सध्या सगळीकडे व्हॅलेंटाईन वीक सेलिब्रेट केला जात असून 14 फेब्रुवारी रोजी जगभरातील प्रेमी आपल्या पार्टनरसोबत व्हॅलेंटाईन-डे साजरा करतात. अनेक कलाकार देखील आपल्या पार्टनरसोबत हा दिवस साजरा करताना दिसतात. परंतु मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया त्यांचा व्हॅलेंटाईन-डे दोन दिवस आधीच 12 फेब्रुवारी रोजी साजरा करतात. खरं तर यामागे एक मजेशीर किस्सा आहे.
रितेश-जिनिलिया 12 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन-डे का साजरा करतात?
रितेश-जिनिलिया यांच्या प्रेमाचे अनेक किस्से सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. परंतु तुम्हाला माहित आहे का, हे दोघेही व्हॅलेंटाईन-डे 12 फेब्रुवारी रोजी का साजरा करतात? खरं तर सोमवारी,12 फेब्रुवारी रोजी जिनिलियाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती.
ज्यामध्ये तिने रितेशसोबतच एक फोटो शेअर करत, ‘आज आपला दिवस आहे. आपण व्हॅलेंटाईन-डे दोन दिवस आधी साजरा करतो.’असं लिहिलं होतं. तर रितेशने यावर प्रतिक्रिया देत ‘जिनिलीया तुझ्याबरोबर आयुष्य खूप सुंदर आहे…आपल्या प्रेमाची 22 वर्षे’ असं लिहिलं होतं.
खरं तर, रितेश-जिनिलियाने 12 फेब्रुवारी 2002 रोजी एकमेकांना आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यामुळे हे दोघेही त्यांचा व्हॅलेंटाईन-डे 12 तारखेला साजरा करतात. त्यानंतर 10 वर्ष या दोघांनी एकमेकांना डेट केलं आणि 2012 मध्ये लग्न केलं.