प्रियांका चोप्रा शेवटची 2019 मध्ये फरहान अख्तरसोबत ‘स्काय इज पिंक’ या चित्रपटात दिसली होती. त्यानंतर अभिनेत्री बॉलिवूड सोडून हॉलिवूडमध्ये गेली. फरहान अख्तर दिग्दर्शित ‘जी ले जरा’ हा चित्रपट प्रियांकाचा कमबॅक चित्रपट असल्याचे बोलले जात होते, परंतु या चित्रपटाबाबत अद्याप कोणतेही अपडेट समोर आलेले नाही. आता ताज्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रियांका एसएस राजामौली यांच्या चित्रपटातून पुनरागमन करणार असल्याचं बोललं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ दिग्दर्शक एस एस राजामौली यांनी त्यांच्या आगामी चित्रपटासाठी प्रियांका चोप्राला कास्ट केले आहे. या चित्रपटात ती महेश बाबूसोबत दिसणार आहे. अद्याप चित्रपटाचे नाव जाहीर झाले नसले तरी या चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षी सुरू होणार आहे.
सूत्रांनुसार, चित्रपटाची स्क्रिप्ट अंतिम टप्प्यात आहे. पुढच्या वर्षीपासून त्याचे शूटिंग सुरू होणार आहे. एसएस राजामौली अशा अभिनेत्रीच्या शोधात होते जी केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध असेल. या भूमिकेसाठी प्रियंकापेक्षा अधिक चांगलं कोण असू शकेल ? सूत्रानुसार, दिग्दर्शकांनी गेल्या 6 महिन्यात प्रियांकाच्या अनेक गाठीभेटी घेतल्या आणि त्यानंतर त्यांनी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांका चोप्रा एसएस राजामौली सारख्या अनुभवी दिग्दर्शकासोबत काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे. महेश बाबूसोबत काम करणे हे प्रियांकाला एक नवे चॅलेंज वाटते. या चित्रपटात प्रियांका चोप्रा महेश बाबूसोबत अप्रतिम ॲक्शन करताना दिसणार आहे. तिच्यामते हे एक अतिशय चांगले लिहिलेले पात्र आहे आणि प्रियांकानेही या चित्रपटाची तयारी सुरू केली आहे.
चित्रपटाचे शूटिंग 2026 च्या शेवटपर्यंत सुरू राहणार असून 2027 मध्ये हा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. हा चित्रपट जगभर प्रदर्शित व्हावा याकरता राजामौली यांनी सोनी, डिस्ने यांच्याशीही चर्चा केली आहे. महेश बाबूच्या या चित्रपटाचे चित्रीकरण भारत, अमेरिका आणि आफ्रिकेत होणार आहे.
हेही वाचा : Weight Loss : वेटलॉससाठी ना जीम, ना डाएट फक्त योगासनं
Edited By – Tanvi Gundaye