्या त्या कॅरेक्टरमध्ये मजा येत नव्हती. प्रयत्न करीत होते, पण काही समजत नव्हतं. मी याचं क्रेडिट आमच्या गीता गोडबोलेला देईन. कारण प्रॉस्टिट्यूटचे कपडे परिधान केल्यावर तो, जो काही वॉक आला, तो अनपेक्षित होता! भूमिकेत उतरण्यासाठी वेशभूषा कलाकाराला एक वेगळंच बळ देते याचं हे उदाहरण आहे.

- Advertisement -

असाच एक आठवणीतला किस्सा अदितीने सांगितला. प्रपोजलमधील शब्बो साकारत असताना एका प्रयोगाला तिचे बाबा आले होते. चित्रपट असता तर गोष्ट निराळी होती, परंतु नाटकांमध्ये प्रत्यक्ष बाबांसमोर वेश्या साकारत असताना त्यातील अरे कंडोम तो रखना पडता है और आनेवाले गिराईक को देना पडता है, असे संवाद बोलताना मात्र अदितीला अवघडल्यासारखं झालं, असं ती सांगते.

‘येऊ कशी तशी मी’ या मालिकेतील अदितीने साकारलेले मालविका खानविलकर हे पात्र तिच्या अभिनय कारकिर्दीतील एकमेव खलनायकी पात्र आहे. ही खलनायिका साकारताना अदितीला मानसिक स्तरावर खूप त्रास झाला. एखादी व्यक्ती एवढी कशी काय क्रूर असू शकते याची ती कल्पनाच करू शकत नव्हती, परंतु अभिनय तर करायचा होता. अदिती सांगते की, अशा वेळी अभिनय करून झाल्यावर ती एकांतात अक्षरशः रडायची.

नाटक आणि मालिकांमध्ये तिला ज्या पद्धतीने मनासारखी पात्र साकारायला मिळाली त्याप्रमाणे चित्रपटांमध्ये अजूनही चांगली भूमिका तिच्या वाट्याला आलेली नाही याची अदितीला खंत आहे.

अदिती तिच्या कामाबद्दल जेवढी दिलखुलासपणे बोलते, तेवढेच ती तिच्या वैयक्तिक जीवनाबद्दलही सांगते. पती सुहास आणि मुलगा असं अदितीचे छोटेसे जग आहे. सुहास आणि अदितीची भेट एका मॅट्रिमोनियल साईटवर झाली. दोघांनीही एकमेकांना पसंती दर्शवली तरी पटकन विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला नाही. ते दोघेही लग्नाआधी तीन वर्षे सहजीवन म्हणजे ‘लिव इन’ मध्ये राहिले. त्याबद्दल ती सांगते की, जेव्हा आम्ही एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती तेव्हा नुकतीच माझी आई जग सोडून गेली होती. त्यावेळी मला असं वाटलं की माझी आई गेल्यामुळे तिची पोकळी भरून काढण्यासाठी तर मी सुहासकडे पाहत नाही ना? हे माझंच मला पडताळून पाहायचं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे आम्हा दोघांनाही वाटत होतं की लग्न करायचं तर ते टिकवण्यासाठी करूयात. त्यामुळे एकमेकांना थोडं जाणून घेण्यासाठी वेळ घेऊयात. माझे आईवडील दोघेही प्रगत विचारांचे होते. त्यामुळे सहाजिकच बाबा वॉज ऑल्सो ओके विथ इट. एक-दीड वर्षे आम्ही लिव इनमध्ये राहिलो. मग आम्हाला असं वाटलं की हे वर्कआऊट होत नाही. त्यामुळे काही काळानंतर आम्ही वेगळे झालो. आपआपले राहू लागलो. आम्ही एकमेकांच्या संपर्कात नव्हतो. काही काळ असा गेल्यावर आम्हाला पुन्हा वाटलं की आपण एकत्र येऊयात, पण आता जर एकत्र यायचं असेल तर आपण काही बाऊंड्री टाकूयात या रिलेशनशिपला आणि मग लग्न करण्याचा निर्णय घेतला. अदिती आणि सुहासचे नातेसंबंध वैचारिक आणि भावनिक रूपांतरणाच्या प्रक्रियेतून जाऊन सकारात्मक निर्णयाला पोहचले.

लग्नानंतर मधल्या काळात तिच्या बाळाचा, अरीनचा जन्म झाल्यावर त्याला तिने पुरेसा वेळ दिला. आज हेमंत एदलाबादकर यांच्या ‘चर्चा तर होणारच’ या नाटकातून सात वर्षांच्या एका मोठ्या अंतराळानंतर अदिती रंगभूमीवर अवतरली आहे. अदितीची प्रत्येक भूमिका ही चर्चा करण्यासारखीच होती. ‘चर्चा तर होणारच’ मध्ये तिने साकारलेली भूमिकासुद्धा त्यास अपवाद नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -