Saturday, March 22, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनSai Tamhankar : समीर चौघुले आणि सई ताम्हणकरची हटके जोडी पहिल्यांदाच एकत्र

Sai Tamhankar : समीर चौघुले आणि सई ताम्हणकरची हटके जोडी पहिल्यांदाच एकत्र

Subscribe

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘गुलकंद’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. व्हॅलेंटाईन डेनिमित्त प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता समीर चौघुले झळकले होते. त्यांच्यातील गोड संवाद त्यांचे प्रेमळ नाते यातून पाहायला मिळाले. ज्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखीच वाढल्या. दोघांचं पहिल्यांदाच एकत्र काम करणं, हे मराठी चित्रपटसृष्टीसाठी खास ठरणार आहे. पहिल्यांदाच सई ताम्हणकर आणि समीर चौघुले ही हटके जोडी चित्रपटात एकत्र झळकणार असल्याने प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. (Sai Tamhankar shared screen with Samir Choughule for Gulkand movie)

समीर चौघुलेच्या भन्नाट विनोदी अंदाजासोबतच सई ताम्हणकरच्या अभिनयातील सहजता आणि वैविध्यता यांचा उत्तम मिलाप पाहायला मिळेल. सचिन गोस्वामी दिग्दर्शित आणि सचिन मोटे लिखित गुलकंद या चित्रपटात दोन भिन्न जोडप्यांच्या नात्यांचा प्रवास हलक्याफुलक्या पद्धतीने मांडला आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट व वेलक्लाउड प्रॉडक्शन्स निर्मित ‘गुलकंद’ हा फॅमकॉम चित्रपटात ढवळे आणि माने या दोन जोडप्यांच्या नात्यातील गंमतीदार क्षण, विनोदी संवाद, नोकझोक अशी मनोरंजनाची उत्तम मेजवानी पाहायला मिळेल. चित्रपटात सई ताम्हणकर आणि समीर चौघुले यांच्यासह प्रसाद ओक आणि ईशा डे या जोडीचा ही अप्रतिम अभिनय पाहायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai (@saietamhankar)

या चित्रपटाविषयी बोलताना समीर चौघुले म्हणाले, ‘सई आणि माझी ओळख ‘’फू बाई फू’’पासूनची आहे. त्यावेळी ती अँकर होती आणि मी स्पर्धक. त्यानंतर आम्ही वरचेवर भेटायचो. परंतु कधीच एकत्र काम केलं नव्हतं. हास्यजत्रेत हास्यरसिक म्हणून ती आमचे स्किट्स बघते, त्यावर प्रतिक्रिया देते. जवळ जवळ 900 एपिसोड्स तिने पाहिले आहेत. आता ‘’गुलकंद’’च्या निमित्ताने तिच्यासोबत काम करण्याचा योग आला आणि मी यासाठी खूप उत्सुक होतो. कामाच्याबाबतीत ती खूप मेहनती, अभ्यासू आहे. तिच्यासोबत काम करताना तिनेच मला खूप कम्फर्टेबल केले. सईकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. ती एक चांगली सह-कलाकार आणि चांगली मैत्रीण आहे’.

तर यावेळी बोलताना सई ताम्हणकरने सांगितले, ‘हास्यजत्रेत समीरला समोर परफॉर्म करताना पाहणं आणि त्याच्यावर टिप्पणी करणं नेहमीच आव्हानात्मक राहिलंय. कारण, त्याला कोणत्याही मान्यतेची गरज नाही. तो एक अप्रतिम अभिनेता आहेच आणि माणूस म्हणूनही तो तितकाच उत्कृष्ट आहे. त्याच्या कॅरॅक्टरसारखाच तो खूप भोळा आणि विनम्र असल्यामुळे आमचं खूप जमतं. सहकलाकार म्हणूनही त्याच्याबरोबर काम करायला खूप मजा आली. तो खरा जेंटलमॅन आहे आणि मला त्याच्यासोबत पुन्हा काम करायला नक्कीच आवडेल’.

हेही पहा –

Zee Marathi New Reality Show : सिटीत गाव गाजणार, झी मराठीचा चल भावा सिटीत शो येतोय प्रेक्षकांच्या भेटीला