घरमनोरंजनसीमोल्लंघन मराठी चित्रपटांचं

सीमोल्लंघन मराठी चित्रपटांचं

Subscribe

गेल्या काही वर्षांमधला मराठी चित्रपट आशयाच्या दृष्टीनं इतर भाषिक चित्रपटांपेक्षा खूप पुढे आहे, याबद्दल आता कोणाचंच दुमत नाही. निव्वळ चित्रपटगृहांमधील व्यावसायिक आघाडीवर आपला मराठी चित्रपट इतर भाषिक चित्रपटांच्या तुलनेत बराच पिछाडीवर आहे हे खरं आहे. परंतु, व्यवसायाव्यतिरिक्त आपल्या चित्रपटानं मोठी मजल मारलीय. ते सिद्ध करणार्‍या दोन गोष्टी नुकत्याच घडल्यात. त्यामधील पहिली गोष्ट म्हणजे ‘हॅपी जर्नी’नावाचा आपला चित्रपट मल्याळममध्ये नव्याने बनून तो नुकताच प्रदर्शितही झाला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीसाठी मानदंड असलेला ‘नटसम्राट’ चित्रपट आता गुजराती भाषेत बनत आहे. मराठी चित्रपटांचं हे इतर भाषांमधील सीमोल्लंघन खूप महत्त्वाचं, मोलाचं असून भविष्यातील मराठी चित्रपटसृष्टीसाठी ते निश्चितच लाभदायी ठरणार आहे.

‘हॅपी जर्नी’ हा चित्रपट २०१४ मध्ये बनला होता. सचिन कुंडलकर यांचं लेखन-दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात अतुल कुलकर्णी आणि प्रिया बापट यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाला मोठं व्यावसायिक यश मिळालं नसलं तरी कलात्मक कौतुक झालं होतं. मल्याळम चित्रपटसृष्टी ही आशयघन चित्रपटांसाठी महत्त्वपूर्ण मानली जाते.

त्यामुळे एखादा मराठी चित्रपट मल्याळी चित्रपटसृष्टीत प्रवेश करतोय ही निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. ‘हॅपी जर्नी’ मल्याळीमध्ये ‘कुडे’ नावाने बनतोय. या चित्रपटाचं दिग्दर्शन अंजली मेनन यांनी केलं असून तो गेल्या १३ जुलैला प्रदर्शित झाला आहे. त्याचं व्यावसायिक यश अजून स्पष्ट झालं नसलं तरी समीक्षकांनी त्याची बरीच वाखाणणी केली आहे.

- Advertisement -

मल्याळम चित्रपटसृष्टीत मेनन यांचं नाव खूप आदरानं घेतलं जातं. गेल्या दशकभरात या दिग्दर्शिकेने ‘केरळा कॅफे’, ‘मंजदिकुरवा’, ‘उस्ताद हॉटेल’ आणि ‘बेंगलोर डेज’ हे चार चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. रुपेरी पडद्यावर नातेसंबंधांचे पदर तरलतेनं उलगडण्यात ही दिग्दर्शिका प्रसिद्ध आहे. ‘हॅपी जर्नी’चं कथानक भावा-बहिणीच्या नात्यावर आधारलेलं असून त्याला दिग्दर्शिकेनं चांगला न्याय दिला असल्याची चर्चा मल्याळम चित्रपटसृष्टीत सुरू आहे. पृथ्वीराज, नजरिया आणि पार्वती हे तिघे या चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखांमध्ये झळकले आहेत.

- Advertisement -

गेल्या दोन वर्षांमध्ये गुजराती चित्रपटांच्या निर्मितीमध्ये वाढ होत आहे. या घडामोडींचा सरताज असलेली घटना म्हणजे मराठीत गाजलेल्या ‘नटसम्राट’ चित्रपटाचा गुजरातीमध्ये रिमेक होणे. हा चित्रपट आता पूर्ण झाला असून तो मोठ्या धुमधडाक्यानं ३० ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. गुजरातबरोबरच तो मुंबईसह महाराष्ट्रातील इतरही काही शहरांमध्ये प्रदर्शित होणार आहे. विख्यात साहित्यिक वि. वा. शिरवाडकर यांचं ‘नटसम्राट’ नाटक १९७० मध्ये पहिल्यांदा रंगभूमीवर आलं. या नाटकाचे आजवर वेगवेगळ्या संचांमध्ये हजारो प्रयोग झालेत. डॉ. श्रीराम लागूंसह इतर बर्‍याच अभिनेत्यांनी ‘नटसम्राट’मधील मुख्य व्यक्तिरेखा आपल्या अभिनयानं गाजविली आहे. जयंत गिलाटर हे या चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक आहेत. विशेष बाब म्हणजे ‘लगान’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘रंगीला’ यासारखे चित्रपट सादर करणारे झामू सुगंध या चित्रपटाचे ‘प्रेझेंटर’ आहेत. गुजराती कलाक्षेत्रात मोठं नाव असणार्‍या सिद्धार्थ रांदेरिया यांनी ‘नटसम्राट’मधील मुख्य व्यक्तिरेखा साकारली आहे. त्यांच्यासोबत आहेत ‘पद्मश्री’ पुरस्कार विजेते अभिनेते मनोज जोशी आणि ‘रामायण’ मालिकेत सीतेच्या व्यक्तिरेखेमुळे प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या अभिनेत्री दीपिका चिखलिया.

महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘नटसम्राट’ने मराठीत ४० कोटींचा गल्ला जमवीत २०१६ मध्ये ‘बॉक्स ऑफिस’वर खळबळ उडवून दिली होती. या चित्रपटामधील नाना पाटेकर यांचा नटसम्राट प्रेक्षकांनी स्वीकारला होता. त्यामुळेच रांदेरिया यांच्यापुढे या व्यक्तिरेखेला न्याय देण्याचं मोठं आव्हान आहे. तसेच रांदेरिया यांची आजवरची इमेज ही गंभीर प्रवृत्तीसाठी साजेशी नाही. ‘गुज्जूभाई’ या व्यक्तिरेखेमुळे ते गुजरात वर्तुळात कॉमेडीसाठी प्रसिद्ध आहेत. मात्र हा चित्रपट करण्यापूर्वी रांदेरिया यांनी ‘नटसम्राट’ हे नाटक गुजराती रंगभूमीवर केलेलं आहे. ‘अमारी दुनिया तमारी दुनिया’ असं शीर्षक असलेल्या या नाटकाचे गुजराती रंगभूमीवर जवळपास चारशेहून अधिक प्रयोग झाले आहेत. त्यामुळेच रंगभूमीवर चांगली कामगिरी करणारा हा नटसम्राट रुपेरी पडद्यावर कसा वावरतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

‘कुडे’ आणि ‘नटसम्राट’च्या व्यावसायिक कामगिरीवर इतर मराठी चित्रपटांना विविध भाषांमधील चित्रपटसृष्टीची दारं खुली होणार आहे. मराठी चित्रपट आशयात समृद्ध असल्यामुळे तो कोणत्याही भाषेतील प्रेक्षकाला ‘अपील’ होतो. त्यामुळेच भविष्यात इतरही काही गाजलेले मराठी चित्रपट तमीळ, तेलुगु तसेच कानडी भाषांमध्येही प्रदर्शित झाल्यास आश्चर्य वाटू नये.

– मंदार जोशी
(लेखक सिने अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -