‘संजू’साठी रणबीर नाही तर ‘हा’ अभिनेता होता पहिली पसंती

संजय दत्तच्या जीवनावरील या चित्रपटात संजय दत्तची भूमिका रणबीर साकारत असून त्यानं खूपच चांगला संजय दत्तचा अभिनय केल्याचं सर्व बाजूनं म्हटलं जात आहे. या चित्रपटासाठी रणवीर सिंग ही आपली पहिली पसंती असून रणबीर कपूर संजय दत्तची भूमिका नीट साकारू शकेल का याबाबत मनात शंका असल्याचं निर्माता विधु विनोद चोप्रांनी एका मुलाखतीत स्पष्ट केलं आहे.

RANBIR AND RANVEER
रणवीर सिंग आणि रणबीर कपूर (सौजन्य - बिझनेस रेकॉर्डर)

रणबीर कपूरच्या ‘संजू’ची सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा आहे. संजय दत्तच्या जीवनावरील या चित्रपटात संजय दत्तची भूमिका रणबीर साकारत असून त्यानं खूपच चांगला संजय दत्तचा अभिनय केल्याचं सर्व बाजूनं म्हटलं जात आहे. पण रणबीर कपूर या भूमिकेसाठी पहिली पसंती नव्हताच, असं तुम्हाला सांगितलं तर? नक्कीच खरं वाटणार नाही ना? पण हेच खरं आहे आणि हे खुद्द चित्रपटाचा निर्माता विधु विनोद चोप्रानं सांगितलं आहे. मग पहिली पसंती कोण होता? हा प्रश्न पडणं साहजिकच आहे. तर या चित्रपटासाठी पहिली पसंती होता बॉलीवूडचा ‘बाजीराव’ अर्थात रणवीर सिंग.

मुलाखतीत केलं स्पष्ट

या चित्रपटासाठी रणवीर सिंग ही आपली पहिली पसंती असून रणबीर कपूर संजय दत्तची भूमिका नीट साकारू शकेल का याबाबत मनात शंका असल्याचं निर्माता विधु विनोद चोप्रांनी एका मुलाखतीत स्पष्ट केलं आहे. रणबीरपेक्षा रणवीर संजू जास्त चांगला साकारू शकेल असं त्यांचं मत होतं. पण चित्रपटाचे दिग्दर्शक मात्र ही भूमिका रणबीर कपूरच करेल यावर ठाम होते. पण चित्रीकरणाला सुरुवात झाल्यानंतर रणबीरला चोप्रानं बघितलं आणि राजकुमार हिराणींचं मत त्यांना पटलं. रणबीर कपूरनं या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत केली असल्याचंही त्यांनी यावेळी मान्य केलं आहे.

हुबेहूब संजय दत्त

रणबीर कपूर संजय दत्तच्या भूमिकेत अगदी हुबेहूब त्याच्याप्रमाणेच दिसत असून ट्रेलरमध्ये त्यानं केलेला अभिनय सध्या प्रेक्षकांना भावतो आहे. संजय दत्तची प्रत्येक लकब रणबीरनं योग्य तऱ्हेने अभ्यासली असून त्यानं ती तंतोतंत चित्रपटात उतरवण्याचा प्रयत्न केल्याचं बघायला मिळत आहे. हे सर्व रणबीरनं घेतलेल्या मेहनतीचं फळ असल्याचं या मुलाखतीमध्ये विधु विनोद चोप्रा यांनी नमूद केलं आहे.