घरमनोरंजनशेक्सपियर आणि बाजीरावाचा फार्स

शेक्सपियर आणि बाजीरावाचा फार्स

Subscribe

एकाचवेळी समोर एक मॅड फार्स घडवत, त्या आडून नाट्यनिर्मिती मागील प्रेरणांचा शोधही एपिक गडबड घेते. आशयाचा परिघ इतका विस्तारित केल्यामुळेच हे नाटक फार्सिकल शैलीचे न राहता एका वेगळ्याच मिश्र शैलीकडे जात संपते.

मकरंद देशपांडे गेली अनेक वर्षे सातत्याने हिंदी नाटके करत आहेत. त्यांच्या ‘एपिक गडबड’ या सुवर्ण महोत्सवी हिंदी फार्सचा शुभारंभ १९ जुलैला पृथ्वी थिएटरला झोकात साजरा झाला. एका ऐतिहासिक लग्नाचा ‘आयता हासिक’ फार्स झाला तर…? ही या नाटकामागील प्रेरणा. ‘शेक्सपियरचा म्हातारा’ या देशपांडे यांच्या आधीच्या नाटकात किंग लियरचा फार्सिकल वेध त्यांनी घेतला होता. एपिक गडबड हा त्याचा उत्तरार्ध नव्हे तर निरूपण आहे.

१९९३ साली ड्रीम मॅन या नाटकापासून सुरू असलेला हा सिलसिला ‘चित्रा’, ‘जोक’, ‘करोडों में एक’, ‘मिस ब्युटिफुल’, अशी अनेक नाटके करताना त्यांचे ‘सर सर सरला’ गेली सतरा वर्षे अव्याहत सुरू आहे. शेक्सपियरचा म्हातारा या मराठी नाटकाचा जन्मही ‘एपिक गडबड’ची पार्श्वभूमी आहे. या नाटकाचा, पर्यायाने किंग लियरचा मृत्यू झाला आहे आणि त्याचे कलेवर त्याच्या युद्धवेशात रंगमंचावर लटकवलेले आहे. ‘म्हातारा’चेच दोन्ही सेटस इथे एकत्र करून वापरले आहेत. इतकाच या नाटकाचा त्या नाटकाशी संबंध.

- Advertisement -

गडबडची सुरुवात, मामाजी, त्यांची बहीण ज्योती, तिची मुलगी आरती आणि घरातील हरकाम्या नोकर, बाब्या यांच्या आवाजातून होते. आरतीला ऐतिहासिक पद्धतीने लग्न करायचे आहे. तिचा वाग्दत्त वर बाजीराव पेशवा हा पुण्याहून तिला पाहायला येणार आहे. बाब्या, घरातील दिवे गेल्याने उडलेला फ्युज तपासत आहे आणि अंधारात कुणीतरी घरात प्रवेश करते. दिवे येतात आणि बाजीरावाऐवजी एक युरोपियन महाशय आपल्याला दिसतात. यांचे नाव विल्यम शेक्सपियर आहे. बाजीरावाच्या प्रतिक्षेत असलेली आरती क्षणात आपले दिल विल्यमवरती ओवाळून टाकते. मात्र शेक्सपियर इथे, आपल्या किंग लियरचा फार्स कुणी केला? याचा जाब विचारायला, थडग्यातून उठून आलाय. तो नाटककार देशपांडेला शोधतोय. पुढे प्रत्यक्ष बाजीराव प्रवेश करतो. मात्र त्याला कोणी दाद देत नाही. रागात तो शेक्सपियरला द्वंद्वाचे आव्हान देतो. यानंतर तिथे आरतीच्या लग्नानिमित्ताने जो गोंधळ सुरू होतो, त्याचे नाव एपिक गडबड.

एपिक गडबडचा उत्तरार्ध हा शेक्सपियरच्या नाटकांची वाट लावणार्‍या कलाकृतींचा झाडा घेणे आणि अनपेक्षितपणे एकमेकांसमोर उभे ठाकलेल्या शेक्सपियर आणि बाजीरावातील द्वंद्व अशा दुहेरी मार्गाने जाताना,जे-जे घडते, ते सारे अनपेक्षित आहे आणि म्हणूनच हास्यस्फोट करत राहते. म्हणजे एकाचवेळी समोर एक मॅड फार्स घडवत, त्या आडून नाट्यनिर्मिती मागील प्रेरणांचा शोधही एपिक गडबड घेते. आशयाचा परिघ इतका विस्तारित केल्यामुळेच हे नाटक फार्सिकल शैलीचे न राहता एका वेगळ्याच मिश्र शैलीकडे जात संपते.या नाटकांतील कलाकार आपल्या भूमिकांमध्ये चपखल बसलेत. शेक्सपियर आणि बाजीराव एकमेकांसमोर येण्यात एक ‘कल्चरल फ्युजन’ आहेच. ते मामी आणि अगदी बाब्यासुद्धा सफाईदार इंग्रजीत बोलून जमवतात. शेक्सपियरचे इथल्या कल्चरमध्ये रस घेणे आणि शंकराची उपासना वेधक होते. मामी झालेल्या माधुरी गवळी यांचे पात्र, चर्पटपंजरीसाठी नेमलेले आहे. ते सतत आणि तिन्ही भाषांतून बडबडत राहू शकते.

- Advertisement -

संजय दधीच, फार्सिकल नाटकात वास्तववादी मामाजी उभा करतात, जो लक्षात राहतो. बाब्या झालेले अजय कांबळे हे एकाचवेळी विद्रोहाचे आणि उपेक्षित कलाकाराचे प्रतिनिधी आहेत. भरत मोरे यांनी बाजीराव झोकात उभा केला आहे. विशेष उल्लेख करायला हवा शेक्सपियर- निनाद लिमये यांचा. समोर फार्सिकल पात्रे असूनही त्यांनी शेक्सपियर पुरेसा आब राखून उभा केलाय. त्यांचे संवाद, देहबोली उत्तम. एक उल्लेख वेगळा करायला हवा, आकांक्षा गाडे हिचा. तिची आरती फक्त प्लेजंट अ‍ॅम्बियन्ससाठी आहे असे वाटत असतानाच ती तिच्या कामाने लक्ष वेधू लागते. अखेरच्या द्वंद्वात तिने जे काही केले आहे, त्याला तोड नाही. जी व्हेरिएशन्स ती क्षणात बदलत देते, ती प्रत्यक्ष जाऊन पाहायला हवीत!
अमोघ फडके यांची प्रकाश योजना आणि रचिता अरोरा यांचे संगीत, नाटकाला अपेक्षित उठाव देते.


– आभास आनंद

(लेखक नाट्य अभ्यासक आहेत)
******

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -