प्रभासच्या चाहत्यांच्या भेटीस ‘साहो’ चित्रपटाचा व्हिडीओ गेम

प्रभासने गेमचा फर्स्ट लूक इंस्टाग्रामवर केला शेअर

बहुचर्चित बाहुबली चित्रपटानंतर अभिनेता प्रभासच्या येणाऱ्या साहो चित्रपटाबद्दल प्रेक्षकांसह चाहत्यांमध्ये देखील उत्सुकता बघायला मिळत आहे. नुकताच चित्रपटातील ‘आयो मेरा सैय्या सायको’ गाणे प्रदर्शित झाले असून या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटामध्ये प्रभाससोबत अभिनेश्री श्रद्धा कपूर दिसणार असून या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच ही जोडी स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

बाहुबली चित्रपटानंतर प्रभासच्या येणाऱ्या साहोची क्रेझ चाहत्यांमध्ये पहायला मिळत आहे. चाहत्यांमध्ये हाच उत्साह सतत टिकवून ठेवण्यासाठी निर्मात्यांनी चित्रपटाचा गेम लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे.

या गेमचे नाव ‘साहो द गेम’ असे आहे. प्रभासने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या गेमचे पहिले पोस्टर शेअर केले आहे. हा गेम अॅक्शनने परिपुर्ण असून गेम खेळणारा व्यक्ती नायकाच्या (प्रभासच्या) भूमिकेत शहरातील शत्रूंना मारताना दिसणार आहे. प्रभासने गेमचा फर्स्ट लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यांनी सांगितले की, हा गेम लवकरच लाँच होणार आहे.

या साहो गेमचे पोस्टरमुळे चाहत्यांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान गेम जिंकणाऱ्या स्पर्धकाला साहो गुडी बॅग आणि चित्रपटाची तिकिटे गिफ्ट म्हणून देण्यात येणार आहेत. हैद्राबादमध्ये असणाऱ्या भारतातील एका प्रमुख गेम सर्विस कंपनीने हा गेम लॉन्च करण्याची जबाबदारी घेतली आहे.

साहो द गेम ऑगस्ट महिन्या दरम्यान लाँच करण्यात येणार आहे. ‘साहो’मध्ये प्रभास एका गुप्तहेराच्या भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट तेलगू, तामिळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सुजीत यांनी दिग्दर्शित केलेला साहो चित्रपट ३० ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटात श्रद्धा कपूरशिवाय नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, चंकी पांडे, महेश मांजरेकर हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.