घरमनोरंजनमराठी रंगभूमी दीन ?... रंगकर्मींच्या चष्म्यातून…

मराठी रंगभूमी दीन ?… रंगकर्मींच्या चष्म्यातून…

Subscribe

विष्णूदास भावे यांनी १८४३ साली सीता स्वयंवर हे पहिले नाटक रंगभूमीवर सदर करून मराठी नाट्यसृष्टीचा पाया घातला.

रंगभूमीवर सादर होणार्‍या नाटकाच्या प्रत्येक खेळाला प्रयोग असे संबोधले जाते. होणार्‍या प्रत्येक प्रयोगागणिक नाटक अधिक समृद्ध होत जाते. त्यातील कलाकारांची अभिनयाची समज विकसित होत जाते. मागच्या प्रयोगात काय करायला नको होतं किंवा आणखी काय करू शकतो यावर मंथन होत राहते. यातूनच कलाकार आणि नाटक घडत राहण्याची प्रक्रिया अविरत सुरू राहते. असाच एक नाट्यप्रयोग विष्णूदास भावे यांनी सर्वात प्रथम १८४३ साली सादर केला. आजही ती परंपरा खंडीत झालेली नाही.

विष्णूदास भावे यांनी १८४३ साली सीता स्वयंवर हे पहिले नाटक रंगभूमीवर सदर करून मराठी नाट्यसृष्टीचा पाया घातला. ते मराठी नाटककार होते. ते मराठी नाट्यपरंपरेचे जनक मानले जातात. त्यांचा उल्लेख महाराष्ट्रात नाट्य कलेचे भरतमुनी म्हणून केला जातो. कर्नाटकातील भागवत मंडळी कीर्तनी ‘खेळ’ करीत, त्याप्रमाणे खेळ रचण्याची सांगली संस्थानचे संस्थानिक चिंतामणराव पटवर्धनांनी विष्णूदास भावेंना आज्ञा केली. १८४३ साली राजांच्या पाठबळावर भावेंनी सीता स्वयंवर हे मराठीतील पहिले नाटक रंगमंचावर आणले. सांगली संस्थानाच्या राजवाड्यातील ‘दरबार हॉल’मध्ये ५ नोव्हेंबर १८४३ रोजी या नाटकाचा पहिला खेळ झाला. त्याचेच प्रतिक म्हणा, किंवा स्मरण म्हणून आजचा ५ नोव्हेंबर हा दिवस दर वर्षी ‘मराठी रंगभूमी दिन’ म्हणून साजरा केला जातो.

- Advertisement -

१९४३ पासून आजतागायत कित्येक मराठी नाटककारांनी लिहिलेली नाटकं मराठी रंगभूमीवर सादर झाली. तशीच अनेक कलावंत मंडळी, दिग्दर्शक आणिअभिनेतेही रंगभूमीने रसिक प्रेक्षकांना दिले. रंगभूमीवर कित्येक नाटकांनी इतिहास घडवला, तर त्यातील काही नाटकांनी समाजमन आणि मतांनाही दिशा दिली. हि मराठी नाटकांची समृद्ध परंपरा आज नेमकी कोणत्या टप्प्यावर पोचली आहे.

यासंदर्भात नाट्यक्षेत्राशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या संबंधित असलेल्या रंगकर्मींनी आपआपली मते मांडली आहेत, जी बोलकि तर आहेतच शिवाय मार्मिकही आहेत.

- Advertisement -

“मराठी रंगभूमीविषयी नवं सांगण्यासारखं काहीच नाही. कोरोना नंतर अगदी हळूहळू ती कार्यरत होते आहे.पण नाटकं तिच जुनी…स्थिरावलेली….

प्रायोगिक रंगभूमीवरही नवं काही घडत नाही. एखादं काठपदर सारखं नाटक…पण तेही भाषांतरीत. आपल्या अनुभवातलं, आपल्या जगण्यातलं, मातीचे प्रश्न मांडणारं लेखन कुठेय?… आणि मनोरंजनाच्या तळ्यातच डुबक्या मारणाऱ्या रंगकर्मीना आपण काय सांगणार?… आणि सांगून उपयोग काय?… कलावंतांना आतून वाटलं पाहिजे. कोरोनामुळं हजारोंचं जगणं कठीण झालं. माणसं मेली प्राणवायुशिवाय, बेकारी वाढली, महागाई वाढली…. असे अनेक प्रश्न आहेत. एक मोठ्ठा लेख लिहावा लागेल !”
-प्रेमानंद गज्वी (ज्येष्ठ नाटककार)

रंगभूमीवरील नाटकांच्या बुकिंगचे आकडे पाहिले तर जाणवतंय कोविडनंतर प्रेक्षक आधीपेक्षा चुजी झालेत. नाटकांच्या प्रयोगाबाबत ते प्रयोग करायला तयार नाहीत. जाऊन बघू.. बरं वाटलं तर बसू.. हे आता नको. वर्षभरात रसिकांनी चोख संदेश दिलाय.- ” विनोदी असो वा गंभीर, पण हमखास १००% करमणूकीची खात्री देत असाल तरच आम्ही थोडी रिस्क घेऊन नाटकाला येऊ” त्यामुळे नाटकाच्या मार्केटिंगसाठी वर्तमानपत्रातील जाहिरात, परीक्षण ह्यावर विसंबून पुरेस नाही. मराठी कलाकारांनी निर्मात्यांनी सोशल मिडियाचा अफाट आवाका शक्ती जादू जाणून घ्यायला हवी. निल साळेकरसारख्या डिजिटल क्रिएटर्सचे सोशल मीडियावर दहा लाख फॉलोअर्स आहेत. त्याचं एक Reel काही सेकंदात दहा लाख लोकांपर्यंत पोहोचतं. सोशल मीडिया ह्या अस्त्राचा अशाप्रकारे योग्य वापर करून मायबाप रसिकांना आपण रंगभूमीकडे आणू शकतो. आणूया. याच सर्वाना मराठी रंगभूमी दिनाच्या शुभेच्या!”
-देवेंद्र पेम (नाटककार)

