या मालिकेच्या चित्रीकरणावेळी दिग्दर्शकाकडून अश्लिल भाषा

अभिनेता निवास मोरे यांचा आरोप; नाशिकच्या कलाकारांना हिन वागणूक मिळत असल्याचा दावा

Director

नाशिक- मुंबईपाठोपाठ मालिकांच्या चित्रीकरणासाठी नाशिकची निवड केली जात असल्यामुळे स्थानिक कलाकारांनाही आपला कलाविष्कार दाखविण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे सध्या विविध स्थानिक कलाकारांकडून आपापल्या मालिकांचे जोरदार ब्रॅण्डींग सुरु आहे. मात्र नाशिकमध्ये सुरु असलेल्या मालिकेत येथील स्थानिक कलाकारांनी किती हिन वागणूक दिली जाते, हे सांगणारी पोस्ट येथील प्रसिद्ध कलाकार निवास मोरे यांनी सोशल मीडियावर टाकली आहे. या मालिकेच्या दिग्दर्शकाकडून महिला कलाकारांसमोर अश्लिल भाषेचा वापर केला जात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या पोस्टला अनेक नेटकर्‍यांनी समर्थन दिले असले तरी इतर कलाकार मात्र उघडपणे यासंदर्भात मत मांडायला तयार नाहीत. अर्थात या पोस्टमुळे ’तो’ दिग्दर्शक चांगलाच ट्रोल झाला आहे.

मराठी मालिका या समाजाचं प्रतिबिंब असतात, त्यातून एकत्र कुटुंब पद्धती, संस्कार, चालीरिती दाखवल्या जातात. त्यामुळेच त्या लोकप्रियतेच्या शिखरावरही पोहोचतात. मात्र, याच मालिकांच्या पडद्याआड जे काही चालतं ते मालिकेच्या नेमकं विपरित असते, याचा प्रत्यय नाशिकचे कलाकार निवास मोरे यांनी घेतला. एका मराठी चॅनेलवरील मालिकेचे चित्रिकरण गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये सुरू आहे. या मालिकेमध्ये काम मिळाल्याने मोरे यांनी अत्यंत आनंदात हे काम स्विकारले. मात्र, चित्रिकरणादरम्यान दिग्दर्शकाकडून कलाकारांची कशी पिळवणूक होते, याचा वाईट अनुभव मोरेंना आला. मोरेंनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केलीय. नाशिकच्या कलाकारांच्या नावाने बोटे मोडणारी मंडळी टीआरपी वाढला की नाशिकच्याच कलाकारांना कमी बजेटमध्ये घेतात आणि त्यांचे शोषण करतात. छोट्या पडद्यावर झळकण्याची मनस्वी इच्छा असलेले कलाकार निमूटपणे दिग्दर्शकांचा हा अत्याचार सहन करत असतात. अन्य काही मालिकांबाबतही स्थानिक कलाकारांचा असाच अनुभव आहे.

कामासाठी कलाकारांना स्वखर्चाने मुंबईला बोलवले जाते. मात्र, कलाकार संधी जाईल, या भीतीने हे सारे निमूटपणे सहन करत असतो. मोरे यांनी लिहिलेल्या पोस्टनुसार, मालिकेच्या सेटवर कलाकारांना अतिशय वेठबिगाराप्रमाणे वागवले जाते. एक शिफ्ट सांगून दीड-दोन शिफ्टमध्ये काम करवून घेतलं जातं. कलाकार संघटित नसल्यामुळे त्यांचा आवाज दाबला जातो. गवंडी, सुतार ८ तासाचे ९०० ते हजार रुपये घेतात. मात्र, सेटवर दीड-दोन महिने उलटूनही ४८-४८ तास अहोरात्र काम करुनही कलाकारांना अवघे हजार-बाराशे रुपये हाती मिळतात. त्यातही पेट्रोल अलाऊन्स दिला जात नाही. लाईटवाल्यांना ओव्हरटाईम केल्यास दीड शिफ्टचे पैसे मिळतात, मात्र कलाकारांना कोणताही मोबदला दिला मिळत नाही.

अश्लील शब्दांचा वापर

सेटवर या सिरीयलच्या दिग्दर्शकाकडून अत्यंत अश्लील भाषा वापरली जाते. त्या शब्दांमुळे महिला कलाकारांना शरमेने मान खाली घालावी लागते. सेटच्या ठिकाणी स्वच्छतागृह नाही, कपडे बदलण्यासाठी महिला-पुरुषांना एकच खोली, जेवणाची चांगली सुविधा नाही.