रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूट प्रकरणी मुंबई पोलिसांकडून रणवीरला नोटीस

सूत्रांच्या मते, मुंबई पोलिसांची एक टीम नोटीस देण्यासाठी रणवीर सिंहच्या घरी गेली होती. परंतु तो घरी नसल्यामुळे ते नोटीस देऊ शकले नाही.

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह मागील काही दिवसांपासून त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. एका मॅगजीनसाठी त्याने हे फोटोशूट केलं होतं. यावेळी त्याने वेगवेगळ्या पोज दिल्या होत्या. ज्यामुळे सोशल मीडियावरही त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली, शिवाय काही जणांनी तर त्याच्या अतरंगी फोटोंवर मिम्स सुद्धा तयार केले. दरम्यान आता, रणवीर सिंहच्या समर्थन करण्यासाठी अनेक कलाकार त्याची पाठराखण करु लागले आहेत. शिवाय मागील काही दिवसांपूर्वी रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटवर मुंबईतील चेंबुर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मुंबई पोलिसांकडून रणवीर सिंहला नोटीस
दरम्यान, रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर होणारा विरोध पाहून मुंबई पोलिसांनी रणवीर सिंहला नोटीस पाठवली असून २२ ऑगस्ट रोजी रणवीर सिंहला पोलिस स्टेशनमध्ये बोलवण्यात आलं आहे. म्हणजेच आता रणवीरला २२ ऑगस्ट रोजी मुंबई पोलिसांसमोर आपली बाजू मांडण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये जावं लागणार आहे.

सूत्रांच्या मते, मुंबई पोलिसांची एक टीम नोटीस देण्यासाठी रणवीर सिंहच्या घरी गेली होती. परंतु तो घरी नसल्यामुळे ते नोटीस देऊ शकले नाही. त्यामुळे मुंबई पोलिस पुन्हा रणवीरच्या घरी जाऊन नोटीस देतील किंवा त्याला मेल करून नोटीस पाठवतील.

चेंबुरमधील एका स्वयंसेवी संस्थेने केली होती तक्रार
रणवीर सिंहने भारतीय संस्कृतीचे उल्लंघन केले तसेच महिलांच्या भावनाही दुखावल्याने चेंबुरमधील एका स्वयंसेवी संस्थेने रणवीर सिंह विरोधात चेंबुर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. त्या स्वयंसेवी संस्थेच्या मते, “भारत संस्कृतीचे जतन करणारा देश आहे. या देशातील प्रत्येकाला स्वातंत्र्याचा अधिकार आहे. भारतात अभिनेत्याला नायक म्हटले जाते. चाहते त्यांच्या लाडक्या कलाकारांना फॉलो करतात. त्यामुळे रणवीर सिंहने न्यूड फोटोशूट करू नये. असं तक्रारीत चेंबुरमधील स्वयंसेवी संस्थेने म्हटले होते. या संस्थेने रणवीर सिंहवर कलम २९२,२९३, ३५४ आणि ५०९, ६७अ हे कलम लावले होते.


हेही वाचा :राजू श्रीवास्तव यांच्यासाठी पुढील ७२ तास महत्वाचे, तब्येतीत किंचित सुधारणा, आयसीयूमध्ये बहीणीने बांधली राखी