सलमानच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलीस अलर्ट; चाहत्यांनाही घराबाहेर थांबण्यास बंदी

नुकत्याच काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता सलमान खानला धमकीचा ईमेल आला होता. तेव्हापासून सगळीकडे खळबळ उडाली. मुंबई पोलिसांनी देखील सलमानच्या घराबाहेर कडक बंदोबस्त ठेवले. शिवाय आता खबरदारी म्हणून आता सलमानच्या घराबाहेर चाहत्यांना येण्यास बंदी देखील घालण्यात आली आहे. आता पोलिसांनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा साथीदार गोल्डी ब्रार यांच्याविरोधात सलमानला धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन सहाय्यक निरीक्षक (API) दर्जाचे अधिकारी आणि 8-10 कॉन्स्टेबल सलमानच्या सुरक्षेसाठी 24 तास तैनात असतील. तसेच सलमानच्या चाहत्यांना त्याच्या वांद्रे येथील घराबाहेर थांबण्यास बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वी सलमानला पोलिसांकडून Y+ सुरक्षा देण्यात आली होती. आता पोलिसांकडून सलमानच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे.

धमकीच्या ईमेलमध्ये नक्की काय लिहिलं होतं?

शनिवारी वांद्रे पोलिसांनी सलमानच्या ऑफिसमध्ये धमकीचा ईमेल पाठल्याप्रकरणी लॉरेन्स, गोल्डी आणि रोहित गर्ग यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आला. ही तक्रार सलमानचा मित्र प्रशांत गुंजाळकर याने दाखल केली. यावेळी प्रशांतने सांगितले की, हा ई-मेल रोहित गर्ग नावाच्या आयडीवरुन पाठवण्यात आला होता. ज्यात “तुझा बॉस सलमान खानसोबत आमच्या गोल्डी भाईला बोलायचं आहे. जर तुम्हाला समोरासमोर बोलायचे असेल तर तुमच्या बॉसला नीट सांगा, जर तुम्हाला हे प्रकरण बंद करायचे असेल तर तुमच्या बॉसशी आमचं बोलणं करुन द्या. लॉरेन्स बिश्नोईची मुलाखत पाहिलीच असेल, जर नसेल पाहिली तर पाहून घ्या. आता फक्त वेळेत माहिती दिली आहे. पुढच्या वेळी झटका बघायला मिळेल.”

लॉरेन्स बिश्नोईने दिली होती सलमान खानला जीवे मारण्याची धमकी

दरम्यान, यापूर्वी देखील गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला तुरुंगातून जीवे मारण्याची धमकी दिली होती. बिश्नोई म्हणाला होता की, सलमानला मारणे हे त्यांचे एकमेव उद्दिष्ट आहे आणि लहानपणापासूनच त्याच्या मनात सलमानबद्दल राग आहे. सलमानने आपल्या बिकानेर येथील मंदिरात समाजातील लोकांची माफी मागावी अन्यथा ठोस उत्तर दिले जाईल, असेही बिष्णोई म्हणाला होता.

 


हेही वाचा :

Happy Birthday Rani Mukerji : राणी मुखर्जीच्या करिअरमधील 5 सुपरहिट चित्रपट