HomeमनोरंजनPriya Bapat : चाळीतलं बालपण ते बॉलिवूडपर्यंत मजल मारणारी वर्सटाईल प्रिया

Priya Bapat : चाळीतलं बालपण ते बॉलिवूडपर्यंत मजल मारणारी वर्सटाईल प्रिया

Subscribe

विविध नाटकं, मालिका, चित्रपट आणि अगदी वेब सिरीजमध्येही आपल्या अभिनयाने दमदार कामगिरी करणारी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट. प्रसिद्ध अभिनेता उमेश कामतची पत्नी याशिवायदेखील तिची स्वतःची एक वेगळी ओळख आहे, हे काही नव्याने सांगायला नको. केवळ मराठी कलाविश्वात नव्हे तर बॉलिवूडमध्येही प्रियाच्या अभिनयाचं नाणं अगदी खणखणीत वाजतंय. अभिनयासह संगीताची आवड असणाऱ्या अन पत्रकारितेचं शिक्षण घेतलेल्या प्रियाविषयी अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या अनेकांना माहित नाहीत. आज आपण त्याच गोष्टींविषयी जाणून घेऊया. (Priya Bapat Some interesting facts about her career)

दादरच्या चाळीत गेलं बालपण

प्रिया बाबटचा जन्म 18 सप्टेंबर 1986 रोजी झाला. अत्यंत सामान्य कुटुंबात आणि दादरच्या चाळीत वाढलेली प्रिया लहानपणापासूनचं चुणचुणीत होती. स्वभावाला मनमोकळी असल्याने सिनेविश्वात प्रियाची ओळख ‘बबली गर्ल’ अशी आहे. आतापर्यंत प्रियाने ‘हॅपी जर्नी’, ‘टाईम प्लिज’, ‘आम्ही दोघी’, ‘काकस्पर्श’सारख्या अनेक मराठी चित्रपटांमधून विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. विशेष म्हणजे केवळ चित्रपट नव्हे तर ‘नवा गडी राज्य नवं’, ‘जर तर ची गोष्ट’ यांसारख्या मराठी नाटकांत आणि ‘सिटी ऑफ ड्रीम्स’, ‘आणि काय हवं’सारख्या दर्जेदार वेब सिरीजमध्येही तिने काम केलंय.

बालकलाकार म्हणून केलं पहिलं काम

आपल्याला वेगवेगळ्या कलाकृतींमध्ये दिसणाऱ्या प्रियाची अभिनय विश्वातील कारकीर्द लहानपणापासूनच सुरू झाली होती. होय. प्रियाने शाळेत असताना दूरदर्शनवरील ‘बंदीनी’ या मालिकेत पहिल्यांदा काम केले होते. या मालिकेत तिची भूमिका लहान होती. मात्र, यातून तिने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर अल्फा मराठी म्हणजेच सध्याच्या झी मराठी वाहिनीवरील लहान मुलांच्या ’दे धमाल’ मालिकेत ती दिसली. या मालिकेतून प्रियाला खऱ्या अर्थाने बालकलाकार अशी ओळख मिळाली.

पत्रकारितेतून पूर्ण केले शिक्षण

अभिनेत्री प्रिया बापटने लहानपणापासून अभिनयाला सुरुवात केली आणि हेच क्षेत्र करिअर म्हणून निवडले. परंतु फार कमी लोकांना माहीतेय की, प्रियाने पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. बारावीनंतर तिने पत्रकारितेसाठी प्रवेश घेतला आणि आपले शिक्षण पूर्ण केले आहे. घरच्यांनी आधी शिक्षण मग अभिनय अशी सक्त ताकीद दिल्यामुळे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रियाने स्वतःला अभिनय क्षेत्रात झोकून दिले.

अभिनयासोबत गायनाचीही आवड

प्रिया बापट ही उत्तम अभिनेत्री आहे, यात शंकाच नाही. पण यासोबत ती एक उत्तम गायिकादेखील आहे. प्रियाला लहानपणापासून गायनाची आवड होती. म्हणून तिने शुभदा दादरकर यांच्याकडून नाट्यसंगीताचे धडे घेतले. शिवाय प्रसिद्ध गायिका उत्तरा केळकर यांच्याकडे भक्तीगीते आणि भजनेसुद्धा शिकली. इतकेच नव्हे तर प्रियाने सारेगमप सेलिब्रिटी पर्वात सहभाग घेतला होता आणि आपल्या सुमधर आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले होते.

