देसी गर्ल प्रियांका करणार ‘ख्रिश्चन’ वेडिंग?

निक जोन्स आणि त्यांच्या कुटुंबियांच्या इच्छेखातर प्रियांका ख्रिश्चन पद्धतीनेसुद्धा लग्न करणार असल्याचं समजतंय.

Priyanka chopra and nick Jones will marry in both indian and christian style
देसी गर्लच्या विदेशी अदा (फाईल फोटो)

देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि निक जोन्स यांच्या ग्रँड वेडिंगकडे सध्या सगळ्या जगाचं लक्ष लागून राहिलं आहे. नुकतंच इटलीमध्ये दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहचं रॉयल वेडिंग पार पडलं. त्यानंतर आता संपूर्ण बॉलीवूडला वेध लागले आहेत ते प्रियांका आणि निकच्या लग्नसोहळ्याचे. मात्र, त्यासोबतच प्रियांका आणि निक नेमकं कोणत्या पद्धतीने लग्न करणार? याचीही सध्या जोरदार चर्चा आहे. प्रियांका हिंदू पंजाबी तर निक जोन्स ख्रिश्चन असल्यामुळे त्यांचं लग्न नेमकं कोणत्या पद्धतीने होणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. प्रियांकाने पारंपारिक भारतीय पद्धतीने लग्न करावे अशी माझी इच्छा असल्याचं तिच्या आईने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं. मात्र, एका वेबसाईटने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार प्रियांका दोन्ही म्हणजेच भारतीय आणि ख्रिश्चन पद्धतीने लग्न करणार आहे. प्रियांका आणि निक जोन्सचा विवाह राजस्थानच्या जोधपूरमध्ये संपन्न होणार असल्याचं आपल्याला ठाऊकच आहे. मात्र, आता हा शाही विवाह भारतीय आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने पार पडणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. प्रियांका निक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या इच्छेखातर ख्रिश्चन पद्धतीनेसुद्धा लग्न करणार असल्याचं समजतंय. मात्र, प्रियांका किंवा तिच्या टीमकडून याबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे चाहत्यांना आता वाट पाहावी लागणार आहे.


वाचा: दिल्लीच्या प्रदुषणाने प्रियांका झाली हैराण 

शाही डेस्टिनेशन वेडिंग

‘डेस्टिनेशन वेडिंग’ म्हणजेच एखाद्या खास ठिकाणी जाऊन लग्न करण्याची आपली इच्छा प्रियांका चोप्राने वारंवार बोलून दाखवली होती. त्यानुसार, १ आणि २ डिसेंबर या दोन दिवसांत प्रियांका आणि निक यांचा शाही विवाहसोहळा जोधपूरमध्ये पार पडणार आहे. जोधपूरच्या उमेद भवन राजवाड्यामध्ये प्रियांका आणि निकला साजेसा असा शाही विवाह सोहळा संपन्न होणार आहे. उपलब्ध माहितीनुसार, प्रियांकाने ख्रिश्चन वेडिंगसाठी एका जगविख्यात ब्रँडकडून आलिशान गाऊनही तयार करुन घेतला आहे. ३० नोव्हेंबरला संगीत सोहळ्याने याची सुरुवात होणार आहे. प्रियांकाच्या संगीत सोहळ्यात प्रियांका आणि निक स्वत:देखील धमाकेदार डान्स परफॉर्मन्स करणार आहेत. तर, निक खास प्रियांकासाठी रोमँटिक साँग गाणार असल्याची माहितीही मिळते आहे. काही दिवसांपूर्वीच प्रियांकाच्या अमेरिकेतील काही मित्रांनी आणि तिच्या सहकलाकारांनी तिच्यासाठी खास ‘ब्राईडल शॉवर’ पार्टीचं आयोजन केलं होतं. ज्याचे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले होते.

बॉलीवूडला नो एंट्री?

मध्यंतरी एका खासगी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, देसी गर्लच्या लग्नामध्ये सलमान खान, रणबीर कपूर, आलिया भट्ट, फरहान खान आणि कॅटरिना कैफ आदी सिनेस्टार्स सहभागी होणार होते. मात्र, आता या नव्या रिपोर्टनुसार विवाहसोहळ्यात केवळ प्रियांका आणि निकचे कुटुंबिय आणि काही निकटवर्तीयच उपस्थित राहणार आहेत. आता यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असणार हे नक्की.