बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर गेल्या 16 जानेवारी 2025 रोजी अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने हल्ला केला होता. ज्यात गंभीर जखमी झालेल्या अभिनेत्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. तब्बल 5 दिवस उपचार घेतल्यानंतर अखेर 21 जानेवारी 2025 रोजी अभिनेता घरी परतला. दरम्यानचे काही व्हिडीओ तसेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे व्हिडीओ पाहून एकीकडे सैफ अली खानची प्रकृती स्थिर असून तो घरी परतल्याचा आनंद साजरा केला जात आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी मात्र संशय व्यक्त केला आहे. नेमकं त्यांनी काय म्हटलंय याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
व्हायरल व्हिडीओवर उपस्थित केला सवाल :
पाच दिवस उपचार घेतल्यानंतर सैफ अली खान आपल्या घरी परततेवेळी गाडीतून उतरून चालत आपल्या इमारतीत जाताना दिसला. यावेळी त्याने जीन्स व पांढरे शर्ट घातले होते. त्याच्या हाताला पट्टी, मानेवर बँडेज दिसत होते. यावेळी सैफने त्याला पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांना हातसुद्धा दाखवला. मुख्य म्हणजे, त्याच्या चेहऱ्यावर वेदनेचा अंशही दिसत नव्हता. शिवाय तो अगदी व्यवस्थित चालत जाताना दिसल्याचे पाहून अनेकांनी विविध प्रश्न उपस्थित केले. यात शिवसेना पक्ष शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचाही समावेश आहे. त्यांनी सोशल मीडिया एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी संशय व्यक्त केला आहे.
संजय निरुपम यांची व्हायरल पोस्ट :
शिवसेना पक्ष शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘डॉक्टरांचं म्हणणं होतं की, सैफ अली खानच्या पाठीत 2.5 इंच आतपर्यंत चाकू घुसला होता. संभवत: आतचं अडकून राहिला होता. सलग 6 तास ऑपरेशन चाललं. ही 16 जानेवारीची गोष्ट आहे. आज 21 जानेवारी आहे. रुग्णालयातून बाहेर पडताच एव्हढा फिट? फक्त 5 दिवसांत? कमाल आहे!’ संजय निरुपम यांची एकंदरच पोस्ट पाहता त्यांनी संशय वजा प्रश्न उपस्थित केला आहे, हे अगदी स्पष्ट समजून येतंय.
पोलिसांचा दावा खरा आहे का?
दरम्यान एका नामांकित वृत्तवाहिनीशी संवाद साधतेवेळी संजय निरुपम यांनी उघडपणे म्हटले, ‘मला लिलावती रुग्णालयाच्या कार्यप्रणालीवर कोणत्याही प्रकारचे प्रश्न उपस्थित करायचे नाहीत. मात्र, त्या रात्री नेमके काय झाले? हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. त्या दिवशी रुग्णालयात आणताना सैफ अली खानची नेमकी परिस्थिती काय आणि कशी होती? त्याच्यावर नक्की किती वेळ ऑपरेशन सुरु होते. याबाबतची सविस्तर माहिती जनतेला कळायला हवी’.
याशिवाय हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी एकूण ३ जणांना अटक केली. यातील तिसरा आरोपी हाच खरा आरोपी आहे आणि तो मूळ बांगलादेशी नागरिक असल्याचे पोलिसांनी म्हटले. यावेळी असा प्रश्न उपस्थित राहतो की, पोलिसांचा हा दावा खरा आहे का? कारण असे असेल तर मुंबईत आधीच बांगलादेशी घुसखोरांचा मोठा प्रश्न आहे. त्यात हा आरोपी बांगलादेशी नागरिक असेल तर मुंबई पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. त्यांना लवकरच नव्याने अभियान सुरू करून बांगलादेशींना त्यांच्या देशात हुसकून लावावे लागेल. असे केले तरच आपली मुंबई सुरक्षित राहील.’
हेही वाचा : Myra Vaikul : बालकलाकार मायरा वायकुळच्या वाढदिवसानिमित्त नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
Edited By – Tanvi Gundaye