घर मनोरंजन O My God 2 : देवाचा सहारा घेत बात होते 'सेक्स एज्युकेशन'ची

O My God 2 : देवाचा सहारा घेत बात होते ‘सेक्स एज्युकेशन’ची

Subscribe

– हर्षदा वेदपाठक

बच्चन पांडे, रामसेतू, सम्राट पृथ्वीराज, सेल्फी, बेल बॉटम, रक्षाबंधन या आपटलेल्या चित्रपटानंतर निर्माता आणि अभिनेता अक्षय कुमार ‘ओह माय गॉड 2’ (O My God 2) या सामाजिक असलेल्या विषयांसह आला आहे. 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या ओह ‘ओह माय गॉड’ या चित्रपटाचा भाग दोन असलेल्या या चित्रपटांमध्ये दिग्दर्शक अमित राय (Directed Amit Rai) यांनी शाळेमध्ये शिकवला जाणारा सेक्स एज्युकेशन (Sex Education) यासारखा प्रभावी विषय मांडला आहे. (O My God 2 Taking the help of God there was talk of Sex Education)

- Advertisement -

समाजामध्ये जिथे सेक्स या विषयावरच कमी बोलले जाते, तेथे सेक्स एज्युकेशन या विषयावर कोण बोलणार? शाळेमध्ये सेक्स एज्युकेशन देणे गरजेचे आहे. या विषयावर चित्रपट बनवून ही काळाची गरज होती, हे दाखवून दिले आहे. परंतु निर्माता मंडळींचा या विषयांमध्ये दाखवलेला विश्वास हे प्रामुख्याने धाडसाचे पाऊल मानायला पाहिजे. भारतातील अनेक राज्यांमध्ये, शाळेमध्ये सेक्स एज्युकेशन हे वर्ज आहे. अशा वेळेला समाजामध्ये कुमारवयीन मुलं आणि मुलींचे प्रश्न काय असतात ते समजून घेऊन, सोडवण्याची गरज ही फार महत्त्वाची आहे हा मुद्दा चित्रपट मांडतो.

2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ओह माय गॉड’ या चित्रपटांमध्ये धार्मिक स्थळांचे झालेले व्यापारीकरण आणि देवाच्या नावाखाली चाललेली लूट या विषयावर लक्ष केंद्रीत केले गेले होते. तसेच एक नास्तिक व्यापारी देवाच्या प्रमुखांना न्यायालयात दावेदार करतो, त्यांचे कथन होते. त्या चित्रपटात अक्षय कुमार हा भगवान कृष्ण झालेला दिसून आला तर, ‘ओह माय गॉड 2’ मध्ये अक्षय कुमार महादेवाच्या भूमिकेत दिसून येईल. विशेष म्हणजे अक्षय कुमारचे दिसणे हे प्रत्यक्ष भगवान शिव सारखे नसून, त्याने पाठवलेल्या दूताप्रमाणे पाहायला मिळते आणि तशी खात्री निर्माता तसेच सेन्सॉर बोर्ड यांनी घेतली असल्याचे दिसून येते.

- Advertisement -

अज्ञाना अभावी, आपल्याच क्लासमध्ये मुलांनी छेडल्यामुळे विवेक (आरुष वर्मा) हा शाळेमध्ये हस्तमैथुन करताना पकडला जातो. त्यानंतर त्याचे सहकारी, शाळा, कुटुंबीय आणि समाज या घटनेवर त्याच्याकडे गुन्हेगार म्हणून पाहू लागतात. आपला मुलगा चुकला पण तो गुन्हेगार नाही या विचाराने त्याचे वडील कांती (पंकज त्रिपाठी) हे मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. सेक्स एज्युकेशन हे शरमेचे काम असून, गल्लोगल्ली असलेले भोंदू सेक्स डॉक्टर, पिस्क्रिप्शन शिवाय औषध विकणारे केमिस्ट आणि सेक्स एज्युकेशन पाप आहे, हे मानणारी शाळा या चौघांना कांती न्यायालयात खेचतात. तिकडे त्यांचा सामना कामिनी महेश्वरी (यामी गौतम) या चतुर वकिलाबरोबर होतो. वकिलीची काहीही माहिती नसताना, कांती शाळेला आणि समाजाला दाखवून देतो की, सेक्स एज्युकेशन किती महत्त्वाचे आहे.

‘ओह माय गॉड 2’ चे कथानक वेगळे आहे. परंतु सेक्स एज्युकेशन या विषयाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी देवाच्या कथेचा सहारा का घेतला गेला ते काही समजून येत नाही. सव्वा दोन तासाची लांबी असलेल्या ‘ओह माय गॉड 2’ मध्ये कथानक उत्तम असून देखील, बऱ्याच ठिकाणी संहिता रटाळ वाटते. कोणालाही न दुखवता आधुनिक हिंदुत्वाला पुढे करत ‘ओह माय गॉड 2’ चे कथानक पुढे सरकते. त्यात धर्माचा पसारा, भक्तांची विचारसरणी आणि सामाजिक मागासलेपण यांचा वापर हा गरजेचं म्हणून नव्हे तर, पांगुची काठी म्हणून केलेला दिसून येतो, ते खटकते.

शिक्षणाचा दर्जा, शिक्षणाचा मुलांवर असलेला बोजा, यावर कुठेही भाष्य न करता कांती फक्त ‘सेक्स एज्युकेशन’वरच भर देतो. जेणेकरून समाजातला राक्षस नष्ट होणार, अशी प्रतिमा तयार होते. विवेक ज्या कारणामुळे वेगळं वागायला लागतो, त्या मुद्द्याचाच लेखक दिग्दर्शक अमित राय यांना विसर पडल्याचे दिसून येते.

