Nutan Birthday: लहान वयात अॅडल्ट चित्रपट ते संजीव कुमार यांच्या श्रीमुखात लगावली…नूतनचे अनोखे किस्से

अभिनेत्री नूतन हीचा आज ४ जूनला ८६ वा वाढदिवस आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक अष्टपैलू कलाकारांमध्ये जिची गणना होते ती अभिनेत्री नूतन हीचा आज ४ जूनला ८६ वा वाढदिवस आहे. नूतन हीने लहान वयातच चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. आपल्या या चार दशकांच्या चित्रपट कार्यकिर्दीत तिने ७० हून अधिक चित्रपटात वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या.

यातील सीमा, सुजाता, बंदिनी, छलिया, मिलन , सौदागर हे चित्रपट नूतनच्या करियरसाठी मैलाचा दगड ठरले. याच चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी नूतनला फिल्म फेयर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.

साधं, सालस आणि लोभस सौंदर्य लाभलेली नूतन स्वभावाने कणखर आणि कडक शिस्तीची होती. तिच्या याच करारीपणाचे अनेक किस्से आजही चर्चिले जातात. यात अभिनेता संजीव कुमार यांच्या कानाखाली तिने लगावल्याचा किस्सा ते लहानवयात तिने अॅडल्ट चित्रपटात केलेली भूमिका यांचाही संदर्भ आहे.

नूतन ही त्याकाळची अशी एकमेव मिस इंडिया होती जी अभिनेत्रीही होती. नूतनने मॉडलिंगच्या दुनियेत खळबळ उडवली होती. अवघ्या १६ वर्षाची असताना तिने १९५६ मध्ये मिस इंडियाचा मुकुट जिंकला होता. तसेच याच वेळी तिने मिस मसूरीचाही किताब जिंकला होता.

अभिनयक्षेत्रातही तिने बाजी मारली होती. अवघ्या १४ वर्षाची असताना हिंदी चित्रपटसृष्टीत नूतनने पदार्पण केले होते. नगीना हा तिचा पहीला चित्रपट होता. या चित्रपटाला फिल्म बोर्डाने अॅडल्ट फिल्मचा दर्जा दिला होता. यामुळे स्वत नूतनला देखील हा चित्रपट पाहता आला नव्हता. या चित्रपटात तिने अभिनेत्रीची भूमिका केली. मात्र तिचे वय लहान असल्याने थिएटरमधील कर्मचाऱ्याने तिला प्रवेश नाकारला.

तिने आपणच या चित्रपटातील अभिनेत्री असल्याचे त्याला वारंवार सांगितले. पण चित्रपट अॅडल्ट असून तुझे वय कमी असल्याचे सांगत त्याने तिला आत जाऊच दिले नव्हते. त्यावेळी हा किस्सा खूप गाजलाही होता.

नूतन त्यावेळी लोकप्रियतेच्या कळसावर होती. चित्रपटसृष्टीतील अनेकजण तिचे चाहते होते. याचदरम्यान अभिनेता संजीव कुमारबरोबर तिचे अफेयर सुरू असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. संजीव कुमारने मात्र यावर प्रतिक्रिया देणे टाळले. यामुळे त्या दोघांमध्ये खरंच प्रेमप्रकरण सुरू असल्याच्या चर्चांनी अधिकच जोर धरला. यामुळे नूतन प्रचंड चिढली होती. संजीव कुमार जाणूनबुजून हे करत असल्याचे तिच्या लक्षात आले. त्यानंतर नूतनने संजीव कुमारला याचा जाब विचारला. पण त्यावर संजीव कुमारने तिला उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे रागाचा पारा चढलेल्या नूतनने संजीव कुमारच्या श्रीमुखात लगावली. संजीव कुमारने केलेल्या या कृत्यामुळे नूतन मात्र दुखावली.

आजप्रमाणेच त्याकाळीही अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या अफेयर्सच्या चर्चा रंगायच्या. रात्री उशीरा पर्यंत चालणाऱ्या पार्ट्यांमध्ये त्यावर बोलले जायचे. पण नूतनने मात्र स्वतला या पार्ट्यांपासून दूर ठेवले होते. काही ठराविक व्यक्तींबरोबरच तिचे उठणे बसणे असायचे. यामुळे नूतनने आयुष्य सोबती म्हणूनही अभिनेत्याची निवड न करता नौदलातील एक अधिकारी रजनीश बहल यांच्याशी १९५९ साली विवाह केला.

लग्नानंतर तिने चित्रपटात काम करणे बंद केले. पण तरीही तिला चित्रपटाच्या ऑफर्स येत होत्या. पण याचदरम्यान तिला बंदिनी चित्रपटाची ऑफर आली. या चित्रपटाने नूतनला अभिनय क्षेत्राच्या एका परमोच्च शिखरावर पोहचवले. त्यानंतर नूतनला दिवस गेले. नंतर मात्र तिने कुटुंबाला प्राधान्य देत चित्रपटसृष्टीपासून स्वतला कायम दूर ठेवले.