सध्या चित्रपटसृष्टीत एक नवीन चर्चा सुरू आहे. या नवं वर्षात मापुस्कर ब्रदर्स प्रेक्षकांसाठी एक खास भेट घेऊन येणार आहेत. चित्रपटसृष्टीतील अव्वल दर्जाचे दिग्दर्शक व निर्माते राजेश मापुस्कर आणि कास्टिंगच्या दुनियेतलं नावाजलेलं नाव रोहन मापुस्कर हे दोघे एक नवीन प्रकल्प घेऊन येत आहेत.
टीझर पाहून पुन्हा बालपणातल्या उन्हाळ्याच्या सुट्टीत गेल्याची अनुभूती मिळत असल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. एखादा कास्टिंग डिरेक्टर जेव्हा चित्रपट दिग्दर्शित करतो तेव्हा उत्सुकता वाढणं साहजिक आहे, पण त्याहीपेक्षा तो स्वतः दिग्दर्शित केलेल्या कलाकृतीतून कोणते चेहरे प्रेक्षकांसमोर आणणार, याबाबत जास्त उत्सुकता असते. थोडक्यात, टीझर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
राजेश मापुस्कर यांना ‘व्हेंटिलेटर’, ‘फरारी की सवारी’, आणि अलीकडेच प्रदर्शित झालेला ‘येक नंबर’ सारख्या हिट चित्रपटांसाठी ओळखलं जातं, तर रोहन मापुस्कर यांनी प्रख्यात दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांच्यासोबत ‘लगे रहो मुन्नाभाई’ व ‘३ इडियट्स’ या चित्रपटासाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मापुस्कर ब्रदर्स ‘एप्रिल मे ९९’ हा आगामी चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने रोहन मापुस्कर दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहेत.
तर आता प्रश्न असा आहे की, चित्रपटाची कथा काय असेल? कलाकार कोण असतील? यांसारख्या अनेक गोष्टी अद्याप गोपनीय असल्या तरी या नवीन वर्षात मापुस्कर ब्रदर्स एकत्र येऊन मोठ्या पडद्यावर धमाका करणार हे नक्की!
हेही वाचा : Swapnil Joshi : स्वप्नीलने नववर्षाची केली भक्तिमय सुरुवात
Edited By – Tanvi Gundaye