Mrs. Chatterjee Vs Norway Trailer: मुलांपासून दुरावलेल्या मातेची लढाई, राणीचा निशब्द करणारा अभिनय

गेल्या काही वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून लांब असलेली बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जी लवकरच मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहे. 

गेल्या काही वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून लांब असलेली बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जी लवकरच मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहे.  मर्दानीच्या भूमिकेत दमदार अभिनय करणारी राणी ‘मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे’ या चित्रपटात दोन मुलांच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे. जिच्या मुलांना तिच्यापासून सरकारने दूर केलं आहे अशा सरकारविरोधात लढणाऱ्या आईच्या भूमिकेत राणी दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज झाला असून त्यातील राणीचा अभिनय  सगळ्यांनाच निशब्द करुन गेला आहे.

या चित्रपटाची पटकथा नॉर्वेमध्ये स्थाय़िक झालेल्या चटर्जी या बंगाली कुटुंबावर आधारित आहे. पती पत्नी आणि दोन गोंडस मुलं असे हे चौकोनी कुटुंब आहे. पण एक दिवस अचानक तेथील सरकारच्या चाइल्ड सर्विसेज विभागातील काही सरकारी अधिकारी चटर्जींच्या घरी येतात आणि तुम्ही तुमच्या मुलांचा नीट सांभाळ करत नाहीत असा आरोप करत मुलांना घेऊन जातात. आपल्या मुलांना परत मिळवण्यासाठी मिसेस देबिका चटर्जी म्हणजे राणी मुखर्जीने दिलेला लढा या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. मुलांच्या विरहाने कधी हतबल झालेली तर कधी मुलांच्या आठवणींनी त्वेषाने पेटून उठणाऱ्या आईची भूमिका राणीने अफलातून उभारली आहे.

विशेष म्हणजे हा एका सत्यकथेवर आधारित चित्रपट आहे. राणीबरोबर या चित्रपटात जिम सरभ, नीना गुप्ता आणि अनिर्बान भट्टाचार्य दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आशिमा छिब्बरने केले आहे. तर जी स्टुडिओने चित्रपटाची निर्मिती केली आहे. १७ मार्च २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.