बॉलीवूड सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रेक्षकांना कायम हसवणाऱ्या कलाकाराच्या डोळ्यात आज अश्रूंनी जागा घेतली आहे. राजपाल यादव यांचे वडील नौरंग यादव यांचे दुःखद निधन झाले असून अभिनेत्याच्या डोक्यावरील पितृछत्र हरपले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून ते प्रकृती अस्वास्थ्याने त्रासले होते. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारांना यश आले नाही आणि अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
यादव कुटुंबावर शोककळा
अभिनेते राजपाल यादव हे इतर कुणाहीपेक्षा वडिलांच्या अधिक जवळ होते. आपल्या वडिलांची प्रकृती खालावल्याचे समजले तेव्हा राजपाल यादव आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी थायलंडमध्ये होते. मात्र, वडिलांची तब्येत गंभीर असल्याचे कळताच ते तात्काळ दिल्लीत पोहोचले. त्यानंतर काही तासांतच उपचारादरम्यान त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि संपूर्ण यादव कुटुंब शोकसागरात बुडाले. त्यांचे इतर नातेवाईक आणि मित्र परिवार त्यांच्या दुःखात सहभागी आहेत. शिवाय सोशल मीडियावर ही बातमी पसरताच चाहत्यांनी देखील दुःख जाहीर करत आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
मूळ गावी होणार अंत्यसंस्कार
राजपाल यादव यांचे वडील नौरंग यादव यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार केले जातील. उत्तर प्रदेशातील शाहजहापूर हे त्यांचे मूळ गाव आहे. पितृछत्र हरपल्याने राजपाल अक्षरशः कोलमडून गेले आहेत. वडिलांच्या अगदी जवळ असल्यामुळे राजपाल यांना त्यांचा मोठा आधार होता. 2021 साली राजपाल यादव यांनी आपल्या नावात वडिलांचे नाव अॅड केले होते. आजपासून राजपाल यादव नाही तर राजपाल नौरंग यादव असे पूर्ण नाव सगळीकडे घेतले जाईल, असे त्यांनी निक्षून सांगितले होते.
मी राजपाल यादवला नौरंग यांच्यासमोर समर्पित करतो
एका मुलाखतीवेळी अभिनेता राजपाल यादव यांनी वडिलांविषयी बोलताना केलेले वक्तव्य बरेच चर्चेत राहिले होते. ते म्हणाले होते की, ‘सगळेच आपल्या वडिलांसाठी काही ना काही करतात. आपण आपल्या वडिलांसाठी काय करु शकतो? असं मला कायम वाटायचं. पासपोर्टवर माझं जे नाव आहे राजपाल नौरंग यादव ते पाहून मला हे सांगावं वाटतं की, मी राजपाल यादवला नौरंग यांच्यासमोर समर्पित करतो’. त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून वडिलांवरील प्रेम आणि आदर दोन्ही दिसून आले होते.
हेही वाचा : Jaat Movie : सनी देओलच्या जाट सिनेमाची रिलीज डेट जाहीर
Edited By – Tanvi Gundaye