घरची स्टायलिस्ट

प्रिया बापट सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. या माध्यमातून ती विविध पोस्ट शेअर करताना दिसते. प्रियाच्या स्टाईलबाबत बोलू तेव्हढे कमी. कायम हटके आणि युनिक ड्रेसिंग फ्लॉन्ट करणाऱ्या प्रियाची स्टायलिस्ट आहे तरी कोण? अशी विचारणा अनेकदा केली जाते. तर प्रियाच्या आऊटफिट्सचे सगळे श्रेय तिची बहीण श्वेता बापटचे आहे. श्वेता एक उत्तम फॅशन डिझायनर असून ती आपल्या बहिणीच्या फॅशनची उत्तम काळजी घेताना दिसते.

फिटनेसबाबत सजग, तरीही वाढवलेलं 16 किलो वजन

प्रिया तिच्या फिटनेसबाबत कायम सजग असते. त्यामुळे चित्रपटाच्या कथानकानुसार वजन वाढवणे, कमी करणे यासाठी ती विशेष प्रयत्न घेते. प्रियाचा ‘वजनदार’ हा सिनेमा तुम्हाला आठवत असेलचं! या चित्रपटासाठी तिने तब्बल 16 किलो वजन वाढवलं होतं. पण चित्रपटानंतर तिने हे वाढवलेलं वजन कमीसुद्धा केलं. विशेष म्हणजे, या ट्रान्सफॉर्मेशनवेळी तिच्या शरीरावर एकही स्ट्रेच मार्क येणार नाही याची तिने आणि प्रशिक्षकांनी विशेष काळजी घेतली होती. याबाबत तिने स्वतःच एका मुलाखतीत म्हटले होते.

12 वर्षांनी मोठ्या मुलाशी केलं लव्ह मॅरेज

प्रिया बापट ही प्रसिद्ध अभिनेता उमेश कामतची पत्नी आहे. प्रिया आणि उमेश यांनी लव्ह मॅरेज केलंय, हे आपण जाणतोच. पण त्यांच्या वयात एकूण 12 वर्षांचे अंतर आहे, याविषयी फार कमी लोक जाणतात. दोघेही एकाच क्षेत्रात कार्यरत असल्याने सुरुवातीला त्यांच्या घरून लग्नासाठी विरोध होता. ज्यात वयाचे अंतर हादेखील एक महत्वाचा मुद्दा होता. पण दोघेही कुटुंबियांच्या परवानगीसाठी अडून राहिले आणि अखेर घरच्यांनी या लग्नाला संमती दिली.

मराठीच नव्हे तर बॉलिवूडमध्येही केलंय काम

अभिनेत्री प्रिया बापटने लहान वयातचं अभिनय क्षेत्रात पाय रोवण्यास सुरुवात केली होती. अगदी नववीत असतानाच बॉलिवूडच्या एका सुपरहिट सिनेमात तिने काम केले होते. या सिनेमाचे नाव आहे ‘मुन्नाभाई एमबीबीएस’. या सिनेमात संजय दत्त आणि अर्शद वारसीसारख्या कलाकारांसोबत तिने स्क्रीन शेअर केली. भूमिका भले लहान होती पण हा तिचा बॉलिवूड डेब्यू होता. मोठी स्टारकास्ट, नामांकित प्रॉडक्शन हाऊस आणि दिग्गज दिग्दर्शकासोबत काम करण्याची कमाल संधी तिला मिळाली.

वर्सटाईल प्रिया

मराठी रंगभूमीवर ’दादा एक गूड न्यूज आहे’ या नाटकाने रसिक प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळवले. या नाटकात उमेश कामत, हृता दुर्गुळे आणि आरती मोरे यांच्या मुख्य भूमिका होत्या. या नाटकाच्या माध्यमातून प्रिया बापटने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्यामुळे प्रिया ही अभिनेत्री, पत्रकार, गायिका आणि निर्मातीसुद्धा आहे. अशी ही प्रिया बापटची कलाविश्वातील कारकीर्द सुरूच आहे. विविध जॉनरच्या भूमिका साकाराताना गायन आणि निर्मिती क्षेत्रातदेखील तिचे योगदान आहे. त्यामुळे प्रिया बापटला वर्सटाईल प्रिया म्हटले, तर कुणाला वाईट वाटायचे कारण नाही.

हेही पहा –

Mukkam Post Devach Ghar : देवाचं घर – छोट्याशा जिजाचं भावविश्व दर्शवणारी ह्रदयस्पर्शी गोष्ट