राजमौलींचा ‘आरआरआर’ ऑस्करच्या शर्यतीत! दाक्षिणात्य सिनेमा नव्या वळणावर

गेल्या काही दिवसांपासून आरआरआर या दाक्षिणात्य चित्रपटाचा बोलबाला असून या चित्रपटाच्या आणखी एका नव्या रेकॉर्डची चर्चा सुरू आहे. या चित्रपटाने ऑस्करच्या दिशेने वाटचाल सुरू केलीय. 'आरआरआर' चित्रपट देशाला ऑस्कर मिळवून देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

RRR_Oscar _Nomination
या चित्रपटाने आतापर्यंत अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावे केले आहेत. अशात हा चित्रपट आता ऑस्करच्या शर्यतीत उतरलाय.

गेल्या काही दिवसांपासून ‘आरआरआर’ या दाक्षिणात्य चित्रपटाचा बोलबाला असून याची चर्चा अगदी लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांच्याच ओठावर दिसून येतेय. या चित्रपटाने आतापर्यंत अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावे केले आहेत. प्रेक्षकांनीही या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतलंय. अशात हा चित्रपट आता ऑस्करच्या शर्यतीत उतरलाय. त्यामुळे राजमौलींचा आरआरआर चित्रपट भारताला ऑस्कर मिळवून देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

गेल्या काही महिन्यांपासून ‘आरआरआर’ या चित्रपटाने भारतात धुमाकूळ घातल्यानंतर परदेशातही आपली जादू दाखवत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये या चित्रपटाने बाजी मारली आहे. या चित्रपटाच्या ‘नाटू नाटू’ या गाण्याला मिळालेल्या गोल्डन ग्लोब अवॉर्डनंतर ‘आरआरआर’ला ‘क्रिटीक चॉईस मूव्ही अवॉर्ड’ मिळणे हे देखील सोन्याहूनही पिवळे ठरले आहे. त्याहूनही विशेष म्हणजे सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटाचा पुरस्कार मिळणे हे देखील या चित्रपटाचं मोठं यश आहे.

ज्या चित्रपटाचे देश-विदेशात कौतुक होतंय त्या चित्रपटाला भारताकडून मात्र अधिकृतरित्या ऑस्कर नामांकन मिळाले नसले तरी या चित्रपटाने ऑस्करच्या दिशेने आपला प्रवास सुरू केलाय. ज्युनियर एनटीआरशी संबंधित एक बातमी समोर येत आहे.ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ज्युनियर एनटीआरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीत नामांकन मिळू शकते, अशी चर्चा सुरू आहे. एसएस राजामौली यांनी स्वत: ऑस्करसाठी एक मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे आरआरआर’ ऑस्कर पुरस्कारांसाठी निवडण्यात येणाऱ्या ३०० चित्रपटांमध्ये घेण्यात आला होता, मात्र त्याचे अंतिम नामांकन अद्याप व्हायचे आहे. त्यामुळे आरआरआर चित्रपट देशाला ऑस्कर मिळवून देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.