प्रेमाची वजनदार गोष्ट ‘सुंदरा मनामध्ये भरली’

Sundara Manamadhye Bharali Creative 1
सुंदरा मनामध्ये भरली

आजच्या काळात सौंदर्याची व्याख्या जरा बदलेली दिसते. म्हणतात ना ‘क्षणात मनामध्ये भरते ते रूप सहवासाने भरते ते स्वरूप’ अगदी तसंच काहीसं ! नजरेमध्ये जे भरतं त्यालाच काही लोक सौंदर्य मानतात. जोडीदाराच्या बाबतीत त्यांच्या अशाच काहीशा अपेक्षा असतात. प्रत्येकच तरुणाला हवी आहे ती सुंदर, झिरो फिगर, शेलाट्या बांध्याची साथीदार. अशाच एका लठ्ठ पण गोड मुलीची दमदार गोष्ट म्हणजेच ‘सुंदरा मनामध्ये भरली’. मधुगंधा कुलकर्णी यांनी या मालिकेची कथा लिहिली आहे. मालिकेत अक्षया नाईक लतिकाची भूमिका आणि समीर परांजपे अभिमन्यूची भूमिका साकारणार आहेत.

आपल्या सगळ्यांच्या घरात अशी एक व्यक्ती असते जिच्या असण्याने घराला घरपण येते. आपली ‘लतिका’ देखील अगदी अशीच आहे. उत्तम विनोदबुध्दी, खेळकर, शाळेपासून अभ्यासात प्रचंड हुशार, उत्तम स्वयंपाक करते. इतकं सगळं असून देखील निव्वळ शरीराने लठ्ठ असल्याने लहानपणापासून लतिकाला समाजाकडून टोमणे ऐकावे लागतात आणि याच एकमेव कारणाने तिचे लग्न देखील अद्याप जमले नाही. ३४ स्थळांकडून आजवर तिला नकार आला आहे. याउलट दिसायला देखणा, अंगापिडानं मजबूत, हुशार, सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारा असा आपला फिटनेस फ्रिक अभिमन्यू स्वत: फिट असलेल्या अभिमन्यूला अख्ख्या गावाला ‘फिट’ करायचं आहे म्हणून त्याला स्वत:ची व्यायामशाळा उघडायची आहे. अभिमन्यूचं स्वप्न आणि लतिकाचं लग्न यामध्ये दोघांच्या नशिबात काय वाढून ठेवलं आहे ? लग्नाबद्दल या दोघांचीही मत वेगळी आहेत. त्यांची मनं कशी जुळतील ? हा प्रवास पाहणं रंजक असणार आहे.

कथेच्या लेखिका मधुगंधा कुलकर्णी म्हणाल्या, “सौंदर्य बघणाऱ्याच्या नजरेत असतं म्हणतात.. पण तरी आपल्या समाजात सौंदर्याच्या कल्पनांची पाळंमुळं खोलवर रुजलेली आहेतच ! जाडी हा आपल्याकडे विनोदाचा विषय मानला जातो आणि जाडी माणसंही ! तिच्या जाडेपणापलीकडे असणारं तिचं आयुष्य आपण समाज म्हणून बघू शकतो का? ” सुंदरा मनामध्ये भरली ” ही अशाच एका समाजाने बेढब ठरवलेल्या संवेदशील मनाच्या मुलीची गोष्ट आहे.

मालिकेची निर्माती मनवा नाईक म्हणाली, ‘लॉकडाउनमुळे आलेली मरगळ दूर करण्याची संधी आम्हाला या’सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेमुळे मिळाली आहे या भावनेने संपूर्ण टीम प्रचंड काम करत आहे त्यामुळे एक नवा उत्साह आहे. मालिकेचा विषय खूप वेगळा आहे आणि त्याला आम्ही अतिशय साध्या सोप्या पध्दतीने मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. तेंव्हा आपण देखील लतिकाच्या प्रवासात सहभागी होऊया नक्की बघा ‘वजनदार मुलीची, दमदार कथा – सुंदरा मनामध्ये भरली’.