आज महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यात धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे. यावेळी मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि तिचे सहकलाकार शिवस्तुती नृत्याविष्कार सादर करणार होते. या कार्यक्रमाला मंदिराच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी विरोध केल्यानंतर सर्वत्र कार्यक्रमाची चर्चा झाली. यातून अनावश्यक प्रसिद्धी मिळाल्याने अवास्तव गर्दीची भीती व्यक्त केली जातेय. यामुळे प्राजक्ता माळीने या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले आहे. (Prajakta Mali declared that she will not perform in Trimbakeshwar Temple)
अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर स्टोरीमध्ये हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओत प्राजक्ताने म्हटलंय, ‘नमस्कार, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आज महाशिवरात्रीनिमित्त होणारा त्र्यंबकेश्वर मंदिरातील कार्यक्रम शिवार्पणमस्तु.. पहिल्यापासूनच या कार्यक्रमाला फार प्रसिद्धी द्यायची नाही असं ठरलं होत. मंदिराचं प्रांगण, तिथलं क्षेत्रफळ, तिथे किती माणसं कार्यक्रम पाहण्यासाठी बसू शकतात याचा विचार करता मी सोशल मीडियावर या कार्यक्रमाची माहिती दिली नव्हती आणि त्या गोष्टीला प्रसिद्धी दिली नव्हती’.
View this post on Instagram
‘काल दिवसभरात या कार्य्रक्रमाला अनावश्यक प्रसिद्धी मिळाली आणि त्यामुळे आता अवास्तव गर्दीची भीती, काळजी प्रशासनाच्या मनात आहे. त्यामुळे मी माझ्या कुटुंबियांशी बोलून असा निर्णय घेतेय की, कमिटमेंट आहे त्यामुळे कार्यक्रम होईल. माझे सहकलाकार तिथे परफॉर्म करतील, सादर करतील. माझ्याशिवाय.. अर्थातच याने माझ्या आनंदावर विरजण पडणार आहे. परंतु वैयक्तिक सुखापेक्षा आपल्यामुळे प्रशासनावर अतिरिक्त ताण येऊ नये, ही बाब मला जास्त महत्वाची आणि मोठी वाटते. त्यामुळे सर्वस्वी मी हा निर्णय घेतेय. अर्थातच जिथे भाव असतो तिथे देव असतो, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे मी कुठेही बसून शिवाची आराधना केली तरी ती शिवापर्यंत पोहोचणार आहे. तिथे कुणाचाही हिरमोड होऊ नये आणि कुणाच्याही मनात शंका उत्पन्न होऊ नये म्हणून माहितीकरता मी हा व्हिडीओ बनवतेय. हर हर महादेव!’
हा कार्यक्रम त्र्यंबकेश्वर देवस्थानाच्या विश्वस्त मंडळाने आयोजित केला होता. ज्याला मंदिराच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी तीव्र विरोध दर्शवला होता. त्र्यंबकेश्वर मंदिर हे केंद्रीय पुरातत्व संस्थेच्या अधिपत्याखाली आहे आणि संस्थेच्या नियमावलीनुसार अशा कार्यक्रमांना परवानगी नसते. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या इतिहासात कधीही असे सेलिब्रिटी वा अभिनेत्री बोलावून कार्यक्रम झालेले नाहीत. इथे केवळ धार्मिक कार्यक्रम केले जातात. महाशिवरात्रीमुळे मंदिरात मोठी गर्दी असेल. अशावेळी भाविकांच्या गर्दीचे नियोजन, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.
हेही पहा –
Sai Tamhankar : समीर चौघुले आणि सई ताम्हणकरची हटके जोडी पहिल्यांदाच एकत्र