दाक्षिणात्य सिनेमाचा सुपरस्टार बाहुबली फेम अभिनेता प्रभास कायम वेगवेगळे प्रयोग करताना दिसतो. याआधी साकारलेल्या भूमिका आणि आगामी काळात साकारत असलेल्या भूमिकांमध्ये तो नेहमीच वेगळेपण देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे प्रभासचा चाहता वर्ग त्याच्या आगामी सिनेमांबाबत कायम उत्सुक असतो. अशातच गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेला बहुप्रतीक्षित सिनेमा ‘कन्नप्पा’तील प्रभासचा फर्स्ट लूक समोर आला आहे. जो पाहून प्रेक्षकांची सिनेमाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (Prabhas First Look Released From Movie Kannappa)
कपाळी त्रिपुंड अन गळ्यात रुद्राक्ष माळा
अभिनेता प्रभासचा आगामी सिनेमा ‘कन्नप्पा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तत्पूर्वी या सिनेमातील प्रभासचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. प्रभासच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर त्याच्या लूकचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. ज्यामध्ये प्रभासचा लूक फारच लक्षवेधी दिसतोय.
View this post on Instagram
जटांनी भरलेले मोकळे केस, कपाळावर त्रिपुंड आणि गळ्यात रुद्राक्षाच्या माळा परिधान केलेला प्रभास अत्यंत प्रभावी भूमिकेत असल्याचे समजते. त्याचा एकूणच लूक एखाद्या साधुसारखा आहे. यावेळी त्याच्या हातात असलेली अर्धचंद्र काठीदेखील लक्ष वेधून घेतेय. या पोस्टरवर प्रभास साकारत असलेल्या भूमिकेचे नाव ‘रुद्र’ असल्याचे सांगण्यात आले आहे.
दिव्य रक्षक ‘रुद्र’
हे पोस्टर नीट पाहिले असता त्यावर लिहिलेला मजकूर दिसतो. ज्यात लिहिलंय, ‘तो एक भयंकर वादळ आहे! भूतकाळ आणि भविष्यकाळाचा मार्गदर्शक आहे. तो भगवान शिवाच्या आज्ञेने राज्य करतो!’ तसेच हे पोस्टर शेअर करताना प्रभासने कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘दिव्य रक्षक रुद्र. रुद्र म्हणून माझा लूक रिलीज करतोय. कन्नप्पातील अटल रक्षक म्हणून शक्ती आणि ज्ञानाचे मूर्त स्वरूप. भक्ती, त्याग आणि प्रेमाचा एक कालातीत प्रवास. 25 एप्रिल 2025 रोजी थिएटरमध्ये येणाऱ्या या महाकाव्यासाठी आमच्यासोबत कनेक्ट व्हा! #हरहरमहादेव’.
प्रभासच्या लुकला प्रेक्षकांची पसंती
अभिनेता प्रभासच्या फर्स्ट लूकला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. सोशल मीडियावर त्याचं हे पोस्टर तुफान व्हायरल होतंय. या पोस्टरवर अनेकांनी विविध कमेंटच्या माध्यमातून आपली पसंती दर्शवली आहे. प्रभासचा दिव्य आणि आकर्षक लूक पाहून आपण भारावून गेल्याचे अनेक नेटकऱ्यांनी म्हटले आहे. एकाने लिहिले, ‘हा एकमेव असा अभिनेता आहे जो स्टारडमचा नव्हे तर प्रेक्षकांना काय आवडेल याचा विचार करतो’. तर आणखी एकाने म्हटले, ‘टॉलिवूड, बॉलिवूड, हॉलिवूड सगळं एकाबाजूला.. कारण इथे फक्त रेबेलवूड सुरु आहे. ग्रेट गोइंग प्रभास’. याशिवाय ‘बॉक्स ऑफिसचा बाप’, ‘भारतीय सिनेमाचा राजा’ असेही काहींनी म्हटले आहे.
खिलाडीचा साऊथ डेब्यू
बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमार येत्या काळात साऊथ सिनेविश्वात डेब्यू करणार अशी चर्चा होती. अखेर या चर्चा वास्तव असल्याचे समोर आले आहे. माहितीनुसार, सुपरस्टार प्रभासचा आगामी सिनेमा ‘कन्नप्पा’मध्ये अभिनेता अक्षय कुमार अत्यंत महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. मुकेश कुमार सिंग दिग्दर्शित आणि एम. मोहन बाबू निर्मित या सिनेमात अक्षय कुमार महादेवाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे समजत आहे. अलीकडेच सिनेमाच्या निर्मात्यांनी अक्षय कुमारच्या भूमिकेचे पोस्टर रिलीज केले होते. त्यानंतर खिलाडीचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहू लागले आहेत.
View this post on Instagram
‘कन्नप्पा’ हा सिनेमा आपल्याला भक्तिमय प्रवासावर घेऊन जाणारा सिनेमा आहे. हा सिनेमा महादेवावर असलेल्या अढळ भक्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या आदरणीय शैव संत कन्नप्पा नयनार यांच्या जीवनावर बेतलेला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन मुकेश कुमार सिंग यांनी केले आहे. तर एम. मोहन बाबू यांनी निर्मितीची सूत्रे सांभाळली आहेत. या सिनेमातून विष्णु मांचू, मोहनलाल, अक्षय कुमार, काजल अग्रवाल आणि प्रभाससारखे दमदार कलाकार आपल्या भेटीस येणार आहेत. हा सिनेमा येत्या 25 एप्रिल 2025 रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
हेही पहा –
Sachin Pilgaonkar : सचिन पिळगांवकरांच्या स्थळ चित्रपटाचा रंजक टिझर रिलीज