अभिनेत्री प्रिया बापट(Priya Bapat) ही तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते. आतापर्यंत तिने चित्रपट, मालिका, वेब सीरिज या माध्यमांतून विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. दरम्यान प्रियाने चाहत्यांना वेगळंच सरप्राईज दिलं. Indian Ocean या म्युझिक बँडच्या मुंबईतील कॉन्सर्टमध्ये चक्क प्रियाही जॉईन झाली. हा सगळा अनुभव तिने शेअर केला आहे.
प्रिया बापटने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती एका लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गाताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तिने एक पोस्टदेखील लिहिली आहे. प्रिया बापटने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “ही जादुई संध्याकाळ मी कायम जपून ठेवेन. इंडियन ओशन कॉन्सर्ट (Indian Ocean concert)मध्ये लाइव्ह गाणे सादर करेन अशी कल्पनाही केली नव्हती. माझ्या कॉलेजच्या दिवसांपासून ज्या बँडचे मी कौतुक केले आहे, ज्यांचे संगीत मला आवडते आणि ते मी जगले आहे, त्यांनी माझे खूप प्रेमाने स्वागत केले. एकच ग्रीन रूम शेअर करणे, त्यांना बॅकस्टेजवर भेटणे आणि संगीताबद्दलचे प्रेम एकत्र साजरे करणे हे स्वप्नवत होते. त्यांच्यासोबत त्या मंचावर उभे राहणे हा एक सन्मान होता, जो मी कधीही विसरणार नाही.
गर्दी ज्या प्रकारे नाचत होती, जल्लोष करीत होती, बरोबरीने गाणे गात होती ते पाहणे जादूई होते. त्यांचे संगीत ऐकत मोठे झालेले पालक आता त्यांच्या मुलांना त्यांची ओळख करून देत आहेत. या सगळ्याचा साक्षीदार होणे खूप खास होते. मला माझे स्वप्न जगू दिल्याबद्दल आणि 35 वर्षांपासून हृदयाला भिडलेल्या त्यांच्या अविश्वसनीय संगीताबद्दल मी या दिग्गजांची आभारी आहे. ती खरोखर आठवणीत ठेवावी अशी रात्र होती!”, असे लिहित शेवटी तिने इंडियन ओशन कॉन्सर्टला टॅग करत धन्यवाद म्हटले आहे.
View this post on Instagram
प्रियाने गायलेल्या गाण्याचा व्हिडीओ शेअर करत उमेशने त्यावर हार्ट इमोजी देत आपल्या बायकोचं कौतुक केलं आहे. प्रिया बापटला अभिनयासोबतच गाण्याचीही आवड आहे. मात्र पहिल्यांदाच तिला असं स्टेजवर म्युझिक बँडसोबत लाईव्ह परफॉर्म करताना पाहिलं. कलाकारांनीदेखील कमेंट करत अभिनेत्रीचे कौतुक केले आहे. तसेच चाहत्यांनी हार्ट इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त केले आहे.
Edited By : Nikita Shinde