घर मनोरंजन 25 ऑगस्टला ‘सुभेदार’ चित्रपटगृहांत...

25 ऑगस्टला ‘सुभेदार’ चित्रपटगृहांत…

Subscribe

महाराष्ट्राच्या शिवकालीन इतिहासातील प्रत्येक पान मराठयांच्या अतुलनीय शौर्याने भरलेलं आहे. सुभेदार तान्हाजी मालुसरेंचा कोंढाण्यावरील पराक्रम, ही अशीच एक अद्वितीय सुवर्णगाथा २५ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या ‘सुभेदार’ या मराठी चित्रपटातून आपल्यासमोर उलगडणार आहे. सुभेदारांची अभंग स्वामीनिष्ठा, दुर्दम्य आत्मविश्वास आणि त्याला तळपणाऱ्या तलवारीची साथ या सगळ्यांचं दर्शन आपल्याला या चित्रपटातून होणार आहे.

लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी याआधीच्या ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ या चित्रपटांच्या जबरदस्त यशातून त्यांची या विषयावरची आपली कमालीची पकड सिद्ध केली आहे. ‘सुभेदार’ चित्रपटाच्या टिझर, ट्रेलर, गाण्यांमधून प्रेक्षकांची उत्सुकता याआधीच शिगेला पोहचली आहे. राज्यातील शेकडो चित्रपटगृहांसह, देशातील महत्त्वाच्या शहरांतून तसेच ६ विविध देशांमध्ये ‘सुभेदार’ शुक्रवार २५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

- Advertisement -

सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमा सोबतच त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याचे पदर, कुटुंबाने दिलेली तितकीच मोलाची साथ याचे दर्शन ‘सुभेदार’ चित्रपटात होणार आहे.

- Advertisement -

मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर, समीर धर्माधिकारी, अभिजीत श्वेतचंद्र, स्मिता शेवाळे, उमा सरदेशमुख, अलका कुबल, ज्येष्ठ दिग्दर्शक मा.राजदत्त, दिग्पाल लांजेकर, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, शिवानी रांगोळे, विराजस कुलकर्णी, अजिंक्य ननावरे, रिषी सक्सेना, नूपुर दैठणकर, अर्णव पेंढारकर आदि मराठीतील दिग्गज कलाकार या चित्रपटामध्ये आहेत. चित्रपटातील ‘मावळं जागं झालं रं’, ‘आले मराठे’, ‘हळद लागली रायबाला’ ही तीनही गाणी सध्या तुफान गाजतायेत. देवदत्त बाजी, अवधूत गांधी, सुवर्णा राठोड, रोहित राऊत, निधी हेगडे यांच्या स्वरांनी या चित्रपटातील गाणी सजली असून संगीतकार देवदत्त बाजी यांचे संगीत गाण्यांना लाभले आहे.

ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची प्रस्तुती असलेल्या ‘सुभेदार’ चित्रपटाची निर्मिती राजवारसा प्रोडक्शन्स, मुळाक्षर प्रोडक्शन्स प्रा.लि, पृथ्वीराज प्रोडक्शन, राजाऊ प्रोडक्शन, परंपरा प्रोडक्शन्स यांनी केली आहे. प्रद्योत पेंढारकर, अनिल वरखडे, दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, श्रमिक गोजमगुंडे, विनोद जावळकर, शिवभक्त अनिकेत जावळकर, श्रुती दौंड हे ‘सुभेदार’ चित्रपटाचे निर्माते आहेत.


हेही वाचा :  मल्टीस्टारर “इंद्रधनुष्य” च्या चित्रीकरणाला लंडनमध्ये सुरुवात

- Advertisment -