घरमनोरंजनविक्रमादित्य प्रशांत दामले ! सुख म्हणजे नक्की काय असतं...

विक्रमादित्य प्रशांत दामले ! सुख म्हणजे नक्की काय असतं…

Subscribe

पुन्हा एकदा नाट्यवीर प्रशांत दामलेंनी मराठी रंगभूमीवर आणखी एक विक्रम नोंदवला आणि त्याची चर्चा सध्या सगळीकडे चालू आहे. प्रशांतनी रविवारी ६ नोव्हेंबर रोजी षण्मुखानंद सभागृहात त्यांच्या कारकिर्दीतील १२५००वा नाट्यप्रयोग सादर केला. आणि मुख्य म्हणजे तेवढ्याच जोशात आणि जल्लोषात तो साजराही केला !… रसिक प्रेक्षकांनी या विक्रमी प्रयोगाला भरभरून दाद दिली. २७०० प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था असलेले षण्मुखानंद सभागृह तुडुंब भरले होते. या क्षणी प्रशांत दामले यांना शुभेच्छा देण्यासाठी रसिक प्रेक्षक तर उपस्थित होतेच, सोबतच मराठी चित्रपट सृष्टीतील आणि नाट्यसृष्टीतील अनेक मान्यवर, कलाकार उपस्थित होते. प्रशांत दामलेंवर शुभेच्छांचा आणि स्तुतिसुमनांचा वर्षाव झाला.

प्रशांतनी आजतागायत त्यांच्या एकूण 39 वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत नाटक, सिनेमा आणि मालिकांमधून वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. आतापर्यंत त्यांनी 30 ते 32 नाटकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनापासूनच नाटकांच्या प्रेमात असलेल्या प्रशांतच्या अभिनय कारकिर्दीची 1983 साली खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. टूर टूर या मराठी नाटकापासून प्रशांत दामले यांची विनोदी अभिनेता म्हणून सुरुवात झाली. त्यांच्या पुढील नाट्य प्रवासात मोरूची मावशी, ब्रह्मचारी, गेला माधव कुणीकडे, लेकुरे उदंड झाली, चार दिवस प्रेमाचे, सुंदर मी होणार, जादू तेरी नजर, संगीत संशयकल्लोळ, कार्टी काळजात घुसली, साखर खाल्लेला माणूस, एका लग्नाची गोष्ट आणि एका लग्नाची पुढची गोष्ट अशा महत्त्वाच्या नाटकांचा समावेश आहे. सोबतच प्रशांतनी जवळजवळ 38 ते 40 मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. यामध्ये पुढचं पाऊल ,आनंदी आनंद, सगळीकडे बोंबाबोंब, रेशिमगाठी, इना मीना डिका, पसंत आहे मुलगी, बाप रे बाप, धुमाकूळ, आपली माणसे, वाजवा रे वाजवा, चार दिवस सासूचे, सवत माझी लाडकी, चल गंमत करू, तू तिथं मी, वेलकम जिंदगी, आणि मुंबई पुणे मुंबई अशा चित्रपटांचा समावेश आहे. मराठी रंगभूमीवरील प्रशांत ची विनोदी शैली आणि त्यांच्या अभिनयातील सहजता लक्षात घेऊनच निर्माते विजय नेवाळकर यांनी प्रशांतना त्यांच्या ‘पुढचं पाऊल’ या चित्रपटात भूमिका देऊ केली होती. परंतु प्रशांत यांचे मन खऱ्या अर्थाने रमले ते नाटकांमध्येच !

- Advertisement -

मधल्या काळात अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रशांतला मराठी सोबतच हिंदी मालिकांमध्ये देखील काम करण्याची संधी प्राप्त झाली. प्रशांतच्या खवय्येगिरीने प्रेरित असा, झी मराठी वाहिनीवरील प्रशांतचाच ‘आम्ही सारे खवय्ये’ हा पाककृती शो खूप लोकप्रिय झाला.

प्रशांतन दामलेंनी आपल्या नाटकांमधून निखळ मनोरंजनाला प्राधान्य दिले. त्यामुळे प्रशांतनी विनोदाची कास कधीच सोडली नाही. प्रशांतच्याच भाषेत सांगायचं झालं तर ते म्हणतात, “ मी जेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ या दिग्गजांबरोबर काम करत होतो तेव्हा मला कळलं की, विनोद करणं किती कठीण आहे. कारण अभिनयात फ्रॅक्शन ऑफ सेकंद हे जर तुम्हाला जमलं तरच विनोदनिर्मिती होते… आणि हे खरं चॅलेंज आहे. आणि मला अतिशय अभिमान आहे की मी विनोदी नाटक करतो !… सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्हाला सतत काहीतरी उपदेश चालू असतात. आणि हे उपदेश कसे ढोबळ आणि विनोदी असतात हेच तर मी नाटकातून दाखवत असतो.”

- Advertisement -

मिस्कील विनोदासोबतच प्रशांतची गाण्याची आवडही सर्वश्रुत आहे. त्यामुळे त्यांनी एवढ्या वर्षांत आपला गळाही सांभाळला आहे. त्यांच्याच नाटकातील त्यांचे ‘मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं’ हे गाणे सर्वसामान्यांच्या जिभेवर सहज रेंगाळते !

