HomeमनोरंजनRahul Solapurkar : मराठी अभिनेत्याला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेलं ते विधान भोवणार?

Rahul Solapurkar : मराठी अभिनेत्याला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेलं ते विधान भोवणार?

Subscribe

उभ्या महाराष्ट्राचे आद्यदैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटना नव्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी आणि रोमांचित करणाऱ्या आहेत. त्यामुळे हा जाज्वल्य इतिहास आजच्या पिढ्यांनाही माहित व्हावा, म्हणून अनेक सिनेदिग्दर्शक प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत अनेक दिग्गज निर्माते आणि दिग्दर्शकांनी इतिहासातील सुवर्ण पाने रुपेरी पडद्यावर उलघडली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील असेच एक महत्वाचे पान म्हणजे आग्र्याहून सुटका. (Rahul solapurkar controversial statement about chhatrapati shivaji maharaj)

औरंगजेबाच्या कैदेत आयते सापडलेले राजे अक्षरशः नजरकैदेत होते. असे असूनही युक्ती लढवून त्यांनी औरंगजेबाच्या हातावर तुरी दिली आणि आग्र्याहून सुटका मिळवली. यासाठी त्यांनी आखलेले डावपेच तुम्ही पाठ्यपुस्तकात, गोष्टींमध्ये वाचले वा ऐकले असतील. प्रकृती अस्वास्थ्याचे सोंग, आग्र्यासह आसपासच्या भागातील ब्राह्मण, साधू संतांना व मौलवींना फळे वाटणे, औरंगजेबाच्या सरदारांना लाच देणे आणि मिठाई- फळांच्या पेटाऱ्यात बसून पळून जाण्यापर्यंतचा त्यांचा पराक्रम बऱ्याच ऐतिहासिक पुस्तकांमध्ये लिहिलेला आढळतो. या संदर्भात अलीकडेच ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी दावा केलाय, ‘पेटारे बिटारे असं काही नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या सरदारांना लाच देऊन आग्र्याहून सुटून स्वराज्यात परतले होते’. त्यांच्या या वक्तव्यावरून सध्या मोठा वाद निर्माण होताना दिसतोय. अभिनेत्याला सोशल मीडियावर ट्रोलदेखील केलं जातंय.

राहुल सोलापूरकर काय म्हणाले?

अभिनेते राहुल सोलापूरकरने अलीकडेच एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली होती. ज्यात त्यांनी म्हटले, ‘पेटारे- बिटारे असं काही नव्हतंचं. छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्याहून सुटून आले होते. त्यासाठी त्यांनी किती हुंडा वटवला याचे पुरावेसुद्धा आहेत आणि ते आपल्याकडेच आहेत. त्यांनी औरंगजेबाचा वजीर आणि अगदी त्याच्या बायकोलासुद्धा लाच दिली होती’.

‘मोहसीन खान की मोईन खान नामक एका सरदाराकडून सही- शिक्क्याचं अधिकृत पत्र महाराजांनी घेतलेलं आणि त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवत ते आग्र्यातून बाहेर पडले. शेवटी स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन आग्र्यातून बाहेर पडले. याची खूण आणि पुरावेदेखील आपल्याकडे आहेत. मुख्य म्हणजे परमानंदांकडेसुद्धा परवानगी होती. मात्र, हा सगळा इतिहास गोष्ट स्वरुपात सांगायचा म्हटलं की थोडे रंग भरून सांगावे लागतात. पण या नादात इतिहासाला छेद दिला जातो’.

अभिनेत्याला ते विधान भोवणार

अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या दाव्यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावर अनेकांनी अभिनेत्यावर निशाणा साधला आहे. लोकांची नाराजी पाहता अभिनेत्याला हे विधान भोवण्याची शक्यता आहे. अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या कारकिर्दीविषयी सांगायचे झाले तर, त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये साकारलेली खलनायकी पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. यापैकी महेश कोठारे दिग्दर्शित ‘थरथराट’मधील त्यांनी साकारलेला ‘टकलू हैवान’ सर्वत्र गाजला. इतकेच नव्हे तर अनेक लोक आजही त्यांना ‘टकलू हैवान’ याच नावाने ओळखतात.

हेही पहा –

Upcoming Marathi Movie : ॲक्शनने परिपूर्ण महादेव सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज