‘कलर्स मराठी’ वाहिनीवर आता विनोदाचा ॲटमबॉम्ब फोडायला सज्ज झाली आहे. ‘चला हवा येऊ द्या’ मधून घराघरात पोहोचलेले महाराष्ट्राचे लाडके डॉ. निलेश साबळे यांच्याबरोबर विनोदाची ही सुपरफास्ट मेल आता ‘कलर्स मराठी’घेऊन येते आहे. निलेश साबळे, भाऊ कदम आणि ओंकार भोजने विनोदाचे हे तीन हुकमी एक्के एकत्र येऊन महाराष्ट्राला खळखळून हसवणार आहेत. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर हा नवाकोरा विनोदी कार्यक्रम सुरू होतं आहे. या कार्यक्रमाचा पहिला प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे.
‘हसताय ना ? हसायलाच पाहिजे!’ असं या नव्या कार्यक्रमाचं नाव आहे. या कार्यक्रमाची लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन अशी संपूर्ण धुरा डॉ. निलेश साबळे सांभाळणार आहेत. यामध्ये भाऊ कदम, ओंकार भोजनेसह सुपर्णा श्याम , स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण आदी कलाकार पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे या कार्यक्रमात महाराष्ट्राचे विनोदाचे बादशहा, अत्यंत गुणी अभिनेते भरत जाधव आणि चार दशकं सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या अलका कुबल आठल्ये हे दोन महान कलाकार दर भागामधे सेलिब्रिटी पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला दाद देण्यासाठी लाभणार आहेत.
View this post on Instagram
‘कलर्स मराठी’च्या इन्स्टाग्राम पेजवर ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या नव्या कार्यक्रमाचा पहिला प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये निलेश साबळे, भाऊ कदम व ओंकार भोजने यांचा पहिला लूक पाहायला मिळत आहे. हे विनोदाचे तीन हुकमी एक्के नव्या जल्लोषात विनोदाची आतषबाजी करायला सज्ज झाले आहेत. ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ हा कार्यक्रम 20 एप्रिलपासून शनिवार- रविवार रात्री 9 वाजता प्रेक्षकांना खळखळून हसवायला येत आहे.
‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’च्या पहिल्या प्रोमोवर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, ‘तुम्हाला कलर्स मराठीवर पाहण्यासाठी खूप उत्सुक आहोत.’ तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, ‘जबरदस्त.’ तसेच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, ‘व्वा…आता मजा येणार’. चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, ‘अरे व्वा, एकसाथ तीन एक्के बाजी मारणार पक्के. खूप शुभेच्छा.’
________________________________________________________________________