सध्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. येत्या 12 जुलैला हे दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाचे अनेक विधी सध्या सुरू आहेत. हल्लीच त्यांचा हळदी समारंभ पार पडला. या समारंभासाठी अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती आणि त्यांनी अगदी धमालदेखील केली. नुकताच या समारंभातील राधिका मर्चंटचा लूक समोर आला आहे. ज्यात ती खूप सुंदर दिसतेय.
राधिकाने आपल्या हळदी समारंभासाठी पिवळ्या रंगाचा लेहंगा घातला आहे. परंतु, हा लूक अजिबात साधा नाही कारण या लूकसाठी राधिकाने खूप सुंदर आणि युनिक दुपट्टा घातला होता. राधिकाचा हा दुपट्टा खऱ्या फुलांपासून बनवलेला होता. या दुपट्ट्याला फ्लोरल जाल दुपट्टा म्हटलं जातं.
पण हा ट्रेंड मार्केटमध्ये आणणारी राधिका नव्हे. राधिकाच्या आधीही अनेक ब्राइडसनी फ्लोरल जाल दुपट्टा आपल्या लग्नासाठी परिधान केला होता. खरंतर आतापर्यंत कुठल्याच सेलिब्रिटींनी हा ट्रेंड रिक्रिएट केला नव्हता त्यामुळे हा जास्त चर्चेत नव्हता. पण आता खुद्द अंबानींच्या भावी सुनेने याला ट्रेंडमध्ये आणलंय त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात हा थोड्याच अवधीत पॉप्युलर होईल.
काय आहे फ्लोरल दुपट्टा ?
हा दुपट्टा पूर्णपणे फुलांपासून बनवला जातो. खासकरून याला मोगऱ्याच्या फुलांपासून बनवले जाते. या फुलांच्या कळ्या सफेद रंगाच्या असतात, ज्याने दुपट्ट्याचे जाळ अर्थात मधला भाग बनवला जातो. आणि याची बॉर्डर अनेक वेगवेगळ्या रंगीत फुलांनी बनवली जाते. हा दुपट्टा विशेषकरून मेहंदी आणि हळदी समारंभासाठी घातला जातो. जो नवरीला वेगळा आणि रिच लूक देतो.
कुठे उपलब्ध होईल ?
हा दुपट्टा मिळणं तसं सोप्पं आहे. परंतु हा ताबडतोब मिळू शकत नाही. हा दुपट्टा स्पेशल ऑर्डर देऊन सहज बनवला जाऊ शकतो. हा दुपट्टा कोणत्याही फ्लोरिस्टकडून तुम्ही बनवून घेऊ शकता. परंतु हा ट्रेंड नवीन असल्यामुळे आम्ही तुम्हाला सुचवू इच्छितो की तुमच्या फ्लोरिस्टला एकदा या दुपट्ट्याचा फोटो दाखवा.
कसा बनवला जातो फ्लोरल जाल दुपट्टा ?
हा दुपट्टा मोगऱ्याच्या कळ्यांपासून बनवला जातो. याची खासियत ही आहे की ही फुलं एकमेकांत चांगल्या पद्धतीने गुंफली जातात. आणि ते पारंपरिक लूकसुद्धा देतात. ही फुलं एकमेकांशी चटईप्रमाणे बांधली जातात. आणि ओढणीप्रमाणे यांची लांबलचक जाळीदेखील करण्यात येते. ही भारतीय सभ्यतेची झलक दाखवणारी कलाकृती आहे.
महाराष्ट्रीय नवरींनीदेखील ट्राय केला ट्रेंड
महाराष्ट्रीय महिला जेव्हा नऊवारी नेसतात तेव्हा त्या नऊवारीसोबत फ्लोरल जाल दुपट्टादेखील परिधान करतात. हा दुपट्टा केवळ त्या एका हातावर घेतात. या दुपट्ट्याचेही वेगवेगळे प्रकार हल्ली मिळू लागले आहेत.