Hemal Ingle Wedding : वर्षाच्या सुरुवातीलाच एका मराठी अभिनेत्रीचं लग्न झालं आहे. सचिन पिळगावकर यांच्या ‘नवरा माझा नवसाचा 2’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री हेमल इंगळे हिने लग्न केलं आहे. लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
2 जानेवारीला हेमलने तिचा बॉयफ्रेंड रौनक चोरडियाबरोबर लग्नगाठ बांधली. हेमलच्या घरी गेल्या अनेक दिवसांपासून लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळालं होतं. या जोडप्याचा साखरपुडा ऑगस्ट महिन्यात पार पडला होता. यानंतर अभिनेत्रीचं केळवण, मेहंदी आणि हळदी समारंभ पार पडला होता. हेमल मराठी अभिनेत्री असली तरी तिने बॉलिवूड स्टाइलने शाही विवाह केला आहे. ‘आफ्रीन’ या गाण्यावर डान्स करत हेमलने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. हेमलने लग्नासाठी खास पिंक कलरचा लेहंगा वेअर केला होता. तिच्या लग्नातील खास लुक चर्चेत आला आहे.
साडेसात वर्षांच्या रिलेशनशिपनंतर हेमल आणि रौनक यांनी लग्नगाठ बांधली आहे. रौनक हा कलाविश्वापासून दूर असून त्याचा स्वत:चा व्यवसाय आहे. तो शिक्षणासाठी काही वर्षे युकेमध्ये होता. 2017 मध्ये रौनक पुन्हा भारतात परतला यावेळीच या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. पुढे, यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. रौनक कोल्हापुरचा असल्याने दोघांचं लाँग डिस्टन्स रिलेशनशिप होतं. जवळपास साडेसात वर्षे एकमेकांना डेट केल्यावर आज हे जोडपं लग्नबंधनात अडकलं आहे.
View this post on Instagram
हेमल इंगळेच्या ( Hemal Ingle ) कामाबद्दल सांगायचं झालं, तर नुकतीच ‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटात झळकली होती. यामध्ये तिने सचिन व सुप्रिया पिळगांवकर यांच्या ऑनस्क्रीन मुलीच्या भूमिका साकारली होती. त्याआधी ती सचिन पिळगावकरांच्याच ‘अशी ही आशिकी’ या सिनेमातही दिसली होती. ही तिची डेब्यू फिल्म होती.