“रंगभुमीला फार मोठी परंपरा आहे. एकेकाळी नाटक बघायला जाणारा प्रेक्षक अगदी समारंभाला गेल्या सारखा नटून थटून जायचा. त्या काळी नाटकाचे २५ प्रयोग झाले तरी त्याचं सेलीब्रेशन अगदी सनयीचौघडे वाजवत निर्माते मोठ्या उत्साहाने करत. अलीकडे अस सेलीब्रेशन होत नसलं तरी प्रेक्षकांची रंगभुमीची ओढ कमी झालेली नाही. चांगल काही त्यांना दाखवलंत तर प्रेक्षक गर्दी करतात. आजही हाऊसफुल्लचे बोर्ड थिएटरवर लागतात. ६ तारखेला प्रशांत दामले त्याच्या वेगवेगळ्या नाटकांच्या झालेल्या १२ हजार ५०० प्रयोगांचं सेलीब्रेशन षण्मुखानंदला करतोय. भरत जाधवनेही सही रे सहीचे हजारो प्रयोग केलेत,करतोय. तरुण कलावंत उस्फुर्तपणे रंगभुमीकडे वळतायत. चित्रपट करणारेही कलावंत रंगभुमीवर काहीतरी करत रहाण्यासाठी असुसलेले आहेत. हे द्रुष्य पाहून इतकी खात्री नक्कीच वाटते की रंगभुमीला मरण नाही. ही परंपरा आबाधीत रहाणार आहे.”
-वसुंधरा साबळे (पटकथा-संवाद लेखिका)

“सध्याची मराठी रंगभूमीची सद्यस्थिती चांगली आहे की वाईट आहे हे ठरवता येणार नाही. आजची मराठी रंगभूमी मल्टीमेडिआच्या वेंटिलेटरवर अजूनही नुसती जिवंत आहे एवढंच म्हणता येईल.”
-रविंद्र दामोदर लाखे (ज्येष्ठ नाटककार)

“रंगकर्मी आणि प्रेक्षकांना रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा. रंगभूमीशी निगडीत असणाऱ्या सगळ्यांसाठी हा खूप मोठा दिवस आहे.

पूर्वीसारखी नाटकं आता होत नाहीत, ती फक्त शुक्रवार, शनिवार आणि रविवार ह्या दिवसांसाठी मयादित राहिलीत याचं दुःख आहे. आंतरशालेय, राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा फार कमी होत आहेत किंवा अधिक उत्साह दिसत नाही. ह्या सर्व स्पर्धांमधून प्रेक्षक वर्ग तयार होतो आणि म्हणूनच विविध स्तरावर नाट्य स्पर्धा होणे आवश्यक आहे. आम्ही राज्य सरकारला विनंती करणार आहोत की राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा पुन्हा सुरु कराव्यात.

नाटक हे सर्व नाट्यकर्मीचा आत्मा आहे. इतर कलाकृतींपेक्षा नाटक नेहमी प्रयोगागणीक वाढत जातं आणि ह्यात प्रेक्षकांचा खूप मोठा वाटा आहे. मला आठवतयं मी “बायको असून शेजारी” हे नाटक करताना ४००, ४५० प्रयोगानंतरही काहीतरी वेगळं आठवत होतं आणि आम्ही ते करत होतो.”
-जयवंत वाडकर (अभिनेता)

“मराठी रंगभूमीवर सध्या नव-नवीन नाटक पहायला मिळतायत. पण त्यातील पन्नास टक्के नाटकं, ही जुनी अथवा नावात बदल करून सादर केली जातायत. अभिजात नाटकं ही रंगभूमीला तारतायत असं चित्र दिसून येतंय. परंतु अभिजात असं या रंगभूमीवर पुन्हा उगवेल का नाही हा प्रश्न समोर उभा राहतो. रंगभूमी ही वाहत्या पाण्याचा झरा आहे. पण सध्या हे झरे बुजलेयत.
इथे नवनवीन उत्तम नाटकांना मायबाप रसिक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं पाहिजे. अर्थात ती जबाबदारी नवोदित नाटककारांची सुद्धा आहे.”
– रोहन पेडणेकर (अभिनेता-दिग्दर्शक)

“उत्तमोत्तम नाटकं येतायत, येतील. मराठी रंगभूमी जागतिक पातळीवर नेहमीच अग्रेसर प्रयोगशील आणि व्यापक होती. ह्याला कारणीभूत रंगभूमीचे घटक तर आहेतच पण प्रेक्षकांची प्रगल्भताही कारणीभूत आहे. दुःख हेच आहे की, त्या प्रेक्षकांना नाटक बघायला शहरं सोडली तर इतर गावांमधे नाट्यगृह नाहीत. आणि जी आहेत तर ती सुस्थितीत नाहीत. स्वतः नाट्य परिषदेचंच नाट्यगृह बंद आहे. दिव्याखाली अंधार !”
-डाॅ. गिरीश ओक (ज्येष्ठ अभिनेते)


हे ही वाचा – दीपा चौधरीला दिल्या केदार शिंदेंनी वाढदिवसाच्या शुभेच्छा !

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -