मराठी सिनेविश्वात दररोज नवनवीन कलाकृती साकारल्या जात आहेत. ज्याचे आशय आणि विषय हे कायम समाजातील विविध घटकांवर भाष्य करत असतात. अशातच आता ‘स ला ते स ला ना ते’ नामक चित्रपटाची यात भर पडत आहे. कमी श्रमात आणि कमी काळात अधिक पैसा कमावण्याची आकांक्षा असलेला बडबडा तरुण आणि त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अबोल तरुणीच्या नात्याचं व्याकरण सांगणारी कथा म्हणजे ‘स ला ते स ला ना ते’ हा चित्रपट. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच पुणे येथे सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते लाँच करण्यात आला. ट्रेलर पाहून या सिनेमाच्या कथानकाविषयी आता प्रेक्षकांच्या मनात आणखीच कुतूहल निर्मिती झाली आहे.
चित्रपटाचे कथानक काय?
या चित्रपटाच्या कथानकाविषयी बोलायचं झालं तर, बोलका आणि गोडबोल्या तरुणाची ओळख अचानक एका पर्यावरणप्रेमी तरुणीसोबत होते. या मैत्रीचे रूपांतर हे प्रेमात होते आणि गोष्टी थेट लग्नापर्यंत पोहचतात. हा तरुण विदर्भातील चंद्रपूरमध्ये एका न्यूज चॅनेलचा पत्रकार असतो. पर्यावरणप्रेमी तरुणी आणि या तरुण पत्रकाराच्या नात्याभोवती या चित्रपटाचे कथानक फिरते आहे. पत्रकारिता, पर्यावरणाचे प्रश्न आणि विकास या विषयांवर हा चित्रपट प्रामुख्याने भाष्य करताना दिसणार आहे.
या चित्रपटात पत्रकार होऊ इच्छिणाऱ्या तरुणाला पत्रकारितेच्या माध्यमातून लवकर श्रीमंत होण्याची चटक लागते. त्यासाठी तो अनेक जुगाड करतो. अशाच एका जुगाडात तो कसा अडकत जातो आणि त्याच्यावर काय आपत्ती ओढवते, हे सर्व आपल्याला या चित्रपटात पहायला मिळणार आहे. ज्याची एक झलक आपण ट्रेलरमधून पाहू शकतो. हा ट्रेलर सोशल मीडियावरदेखील प्रदर्शित झाला असून नेटकऱ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्नात आहे. स्टुडिओ लॉजिकल थिंकर्स प्रस्तुत ‘स ला ते स ला ना ते’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन संतोष कोल्हे यांनी केले आहे.

कधी रिलीज होणार?
पत्रकारिता समाजातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि व्यवस्था सुधारण्यासाठी असते. मात्र, पत्रकारितेतील अप्रवृत्ती, राजकारण यांचा संबंध ‘स ला ते स ला ना ते’ चित्रपटातून उलगडण्यात येणार आहे. त्याप्रमाणे अत्यंत लक्षवेधी तसेच प्रेक्षकांना गुंतवून आणि खिळवून ठेवणारा असा हा चित्रपटाचा ट्रेलर आहे. त्यामुळे टीजरमधून निर्माण झालेली उत्सुकता दिवसागणिक वाढू लागली आहे. कारण हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांना फार प्रतीक्षा करावी लागणार नाही. येत्या ७ फेब्रुवारी २०२५ रोजी हा चित्रपट सर्वत्र थिएटरमध्ये प्रदर्शित होतो आहे.
चित्रपटाविषयी नागराज मंजुळे म्हणाले…
या चित्रपटाचा ट्रेलर नागराज मंजुळे यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आला आहे. याप्रसंगी ते म्हणाले, ‘आजपर्यंत न हातळलेला विषय या चित्रपटात मांडलेला आहे. अतिशय रंजक आणि रहस्यमय असा हा ट्रेलर झाला आहे. सगळ्याच कलाकरांचा अभिनय उत्तम असून माझ्याकडून या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा!’
हरहुन्नरी कलाकारांची टीम
‘स ला ते स ला ना ते’ हा चित्रपट विविध महोत्सवांमध्येही दाखवला गेला आहे. या चित्रपटात अभिनेता उपेंद्र लिमये, छाया कदम यांच्यासह रिचा अग्निहोत्री, साईंकित कामत, पद्मनाभ बिंड, मंगल केंकरे, वंदना वाकनीस, सुदेश म्हशीलकर, रमेश चांदणे, सिद्धीरुपा करमरकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. श्रीकांत बोजेवार, तेजेश घाडगे, संतोष कोल्हे यांनी चित्रपटाची पटकथा लेखन आणि श्रीकांत बोजेवार यांनी संवाद लेखन केलं आहे. चित्रपटाचे छायांकन विनायक जाधव यांनी केले असून सचिन नाटेकर यांनी संकलन, एकनाथ कदम यांनी कला दिग्दर्शन आणि रोहित नागभिडे यांनी पार्श्वसंगीत तर रोहित प्रधान यांनी ध्वनीआरेखन केले आहे. प्लाटून फिल्म्स आणि पीव्हीआर आयनॉक्स हे या चित्रपटाचे वितरण करणार आहेत.
हेही वाचा : Monali Thakur : आजारपणाच्या अफवांवर गायिका मोनाली ठाकूरने सोडले मौन
Edited By – Tanvi Gundaye