प्रशांतनी घेतलेला हा निखळ मनोरंजनाचा वसाच त्यांना पुरस्कार मिळण्यासाठी नेहमीच पात्र ठरवीत आला आहे. आजतागायत प्रशांत दामले यांना वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत. ज्यामध्ये महाराष्ट्र राज्य पुरस्कार, नाट्यदर्पण पुरस्कार, भारतीय नाट्य परिषद यांच्याकडून मिळालेल्या पुरस्कारांचा समावेश आहे. मनोरंजन करत असताना प्रशांत दामलेंनी अनेक विक्रम नोंदवले आहेत. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये प्रशांत दामले यांच्या नावावर पाच वेगवेगळे रेकॉर्डस असल्याची नोंद आहे. एकाच दिवशी तीन विविध नाटकांचे पाच प्रयोग करणे असो किंवा ठराविक एका नाटकाचे हजार प्रयोग करणे असो, प्रशांत विक्रम करण्यामध्ये कधी अडकून राहिले नाहीत. त्यांनी त्यांची नाटकं महाराष्ट्रातील गावागावांमध्ये पोचवली नाहीत तर देशातील वेगवेगळ्या राज्यांतपर्यंत ते गेले. जगभरातील विविध बारा देशांमध्ये त्यांच्या नाटकांचे प्रयोग तर झालेच, पण सोबतच तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना रसिक प्रेक्षकांचे प्रेमही मिळाले.

प्रशांतचा रंगभूमीशी असलेला संबंध हा केवळ एक अभिनेता म्हणूनच नाही तर एक व्यवहारकुशल नाट्यनिर्माता म्हणूनही आहे. एखाद्या नाटकाचा प्रयोग करायचा आहे असं ठरवल्यावर नाटकाचे बुकिंग किती होणार?… कसे होणार ?… नाटकातील कलाकारांना किती पैसे द्यावे लागतील?… बरं, किती प्रयोग झाले म्हणजे नाटक नफ्यामध्ये चालेल?… ही सगळी व्यवहारी गणिते प्रशांत अगदी नेटाने सांभाळतात. आजपर्यंत त्यांनी केलेल्या नाटकांचा हिशोब त्यांना तोंडपाठ आहे. प्रशांतच्या मते, “ कलावंतांना कोणी पेन्शन देत नाही. कलावंतांचे म्हातारपणी काय हाल होतात… कलावंत जोपर्यंत रंगमंचावर उभे आहेत तोपर्यंत लोक त्यांना पैसे देतात. पण पुढे काय करायचं?… मग आता आपण आपल्या कामाचे पैसे मागितले तर काय बिघडलं?…” वरकरणी हा प्रशांत दामलेंचा व्यावहारिक सडेतोडपणा वाटत जरी असला, तरी हि व्यवहार कुशलता आहे. त्यांच्या नाटकांच्या यशस्वी प्रयोगांतून त्यांनी हे त्यांनी सिद्ध केलेले आहे.

नाटक तुम्हाला फक्त नावच मिळवून देत नाही, तर त्यातून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता, हे दाखवून देणारे प्रशांत दामले हे उत्तम उदाहरण आहे. आज नाटकांना प्रेक्षक मिळत नाही, असे चित्र एकीकडे असताना दुसरीकडे मात्र प्रशांत दामले यांची नाटकं ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड लावतात. याचे सारे श्रेय प्रशांतचा व्यवहारिक शहाणपणा, नियोजन आणि नीटनेटकेपणा याला जाते.

प्रशांत दामले हा फक्त कलाकारच नाही तर त्याच्या आत एक सहृदय माणूसही दडलेला आहे. कोरोना काळामध्ये बॅकस्टेजला काम करणाऱ्या लोकांसाठी त्यांनी बरेच कार्य केले. आपल्या टीम मधील लोकांना या काळात काम नसताना एखाद्या कुटुंब प्रमुख याप्रमाणे त्यांनी त्यांचे पालकत्व स्वीकारले. त्यांच्या पैशापाण्याची काळजी घेतली. निवृत्त सैनिकांच्या मदतीसाठी प्रशांतनी केलेले ‘गेला माधव कुणीकडे’ या त्यांच्या नाटकाचे तेवीस प्रयोग असोत, महाराष्ट्र शासनाच्या जल कार्यक्रमासाठी दिलेले एक लाख रुपये असोत किंवा चित्रपटात येणाऱ्या नवोदित कलाकारांसाठी केलेले कार्य असो प्रशांतमधील माणूसपणच यातून डोकावते.

2013 च्या दरम्यान प्रशांत दामले यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला. तेव्हा एका लग्नाची गोष्ट या नाटकाच्या प्रयोगांमध्ये ते व्यस्त होते. रिपोर्टनुसार त्यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये चार ब्लॉकेजेस असल्याचे आढळून आले. परिणामी त्यांचे ऑपरेशन झाले. पुढील पंधरा दिवसांसाठी नाटकाचे सर्व प्रयोग रद्द करण्यात आले. या घटनेनंतर प्रशांत दामलेंनी जरी कामाचा वेग कमी केला असला, तरी सातत्य मात्र टिकवून ठेवले आहे. त्याचेच पर्यवसन प्रशांत दामले रंगभूमीवरील ‘विक्रमादित्य’ अशी नोंद होण्यात झाले आहे.

एका नाटकाला तीन तास लागतात असा हिशोब जरी केला तरीदेखील प्रशांत दामलेंनी आजवर जेवढे नाट्यप्रयोग केले त्यासाठी 37 हजार 500 तासांचे योगदान रंगभूमीवर केले आहे. एकीकडे मराठी रंगभूमीकडे येणाऱ्या प्रेक्षकांचा ओढा आटत असताना त्याच रंगभूमीवर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं…’ हे खऱ्या अर्थाने दाखवून दिले आहे. अशा या विक्रमादित्य नाट्यकर्मी प्रशांत दामलेंनी आपल्या नाटकाचा १२५०० प्रयोग सादर करून, मराठी रंगभूमीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -