#MeToo – नंदिता दासचे वडील जतीन दास यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप!

आलोक नाथ, सुभाष घई, नाना पाटेकर यांच्यानंतर आता पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित चित्रकार आणि नदिता दासचे वडील जतिन दास यांच्यावरही लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत.

Jatin Das Accused of Sexual Harassment
नंदिता दास आणि वडील जतीन दास

तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकरांवर आरोप केल्यानंतर देशभरात #MeToo चळवळीला जोरदार सुरूवात झाली आहे. विविध क्षेत्रातून आणि विशेषत: बॉलिवुडमधून मोठ्या प्रमाणावर सेलिब्रिटि महिला दुसऱ्या सेलिब्रिटिंवर लैंगिक शोषणाचे आरोप करू लागल्या आहेत. यामध्ये आता आणखीन एका मोठ्या नावाचा समावेश झाला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री-दिग्दर्शिका नंदिता दास हिचे वडील आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध चित्रकार जतीन दास यांच्यावरही #MeToo मोहिमेमध्ये लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. निशा बोरा या महिलेने हे आरोप केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवर निशा बोराने हे आरोप केले आहेत.

कुठे? कधी? काय?

निशा बोराने तिच्या ट्विटरमध्ये म्हटल्याप्रमाणे 2004 मधला हा प्रकार आहे. दिल्लीमध्ये इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये तिची जतीन दास यांच्यासोबत भेट झाली होती. ती दास यांची मोठी फॅन होती. भेटीमध्ये दास यांनी तिला त्यांच्यासोबत काम करण्याची विनंती केली. तिनेही ती मान्य केली. पहिल्या दिवशी त्यांच्या घरी निशा गेली, तेव्हा सारंकाही व्यवस्थित होतं. पण जेव्हा निशा जतीन दास यांच्या स्टुडिओमध्ये गेली, तेव्हा मात्र त्यांनी तिला मिठीत घेतलं आणि तिचं चुंबन घ्यायचा प्रयत्न केला. जेव्हा निशा बोराने त्यांना दूर लोटलं, तेव्हा जतिन दास तिला चुंबनासाठी तयार करण्याचा प्रयत्न करू लागले. तसेच, ‘मी त्या गोष्टीला नाही म्हणतेय, याचंच त्यांना आश्चर्य वाटत होतं’, असंही निशाने या पोस्टमध्ये टाकलेल्या फोटोमध्ये म्हटलं आहे.


तुम्ही हे वाचलंत का? – #MeToo : ‘सलमान खाननं माझा लैंगिक छळ केला’


नंदितानेही केली अजब मागणी!

दरम्यान, हा सर्व प्रकार घडल्यानंतर जतीन दास यांची मुलगी नंदिता दास हिनेच आपल्याला फोन करून वेगळीच मागणी केल्याचं निशा बोरा या पोस्टमध्ये म्हणतेय. निशाच्या पोस्टनुसार, ‘मला नंदिताने फोन केला. आणि माझ्यासारखीच एक चांगली तरूण महिला असिस्टंट तिच्या वडिलांसाठी शोधून द्यायची मागणी तिने माझ्याकडे केली. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तोपर्यंत नंदिताचं माझ्या मनात खूप आदरार्थी स्थान होतं.’

बॉलिवुडमध्ये धुमाकूळ

नाना पाटेकर, विकास बेहेल, सुभाष घई, आलोक नाथ, साजिद खान अशा बॉलिबुडमधल्या अनेक दिग्गजांवर आत्तापर्यंत लैंगिक अत्याचाराचे आरोप करण्यात आले आहेत. अर्थात, आत्तापर्यंत यांच्या कुणावरचेच आरोप जरी सिद्ध झाले नसले, तरी या #MeToo मोहिमेमुळे बॉलिवुडमध्ये मोठा धुमाकूळ माजवला असल्याचं सध्या तरी दिसत आहे.