मीटू सारखा संवेदनशील विषय; ‘घर होतं मेणाचं’ मध्ये

मीटू सारखा संवेदनशील विषय 'घर होतं मेणाचं' या आगामी मराठी चित्रपटात हाताळण्यात आला आहे. यामध्ये अलका कुबल आणि मोहन जोशी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

ghar hot menach
घर होतं मेणाचं मधील सीन

स्त्रीच्या दुबळेपणाचा फायदा घेणे, स्वप्न दाखवून बळजबरी – विनयभंग करणे, तिला दुय्यम स्थान देणे या गोष्टी काही आजच्या नाहीत. अगदी पुरातन काळापासून स्त्रीला दुय्यम स्थान दिले गेलेले आहे. समाजरचनेप्रमाणे तिला वागवले आहे. आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. पुरुषाइतकेच स्त्रीसुद्धा आपले कर्तृत्त्व सिद्ध करू लागली आहे. दबलेला हुंकार आता बोलता झाला आहे. पूर्वी कधी काळी ज्या पुरुषाने आपले पुरुषत्व गाजवून, एकतर्फी अधिकाराने स्वत:ची शारीरिक भूक भागवली त्यांच्या विरोधात स्त्रिया विशेष करुन समजदार स्त्रिया आता बोलत्या झालेल्या आहेत. ‘मी टू’ हे सध्या गाजत असलेले प्रकरण त्याचेच उदाहरण सांगता येईल. राजेश चव्हाण यांनी आपल्या कथा, पटकथा, संवाद या जबाबदारीत ‘घर होतं मेणाचं’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे. हा चित्रपट ३० नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

कौटुंबिक गोष्ट पाहायला मिळणार 

ज्ञानेश्‍वर ढोके आणि नितीन ज्ञानदेव शेटे यांनी या चित्रपटाची निर्मिती करुन या नव्या विषयाला चालना दिलेली आहे. चित्रपटाची नायिका वसुंधरा असून ती विवाहित आहे. पती सतत नाट्यप्रयोगात व्यस्त असल्यामुळे कुटुंबाची जबाबदारी तिच्यावर येऊन पडलेली आहे. कुटुंबाच्या सुखासाठी धडपड करत असताना तिचे स्वत:चे वैयक्तिक जीवन उदध्वस्त झालेले आहे. कौटुंबीक गरजा भागवण्यासाठी ती घराबाहेर पडते. जिच्याबरोबर ओळख होते त्यात वसुंधरासुद्धा भरकटली जाते. पुरुषांच्या मनमानी व्यवहाराला वेळीच उत्तर द्यायला हवे. तिचे व्यक्त होणे म्हणजेच ‘मी टू…मी सुद्धा’ असे तिचे सांगणे ‘घर होतं मेणाचं’ या चित्रपटात पहायला मिळणार आहे. यामध्ये अलका कुबल आणि मोहन जोशी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

ग्राफिक्सच्या माध्यमातून मनोगत व्यक्त 

आजवरच्या शोषित, कौटुंबीक नात्यापेक्षा ही थोडी वेगळी भूमिका आहे ज्यात अलकाचे वेगळे रुप पहायला मिळणार आहे. ग्राफिक तंत्राचा चित्रपटांच्या नामावलीत आजवर बर्‍याचवेळा वापर केलेला आहे. इथेमात्र चित्रपटातली नायिका आवश्यक तिथे ग्राफिकच्या माध्यमातून आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. चित्रकथा या संकल्पनेतून हा चित्रपट हाताळला गेलेला आहे. ग्राफिक आणि अॅनिमेशनची कामगिरी योगेश गोलटकर याने केलेली आहे. अविनाश नारकर, पल्लवी सुभाष, आशालता वाबगावकर, रविंद्र बेर्डे, शितल शुक्ल, सिद्धार्थ जाधव यांच्याही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.