मराठी सिनेविश्वात लहान मुलांभोवती फिरणारी कथानकं कायमचं प्रेक्षकांना भावली आहेत. ज्यात दिग्गज दिग्दर्शकांच्या कलाकृतींचा समावेश आहे. ‘श्यामची आई’, ‘श्वास’, ‘नाळ’, ‘नाळ 2’, ‘एलिझाबेथ एकादशी’ या सुपरहिट चित्रपटांच्या यादीत आता ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ या चित्रपटाची भर पडली आहे. शुक्रवारी (31 जानेवारी) प्रदर्शित झालेला हा चित्रपट एका सुंदर विषयावर आधारलेला आहे. सुमित गिरी लिखित आणि संकेत माने दिग्दर्शित या चित्रपटात बालकलाकार मायरा वायकुळ मध्यवर्ती भूमिकेत आहे. तिचा हा चित्रपट नेमका कसा आहे आणि तो का पहावा? याविषयी जाणून घेऊया. (Mukkam Post Devach Ghar Movie Review)
निरागस जिजाची भावस्पर्शी गोष्ट
‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ हा कोल्हापूरच्या आपटी गावातील चिमुकल्या जिजाच्या आयुष्यावर भाष्य करणारा चित्रपट आहे. सैन्यात सेवा केलेल्या तिच्या वडिलांच्या निधनानंतर ती आई आणि आजीसोबत राहतेय. आपल्या छोट्याशा विश्वात रमणारी जिजा आपले बाबा आपल्याला भेटायला का येत नाही? या प्रश्नात गुंतते. यावर तिची आई तिला समजावताना म्हणते, ‘तुझे बाबा खूप लांबच्या गावी ‘देवाचं घर’ असतं ना तिकडे गेले आहेत’. यानंतर देवाचं घर म्हणजे काय? ते कुठे असतं? ते फार लांब आहे का? तिकडे पत्र पोहचत असतील का? असे प्रश्न जिजाला पडतात. शाळेत शिकवलेल्या पत्रलेखनाचा वापर करून चिमुकली जिजा वडिलांशी संवाद साधायचा निर्धार करते. …आणि इथून सुरु होतो निरागस जिजाचा भावनिक प्रवास.
ही कथा एकूणच विश्वास, प्रेम, आधार, निष्पापपणा आणि बाप- लेकीच्या सुंदर नात्यातील अचूक धागा पकडणारी आहे. संकेत माने यांनी केलेले दिग्दर्शन या कथानकातील भावनिक गुंफण साधण्यास यशस्वी झाले आहे. तर संकेत माने आणि सुमित गिरी यांनी लिहिलेली पटकथा ही भावनांचा तोल सांभाळणारी आहे. चित्रपटातील हलके फुलके विनोद क्षणभर हसू आणणारे तर भावनिक दृश्ये डोळ्यात अश्रू आणणारी आहेत. या चित्रपटातून ग्रामीण भागातील साधेपणा, संवादातील बारकावे आणि वेषभूषेवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. हा चित्रपट काही प्रमाणात ग्रामीण भागातील अडचणींवर देखील भाष्य करतो. इतकेच नव्हे तर हा चित्रपट मृत्यू आणि मरणोत्तर जीवन यातील फरक, एका विधवेचा समाजाशी असणारा संघर्ष, वडिलांच्या मृत्यूनंतर बालमनावर होणारा आघात अशा अनेक महत्वाच्या विषयांवर प्रकाश टाकतो.
भले हा चित्रपट सुरुवातीला संथ वाटेल, पण जसजशी कथा पुढे सरकते तसतसा हा चित्रपट भावनिकदृष्ट्या आकर्षक वाटू लागतो. असे असले तरीही याची कथा काहीशी अंदाज लावता येईल असे मार्ग मोकळे करताना दिसते. त्यामुळे आश्चर्याचा कुठेतरी अभाव वाटतो. या चित्रपटाची गती मनोरंजनाचा वेगवान शोध घेणाऱ्या प्रेक्षकांना काहीशी कंटाळवाणी वाटू शकते. त्यामुळे सर्व प्रकारचे प्रेक्षक या चित्रपटात गुंतून राहतील अशी अपेक्षा जरा कमीच असलेली बरी. शिवाय काही दृश्ये लॉन्ग मेलोड्रामाचा फील देतात. पण, त्याचा चित्रपटाच्या रनटाईमवर कोणताही परिणाम झालेला नाही.
या चित्रपटातील स्टारकास्ट आणि त्यांच्या अभिनयाविषयी बोलायचे झाले तर, सर्वांनी आपापल्या परीने उत्तम कामगिरी केली आहे. चित्रपटाचे मध्यवर्ती पात्र साकारणारी मायरा वायकुळ यावेळी कौतुकाची विशेष पात्र ठरते. अत्यंत लहान वयात तिने आश्चर्यकारक कामगिरी करून दाखवली आहे. तिने साकारलेले जिजा हे पात्र जितके खोडकर तितके लाघवी आणि निरागस आहे. काही दृश्यांमध्ये जिजाच्या मनाला लागलेली ठेच आपल्या डोळ्यात पाणी आणण्यात यशस्वी झालेली दिसते. जिजाचा विश्वासार्ह प्रवास आणि शेवटचा मोनोलॉग पाहून कितीतरी प्रेक्षकांचे डोळे पाणावलेले होते.
चित्रपटात मंगेश देसाई, कल्याणी मुळ्ये, सविता मालपेकर, उषा नाडकर्णी, माधवी जुवेकर, कमलेश सावंत, प्रथमेश परब, रेशम श्रीवर्धन आणि स्पृहा परब यांच्या सहाय्यक भूमिका आहेत. या कलाकारांनी आपल्या दर्जेदार अभिनयाने आपापल्या भूमिकेची प्रेक्षकांवर एक छाप सोडली आहे. चित्रपटाच्या शेवटी पाहुण्या कलाकाराच्या रूपात प्रेक्षकांसाठी सरप्राईज आहे. हे सरप्राईज काय आहे? हे जाणून घेण्यासाठी चित्रपट जरूर पहायला हवा.
याशिवाय चिनार – महेश या लोकप्रिय जोडीने चित्रपटाच्या कथानकाला साजेसे साउंडट्रॅक देत आणखी मजा आणली आहे. या चित्रपटातील गाणीदेखील एकप्रकारे प्रेक्षकांशी संवाद साधत असल्याचे जाणवते. चित्रपटाचे कथानक सुरुवातीला कितीही सो सो वाटले तरी निर्णायक क्षणी माणुसकी जिवंत असलेल्या प्रत्येक माणसाच्या मनातली योग्य भावना जागृत करते. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी आजच्या पिढीला पटेल अशी आधुनिक पद्धतीने करण्यात आली आहे. त्यामुळे पाहताना जुन्या काळात गेल्यासारखे वाटत नाही. काही ठिकाणी एडिटिंग जर्क असला तरी तो लवकर समजून येत नाही. बारीक बारीक गोष्टींवर बोलायचं झालं तर कुठे ना कुठे उन्नीस बीस आहे खरं! पण या किरकोळ गोष्टींकडे दुर्लक्ष केले तर ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ हा या वर्षातील एक सुंदर आणि हृदयस्पर्शी चित्रपट आहे, असे म्हणायला हरकत नाही. जो नक्कीच कुटुंबासमवेत पाहण्यास लायक ठरतो.
हेही पहा –
Rahul Solapurkar : मराठी अभिनेत्याला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेलं ते विधान भोवणार?