‘रोड टू संगम’ या चित्रपटानंतर लेखक दिग्दर्शक अमित राय यांचा दुसरा चित्रपट आहे. पहिल्या चित्रपटाप्रमाणेच दिग्दर्शक येथे विवादात्मक विषयावर, विनाकारण आकार तांडव न करता फक्त एककल्ली विषयावर लक्ष केंद्रित करतो. त्यात तो उपलब्ध असलेले दाखले देण्यास विसरत नाही. असंच काहीसं ‘ओह माय गॉड 2’ मध्ये झाले. कांती आपल्या मुलासाठी अजिंठा, वेरूळ येथील शिल्पशास्त्र तसेच धर्मावरील अनेक पुस्तकाचा आधार घेत, सेक्स एज्युकेशन भारतामध्ये अनेक वर्ष शिकवले जात होते, परंतु ब्रिटिश राजवटीमध्ये ते शिक्षण बंद करण्यात आले. यासह अनेक मुद्यांना कांती वाचा फोडतो. मुख्य म्हणजे दिग्दर्शकाच्या नजरेमध्ये त्याला कोणताही वाद अंगावर ओढून घ्यायचा नाही. वाद असेल तिकडे पुराणांमध्ये असलेल्या दाखल्यांची यादी देतो आणि आपल्या चित्रपटात आकाशातून काही आणले नाही हे तो दाखवून देतो.

अक्षय कुमार याची महादेवाचा दूत म्हणून असलेली भूमिका ही कांतीला ज्ञान देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी आहे. जेव्हा कधी कांतीला अडचण येते तेव्हा भगवान शिव येणारच हे समीकरण होते. हे समीकरण त्याने प्रत्येक वेळेला, वेगळ्या प्रकारे सादर केलेले दिसून येते. अक्षय कुमारने आपली दुताची भूमिका निवांतपणे, प्रसन्नरित्या केल्याचे दिसून येते. हाणामारीसाठी प्रसिद्ध असलेल्या अक्षय कुमारची शांत, सयंत भूमिका लक्षात राहते. कुठेही संवाद, अभिनय किंवा अतीव हाणामारी येथे दिसत नाही तर, देवाचे अस्तित्व हे भक्तासाठीच आहे हा विचार रूजवण्यास तो समर्थ ठरतो. चरित्र अभिनेता म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंकज त्रिपाठी यांनी दोन कुमारवयीन मुलींचे मुलांचे वडील म्हणून आपल्या मुलांसाठी धडपडणारा पिता म्हणून चपखल बसतात. शालीन, संस्कारी आणि आपल्या मुलाला वाचवण्यासाठी धडपडणारा पिता, देवावर नितांत श्रद्धा असलेला, सामाजिक बांधिलकी जपणारा पिता म्हणून पंकज त्रिपाठी उत्तमरीत्या जमतात.

कांतीची बायको म्हणून गीता अग्रवाल शर्मा ही विविधता देताना लक्षात राहते. खास करून तिचा न्यायालयामध्ये कामिनी बरोबर असलेला संवाद, ती सशक्त अभिनेत्री असल्याचे दिसून येते. पवन मल्होत्रा यांनी साकारलेला जज्ज, विजेंद्र काला यांनी साकारलेला तज्ञ सेक्स डॉक्टर हे सहाय्यक भूमिकेत उत्तम साथ देतात. अरुण गोवील यांनी साकारलेला शाळेचा संचालक, गोविंद नामदेव यांनी साकारलेले शाळेचे ट्रस्टी या भूमिका उत्तम रीतीने सहाय्यक ठरतात.

यामी गौतम हिने साकारलेली कामिनी वकील ही सफाईदार वाटते. परंतु 2023 जमान्यांमध्ये वकील असलेली कामिनी ही ‘सेक्स एज्युकेशन’ मानत नाही आणि जाणत नाही हे थोडं अविश्वसनीय वाटते. ‘ओह माय गॉड 2’ मधील सिनेमॅटोग्राफी उत्तम असून, वेगवेगळे मूड टिपण्यास सहाय्यक ठरते. संकलन देखील बरे आहे. पार्श्व संगीत आणि संगीत म्हणाल तर भगवान शंकर यांची स्तुती आणि भजन यांचा केलेला वापर, पटकथेला धरून असल्याचे दिसून येते.

अक्षय कुमारच्या अभिनित ‘टॉयलेट’, ‘पॅडमॅन’ या चित्रपटाप्रमाणे सामाजिक बांधिलकी जपत अक्षय कुमारने ‘ओह माय गॉड 2’ मध्ये ‘हस्तमैथुन’ आणि ‘सेक्स एज्युकेशनट या विषयावर भर दिलेला दिसून येतो. हा विषय काळाची गरज असल्याचे वाटू लागते. मात्र चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने ए सर्टिफिकेट दिले आहे. ज्यामुळे, अठरा वर्षावरील प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता येणार आहे. मग ज्या कुमार वयोगटासाठी हा चित्रपट केला आहे. तो वयोगटात या चित्रपटापासून वंचित राहणार असे दिसते. परंतु बालकांच्या पालकांनी या दोन्ही विषयावर लक्ष केंद्रित केले तर, काळाची गरज काय ते समजून घेण्यास मदत होईल. आपल्या मुलांना समजावून घेणे, त्यांचे मनोधैर्य वाढवणे हे जरी पालकांनी केले तरी, मुलांमधील अनेक प्रश्न सुटू शकतात हे ‘ओह माय गॉड 2’ हा चित्रपट अधोरेखित करतो.

- Advertisment -