शांत बसण्यामुळे मला वाईट व्यक्तीचा टॅग देण्यात आला… नवाजुद्दीनने पत्नीच्या आरोपांना उत्तर दिले

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. मागील अनेक दिवसांपासून नवाजुद्दीन सिद्दीकीचे वैवाहिक जीवन कठीण टप्प्यातून जात आहे. नवाजुद्दीन आणि त्याची पत्नी आलिया सिद्दीकी यांच्यात सतत अनेक वादविवाद होत असून त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. आलियाने सांगितले की, नवाजुद्दीनने तिला आणि त्यांच्या मुलांना घरातून हाकलून दिले आहे. दरम्यान, अशातच होत असलेल्या आरोपांवर नवाजुद्दीन सिद्दीकीने भाष्य केले आहे.

नवाजुद्दीनने पत्नी आलियाच्या आरोपांना उत्तर दिले

पत्नी आलियाच्या सततच्या आरोपांना कंटाळून नवाजुद्दीन सिद्दीकीने अखेर आपली बाजू मांडत प्रतिक्रिया दिली आहे. त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन याबाबत एक मोठी पोस्ट शेअर करत आलियाचे सर्व आरोप फेटाळले आहेत.

नवाजुद्दीनने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “माझ्या शांत बसण्यामुळे मला वाईट व्यक्तीचा टॅग देण्यात आला आहे. हा तमाशा टाळण्यासाठी मी गप्प बसलो होतो, कारण या सगळ्या गोष्टी माझ्या मुलांना आज ना उद्या वाचायला मिळतील. माझ्या चारित्र्यावर खोट्या आणि एकतर्फी व्हिडिओंद्वारे हत्या केली जात आहे, ज्याचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म , प्रेस आणि अनेक लोक आनंद घेत आहेत. पण मला आता काही गोष्टींचा उल्लेख करावासा वाटतो.

“सर्वप्रथम, आलिया आणि मी अनेक वर्षांपासून एकत्र राहत नाही. आम्ही आधीपासूनच घटस्फोटीत आहोत. पण आमची परस्पर समज फक्त मुलांसाठी होती. माझी मुलं भारतात का आहेत आणि गेल्या 45 दिवसांपासून शाळेत का जात नाहीत हे कोणाला माहीत आहे का? शाळा मला पत्रे पाठवत आहे की सुट्टी खूप झाली. माझ्या मुलांना 45 दिवसांपासून ओलीस ठेवण्यात आले आहे. त्याला दुबईतील त्याच्या शाळेत जाता येत नाही.” असं नवाजुद्दीन म्हणाला.

पुढे नवाजुद्दीनने लिहिलंय की, “गेल्या 2 वर्षांपासून आलियाला प्रत्येक महिन्याला 10 लाख रुपये दिले जात आहेत. त्याच वेळी, मुलांसह दुबईला जाण्यापूर्वी आलियाला दरमहा 5-7 लाख रुपये दिले .मुलांच्या शाळेची फी, वैद्यकीय आणि प्रवासाचा खर्च वेगळा दिला जातो. शिवाय मुंबईमध्ये आलियाच्या नावावर एक सी-फेसिंग अपार्टमेंट देखील देण्यात आलं आहे आणि दुबईमध्ये देखील एक घर खरेदी करुन देण्यात आलं आहे. आलिया देखील तिथे सुंदर आयुष्य जगते. मात्र, आता ती पैशांसाठी मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. ” असं नवाजुद्दीन सिद्दीकीने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.


हेही वाचा :

अजय देवगणच्या ‘भोला’ चित्रपटाचा ट्रेलर झाला प्रदर्शित; चाहत्यांनी केलं कौतुक