घरमनोरंजनमुल्क- ‘आपण आणि ते’...चा शोध

मुल्क- ‘आपण आणि ते’…चा शोध

Subscribe

भारताची फाळणी, पाकिस्तानची निर्मिती, भारतातले बहुसंख्य मुसलमान, देशातले हिंदू, सामान्य नागरिक, देश आणि राष्ट्र, दहशतवाद, इस्लाम अशा सर्वच स्फोटक मुद्यांना स्पर्श करताना बटबटीत, भावनिक, अनावश्यक भाष्य टाळण्यात ‘मुल्क’चा दिग्दर्शक अनुभव सिन्हा यशस्वी झाला आहे.स्वातंत्र्यासह फाळणीची भळभळती जखम पदरात घेतल्यावर इतिहासातून पुढे वाटचाल करणार्‍या देशासमोरील धार्मिक गटवादाचे प्रश्न ‘मुल्क’मधून समोर येतात.

फाळणीच्या जखमेवरच्या खपल्या काढून ती बरी न होऊ देणारी राजकीय व्यवस्था आणि धर्माच्या आधारावर निर्मिती झालेल्या पाकिस्तानला नाकारून इथल्याच मातीची निवड करणार्‍या तत्कालीन मुसलमान कुटुंबाचा न्यायालयीन लढा हा या चित्रपटाचा विषय.विषय जरी वादग्रस्त असला तरी ‘मुल्क’ कुठंही भडक आणि एकांगी धार्मिक भाष्य करत नाही,हे पटकथेचं यश आहे.

बनारसच्या एका कुठल्याशा मोहल्ल्यात मुराद अली मोहम्मद(ऋषी कपूर)चं कुटुंब राहतं. त्याला शाहीद(प्रतिक बब्बर)आणि आयत (वर्तिका सिंग)ही दोन मुले आहेत. शाहिद दहशतवादी गटांच्या संपर्कात येऊन भरकटतो.त्यानंतर मुराद अलीच्या कुटुंबाची होणारी राजकीय, सामाजिक आणि न्याय व्यवस्थेकडून होणारी फरपट हा कथानकातील संतुलन राखण्यात अनुभव सिन्हा कमालीचा यशस्वी झालाय. मानवी समाजाच्या निर्मितीचा इतिहास सर्वात जुना आहे.या इतिहासातील मूळ नैसर्गिक संदर्भ समाजाच्या निर्मितीनंतर काळानुसार बदलत गेले, धर्मसंस्थेची उभारणी झाल्यावर हे मूळ नैसर्गिक मानवी जगणं नाहीसं होत गेलं.ते शोधण्याची खटपट ‘मुल्क’मध्ये आहे. दोन वेगळे धर्म मानणार्‍या माणसांच्या गटांकडून एकमेकांचं माणूसपण हिरावण्याचं सुरू असलेलं हे द्वंद्व पडद्यावर येतं.

- Advertisement -

मुराद अलीचा मोहल्ला कुठल्याही धर्मांध सत्तेचा बालेकिल्ला नसतो. बाबरीचा विध्वंस झाल्यावर उसळलेल्या दंगलीत त्याच्या घराच्या संरक्षणासाठी मोहल्ल्यातला चौबे हा त्याचा हिंदू मित्र सर्वात पुढे असतो. मुरादलाही देश नावाच्या या मोठ्या घरात असलेल्या बनारसच्या एका मदनपुरात नावाच्या गल्लीत आपलंही छोटं घर असल्याची खात्री असते.पाकिस्तानच्या निर्मितीनंतर विस्थापित देश आणि मोहल्ला यात या मोहल्ल्याची निवड केलेली असते.पण दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटानंतर त्याच्या घरावर ‘मुसलमान, पाकिस्तानात जा…’असं त्याच्याच मोहल्ल्यातल्या इतर लोकांकडून लिहिलं जातं. हे तेच असतात ज्यांनी त्याचं घर ६ डिसेंबर १९९२ च्या दंगलीत वाचवलेलं असतं.आता हा देश त्याचाही आहे हे सिद्ध करण्याची लढाई त्याच्या प्रतिष्ठेची असते.भारतीय राज्यघटनेनुसार नागरिक म्हणून हक्काची असलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्याचा संघर्ष हा ‘मुल्क’च्या कथानकाचा विषय. जिहाद म्हणजेच स्वतःतल्या वाईट प्रवृत्तीविरोधात लढण्याचा संघर्ष. हाच अर्थ ‘मुल्क’मध्ये पुन्हा समोर येतो.

दहशतवादविरोधी कारवाईत पुतण्या शाहीदला पोलिसांनी संपवल्यानंतर धाकटा भाऊ बिलाल(मनोज पटवा), त्याची पत्नी, कुटुंब आणि स्वतः वकील असलेल्या मुरादलाही दहशतवादी असल्याच्या संशयानं पाहिलं जातं. कुटुंबातला एक सदस्य दहशतवादी असल्याचं सिद्ध झाल्यावर आपली देशाप्रती असलेली निष्ठा कशी सिद्ध करायची की देशातून पळून जायचं, असे दोन पर्याय मुरादसमोर असतात.तो दुसरा पर्याय निवडतो.हा त्याचा निर्णय योग्य ठरतो का, हे पडद्यावर पाहायला हवं.

- Advertisement -

‘मुल्क’चा पडदा व्यापला जातो तो मुराद (ऋषी)आणि त्याची सून आरती मल्होत्रा(तापसी पन्नू)या दोघांकडूनच.मुरादचं निर्दोष नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी सुरू असलेल्या हिंदू सुनेची धडपड एवढाच हा चित्रपट नाही. कुटुंब आणि समाज या दोन्ही पातळीवर विभागली गेलेली आरती(तापसी)ही सत्याच्या बाजूनं आहे.जे खरं आहे ते मांडणार त्यात कितपत सत्य आहे हा निकाल देशाची न्यायव्यवस्था योग्य पद्धतीने करेल,हा तिचा विश्वास कितपत खरा ठरतो हे पडद्यावर पहायला हवं.ऋषी कपूरचा संयत अभिनय, प्रतिक बब्बर, नीना गुप्ता,आशुतोष राणा यांनी व्यक्तिरेखांना दिलेला न्याय आणि तापसीचा प्रगल्भ अभिनय या ‘मुल्क’च्या जमेच्या बाजू आहेत. हा ‘मुल्क’ कोणाचा? आपण कोण आणि ते कोण?याचा शोध घेणारा ‘मुल्क’ नक्कीच पाहायला हवा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -