HomeमनोरंजनRam Gopal Varma : राम गोपाल वर्मांना तुरुंगवासाची शिक्षा, कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट...

Ram Gopal Varma : राम गोपाल वर्मांना तुरुंगवासाची शिक्षा, कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी

Subscribe

बॉलीवूड कलाविश्वातील नामांकित दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या ‘सिंडिकेट’ या नव्या सिनेमाची घोषणा होण्यापूर्वीच ते कायदेशीर अडचणीत सापडल्याचे समजत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 7 वर्षांपासून रखडलेल्या चेक बाउन्सप्रकरणी मुंबईतील एका न्यायालयाने त्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. मंगळवारी (21 जानेवारी) अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टाने या प्रकरणी निर्णय देत राम गोपाल वर्मा यांना 3 महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. हा निकाल जाहीर करतेवेळी राम गोपाल वर्मा न्यायालयात हजर नव्हते. मात्र अजामीनपात्र वॉरंट जारी झाल्याने वर्मांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

राम गोपाल वर्मांना अटक होण्याची शक्यता

अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टाने गेल्या 7 वर्षांपासून रखडलेल्या चेक बाऊन्स प्रकरणी अखेर निकाल दिला. मात्र, यावेळी राम गोपाल वर्मा न्यायालयात हजर नव्हते. तरी अंधेरी कोर्टातील दंडाधिकाऱ्यांनी हे प्रकरण निकालात काढत वर्मा यांना 3 महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तसेच वर्मा सुनावणीसाठी गैरहजर राहिल्याने त्यांच्या अटकेकरता अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे साहजिकच राम गोपाल वर्मा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

नुकसान भरपाई दिली नाही तर..

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्याच्या कलम 138 अंतर्गत दोषी ठरवून न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. कोणत्याही कारणास्तव जर खात्यात पुरेसे पैसे नसतील आणि चेक बाऊन्स झाला तर या कलमांतर्गत न्यायालयीन कारवाई केली जाते. याप्रकरणी न्यायालयाने राम गोपाल वर्मा यांना 3 महिन्यांच्या आत तक्रारकर्त्याला 3.72 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, जर वर्मा यांनी नुकसान भरपाई दिली नाही तर त्यांना आणखी 3 महिने तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागेल. वर्मा यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याचे आदेश दिल्याने पोलीस त्यांना अटक करण्याची शक्यता आहे.

7 वर्ष रखडलेलं चेक बाऊन्स प्रकरण

गेल्या 7 वर्षांपासून रखडलेल्या चेक बाऊन्स प्रकरणी न्यायालयाने अखेर निकाल सुनावला. हे प्रकरण 2018 मधील आहे. हा चेक बाऊन्सचा खटला श्री नामक एका कंपनीने महेशचंद्र मिश्रा यांच्यामार्फतवर्मा यांच्या ‘कंपनी’ या फर्मविरोधात दाखल केला होता. या प्रकरणात जून 2022 मध्ये वर्मा यांना न्यायालयाने 5 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला होता. मात्र, आता न्यायालयाने थेट कारवाईचे आदेश काढल्याने वर्मा कैचीत सापडले आहेत.

राम गोपाल वर्मा यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर त्यांनी ‘सत्या’, ‘रंगीला’, ‘कंपनी’ आणि ‘सरकार’ असे हिट सिनेमे बॉलिवूड सिनेविश्वाला दिले आहेत. लवकरच ते आगामी सिनेमाची घोषणा करणार होते. ज्याचे नाव ‘सिंडिकेट’ असे आहे. याबाबत त्यांनी नुकतीच एक्स हॅण्डलवर पोस्ट करून माहिती दिली होती. मात्र, सिनेमाच्या घोषणेआधीच न्यायालयाच्या सुनावणीमुळे ते कायदेशीर अडचणीत सापडले असून पोलीस त्यांना अटकेत घेण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : Shah Rukh Khan : इंस्टाग्रामवर SRK ला इन्फ्लुएंसरकडून धोबीपछाड, नेमकं प्रकरण काय?


Edited By – Tanvi Gundaye