मराठी सिनेविश्वात 13 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘नो एंट्री पुढे धोका आहे’ या चित्रपटातील कलाकारांची धमाल आणि ‘जपून जपून जा रे’ या गाण्याने अवघ्या प्रेक्षकांना वेड लावले होते. आजही हे गाणं वाजल्यावर कित्येकांचे पाय थिरकतात. या चित्रपटाचं क्रेझ अजूनही कायम असताना आता ‘नो एंट्री पुढे धोका आहे 2’ आपल्या भेटीसाठी येतोय. अखेर प्रेक्षकांची मागणी पूर्ण झाली असून अभिनेता अंकुश चौधरीने या आगामी चित्रपटाची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.
‘नो एंट्री पुढे धोका आहे 2’ येतोय
बॅालिवूड, हॅालिवूड आणि टॅालिवूडचं क्रेझ वाढत असताना आता ‘नो एंट्री पुढे धोका आहे 2- कॅामेडी ॲाफ टेरर्स’ हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. ‘नो एंट्री पुढे धोका आहे’ या चित्रपटाला मिळालेलं प्रेम पाहता या चित्रपटाच्या आगामी भागाबाबत प्रेक्षक किती उत्सुक असतील याचा अंदाज लावता येईल. ‘नो एंट्री पुढे धोका आहे 2- कॅामेडी ॲाफ टेरर्स’ हा चित्रपट डबल धमाल घेऊन आता प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. माहितीनुसार, निखिल सैनी फिल्म्स अँड एंटरटेनमेंट प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुश चौधरी करणार आहे. या चित्रपटाविषयी माहिती देताना अभिनेत्याने एक पोस्ट शेअर केली आहे.
पोस्टर रिलीज
अभिनेता अंकुश चौधरीने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. यामध्ये अंकुशच्या लूक एकदम स्टायलिश आहे आणि त्याच्या शेजारी दोन मुली दिसत आहेत. ज्या अर्ध्या मुलीच्या रूपात तर अर्ध्या रोबोटच्या रूपात दिसत आहेत. त्यामुळे हा चित्रपट रोबॉटिक असेल अशी शक्यता वर्तवली जातेय.
View this post on Instagram
मुख्य म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाची जादू पाहायला मिळणार आहे. त्यामुळे कॉमेडी जॉनर असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवणार यात शंकाच नाही. या चित्रपटाला नकाश अजीज आणि सरगम जस्सू यांचे संगीत लाभले आहे. अद्याप या चित्रपटात कोणकोणते कलाकार दिसणार? हे गुलदस्त्यात आहे.
अंकुशच्या वाढदिवशी चाहत्यांना रिटर्न गिफ्ट
अभिनेता आणि दिग्दर्शक अंकुश चौधरीचा काल (31 जानेवारी) वाढदिवस होता. यानिमित्त त्याने आगामी चित्रपट ‘नो एंट्री पुढे धोका आहे 2 – कॉमेडी ॲाफ टेरर्स’ची घोषणा केली आहे. याविषयी सांगताना त्याने म्हटले, ‘आज वाढदिवसाच्या निमित्ताने चाहत्यांनी माझ्यावर जो शुभेच्छांचा वर्षाव केला आहे, तो खूपच भारावणारा आहे. तुमच्या प्रेमाखातरच मी रिटर्न गिफ्ट म्हणून या चित्रपटाचा दुसरा भाग घेऊन येतोय. नो एंट्रीच्या पहिल्या भागावर प्रेक्षकांनी प्रेम केले. चाहत्यांचा आदर राखत आम्ही आज दुसऱ्या भागाची घोषणा करत आहोत’.
तसेच या चित्रपटाचा निर्माता निखिल सैनीने म्हटले, ‘आज अंकुश चौधरीचा वाढदिवस आहे. या चित्रपटाची घोषणा करण्यासाठी यापेक्षा चांगला दिवस कोणता असूच शकत नाही. चित्रपटाची टीम इतकी कमाल आहे, त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा भाग होताना आम्हाला निश्चितच आनंद होत आहे. प्रेक्षकांसह आम्हीसुद्धा या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहोत’.
हेही पहा –
Tina Datta : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री होणार बिनलग्नाची आई, म्हणाली