दलित पॅथर चळवळीचे संस्थापक आणि बंडखोर कवी नामदेव ढसाळ यांच्या चळवळीवर आधारित ‘चल हल्ला बोल’ हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. हा सिनेमा सेन्सॉर बोर्डाकडे पाठवल्यानंतर सिनेमातील ढसाळांच्या कवितांवर आक्षेप घेण्यात आला. तसेच ही कविता आणि अन्य 11 सीन कट करण्याचे आदेश दिले गेले. दरम्यान, सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्याला नामदेव ढसाळांबाबत माहिती दिली असता त्याने ‘कोण ढसाळ? आम्ही ओळखत नाही’, असे वक्तव्य केले आणि यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटलंय. या अधिकाऱ्याच्या उद्दाम वक्तव्याचा निषेध करत ढसाळांच्या पत्नीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जाणून घेऊया त्या काय म्हणाल्या? (Namdeo Dhasal Wife Malika Amar Sheikh express anger over sensor board statement)
नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका यांनी सरकारकडे या उद्दाम अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करण्याची मागणी केली आहे. तसेच याप्रकरणी सरकारला जाब विचारत म्हणाल्या, ‘आज इतकी भयंकर वेळ माझ्यावर येईल असे वाटले नव्हते. कोण आहे नामदेव ढसाळ? हा प्रश्न अत्यंत यातनादायी आहे. हा संपूर्ण मराठी कलासृष्टीचा अपमान आहे. अशा उद्दाम व्यक्तीला मोठ्या पदावर कसे नेमके जाते? ज्या माणसाने आपल्या शब्द प्रभुत्वाने संपूर्ण मराठी साहित्याला उज्वल केले. आपल्या मातीत नव्हे तर संपूर्ण जागतिक साहित्यात ज्याने नाव मिळवले, मराठीचा झेंडा जगात लावला त्या व्यक्तीबद्दल तुम्ही असं अपमानास्पद बोलता याचा मी निषेध करते. त्या माणसाचे तातडीने निलंबन करायला हवे. अशी माणसं तुम्ही नेमता कसं? तुमच्या अकलेचं दिवाळ वाजलेलं आहे का?’, असे म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
‘जागतिक साहित्यात ढसाळांची कविता गेली आहे. त्यांच्या योगदानासाठी शासनाने पद्मश्री आणि अनेक शासकीय पुरस्कार दिले आहेत. जागतिक स्तरावर त्यांनी मराठीचे नाव नेले आहे हे आपण कसे विसरतो? शब्दप्रभू माणसाचा असा अवमान.. तो कोण आहे? असं विचारलं जातंय, याहून मोठी शोकांतिका नाही’, असेही यावेळी मल्लिका ढसाळ म्हणाल्या.
बायोस्कोप फिल्म्स, दिग्दर्शिका वरुणा राणा यांचा पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट येणार असल्याची मागील 2-3 वर्षांपासून चर्चा असताना महेश बनसोडे यांनी ‘चल हल्ला बोल’ सिनेमाची निर्मिती केली. यासाठी त्यांनी नामदेव ढसाळांच्या पत्नी मल्लिका नामदेव ढसाळ यांच्याकडून कोणतीही परवानगी, हक्क न घेतल्याचे समोर आले आहे. सर्वत्र या चित्रपटाचा गाजावाजा होत असताना आता मल्लिका ढसाळ यांनी या चित्रपटाच्या निर्मितीबाबत आक्षेप घेतला आहे.
‘चल हल्ला बोल’ सिनेमाला विरोध
यावेळी बोलताना मल्लिका नामदेव ढसाळ यांनी ‘चल हल्ला बोल’बाबत मोठा खुलासा करत आपला सिनेमाला विरोध असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, ‘ज्यांनी ”चल हल्ला बोल” फिल्म बनवली त्यांनी माझी परवानगी घेतलेली नाही. ते लोक जगभरात हा सिनेमा दाखवत आहेत आणि गाजावाजा करत आहेत. हे अत्यंत चुकीचे आहे. मी सांगू इच्छिते, कॉपीराईट ॲक्टनुसार 50 वर्षांआधी एखाद्या लेखकाचे किंवा व्यक्तीचे साहित्य ही साहित्यिकाची बौद्धिक मालमत्ता असते. त्यामुळे याचा कुणाला गैरफायदा घेण्याचा अधिकार नाही. जे जे लोक असे दुकान मांडून नामदेव यांच्या नावाचा किंवा त्यांच्या प्रतिमेचा गैरवापर करतील त्यांना मी कायद्याच्या भाषेतच उत्तर देईन’.
कोणीही उठून असा चित्रपट करू शकत नाही
यासंदर्भात दिग्दर्शिका वरुणा राणा म्हणाल्या, ‘दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी हा सिनेमा बनवत असताना बायोस्कोप फिल्म्स आणि मल्लिकाजींकडून कोणतेही हक्क घेतलेले नाहीत. आम्ही हा चित्रपट बनवताना मल्लिकाजींकडून कायदेशीररित्या सगळे हक्क घेतले आहेत. गेली तीन वर्षं आम्ही याचा अभ्यास करत आहोत आणि प्रत्येक गोष्ट आम्ही मल्लिकाजींना दाखवून, त्यांच्याशी याबाबत चर्चा करून मगच पुढे जात आहोत. मुळात हा खूप खोल आणि संवेदनशील विषय आहे. त्यामुळे कोणीही उठून असा चित्रपट करू शकत नाही’.
मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्र्यांना निवेदन देणार
या प्रकरणासंदर्भात येत्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांना लेखी निवेदन दिले जाणार आहे. ज्यामध्ये सेन्सॉर बोर्डात अशा लोकांना नियुक्त करू नका आणि ज्यांना नियुक्त कराल ते मराठी भाषेचा सन्मान करणारे असावे. तसेच मल्लिका ढसाळ यांच्या अधिकारांवर डल्ला टाकण्याचा प्रयत्न केलेल्यांना कायद्याच्या चौकटीतून धडा देण्याबाबत सरकारकडे दाद मागितली जाईल.
हेही पहा –
Lalita Pawar : मोठ्या पडद्यावरील खाष्ट सासू ललिता पवार यांचा सिनेप्रवास