Rekha Kamat: ज्येष्ठ मराठी अभिनेत्री रेखा कामत कालवश

'कुबेराचे धन', 'गृहदेवता', 'मी तुळस तुझ्या अंगणी', 'गंगेत घोडे न्हाले', 'अग्गंबाई अरेच्चा', 'गृहदेवता', 'बायको माहेरी जाते' हे रेखा यांचे गाजलेले चित्रपट

Marathi actress rekha kamat passes away
Marathi actress rekha kamat passes away

मराठी कला क्षेत्रातील लाडकी आजी म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. ( rekha kamat passes away ) त्या ८९ वर्षांच्या होत्या. रेखा कामत यांनी माहिम येथील त्यांच्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. रेखा कामत यांनी अनेक मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

‘लाखाची गोष्ट’ (Lakhachi Gosht )  हा १९५२ मध्ये प्रदर्शित झालेला रेखा कामत यांचा पहिला चित्रपट. राजा परांजपे, ग. दि माडगूळकर आणि सुधीर फडके या त्रिमूर्तींचा हा सिनेमा होता. रेखा कामत यांच्यासोबत त्यांच्या बहिणीनेदेखील या चित्रपटात भूमिका साकारली होती. कुमुद सुखटणकर हे त्यांचे मूळ नाव. तर कुसुम हे त्यांच्या बहिणीचे नाव होते. कुमुद आणि कुसुम ही जुन्या वळणाची नावे नकोत म्हणून चित्रपटासाठी या दोघींची नावे बदलण्यात आली. ग.दि. माडगूळकर यांनी रेखा आणि चित्रा, असे नामकरण केल्याची आठवण रेखा यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होती. त्याच नावाने या दोघीजणी पुढे ओळखल्या गेल्या. या चित्रपटाचे संवाद लेखन ग.दि. माडगुळकर यांच्यासोबत ग. रा. कामत यांनी केले. तिथेच कामत आणि रेखा यांची ओळख झाली. त्यानंतर या दोघांनी १९५३ मध्ये विवाह केला.

रेखा कामत आणि चित्रा नवाथे या सख्ख्या बहिणींनी मराठी सिनेसृष्टीचा सुवर्णकाळ गाजवला होता. ‘कुबेराचे धन’, ‘गृहदेवता’, ‘मी तुळस तुझ्या अंगणी’, ‘गंगेत घोडे न्हाले’, ‘अग्गंबाई अरेच्चा’, ‘गृहदेवता’, ‘बायको माहेरी जाते’ हे रेखा यांचे गाजलेले चित्रपट.

रेखा आणि त्यांची बहीण चित्रा यांनी शाळेत असतानाच नृत्याचे आणि गायनाचे प्रशिक्षण घेतले होते. ख्यातनाम नृत्यगुरू पार्वतीकुमार यांच्याकडून दोघी बहिणींनी शास्त्रीय नृत्याचे धडे गिरवले. नृत्यनाटिकेमुळे दोन्ही बहिणींना चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. या दोघी बहिणींमध्ये कुमुद सुखटणकर म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत या थोरल्या तर कुसुम सुखटणकर म्हणजे अभिनेत्री चित्रा नवाथे या धाकट्या होत्या.

तसेच ‘एकच प्याला’ ‘संशयकल्लोळ’, ‘भावबंधन’ यांसारख्या संगीत नाटकांमधून व ‘तुझं आहे तुजपाशी’, ‘लग्नाची बेडी’, ‘प्रेमाच्या गावे जावे’, ‘दिल्या घरी तू सुखी राहा’, ‘सुंदर मी होणार’, ‘कल्पवृक्ष कन्येसाठी’, ‘दिवा जळू देत सारी रात’ यांसारख्या व्यावसायिक नाटकांतून रेखा कामत यांनी भूमिका साकारल्या.

मोहन वाघ यांच्या चंद्रलेखामधून ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘ऋणानुबंध’, ‘गोष्टी जन्मांतरीच्या’ या नाटकांमध्येही काम केले होते. तर प्रपंच, माणूस, याला जीवन ऐसे नाव, सांजसावल्या, एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकांमधील त्यांच्या भूमिकाही लोकप्रिय ठरल्या आहेत.

रेखा कामत यांचा २००५ साली जनकवी पी. सावळाराम पुरस्कार, २००७ मध्ये महाराष्ट्र सरकारचा जीवन गौरव पुरस्कार तर दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा २०१२ मध्ये नवरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता. गेल्या काही वर्षांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी अभिनयातून दूर राहणे पसंत केले होते.


हेही वाचा – Mihir Das: दिग्गज अभिनेते मिहिर दास यांचे वयाच्या 63 व्या वर्षी निधन