बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादला कस्टडीत घेतले आहे. मात्र, यापूर्वी पोलिसांनी छत्तीसगढच्या दुर्गमध्ये एका व्यक्तीला संशयित म्हणून अटक केली होती. त्यानंतर या व्यक्तीला सोडून देण्यात आले. तोवर या व्यक्तीच्या आयुष्यात बरीच उलथापालथ झाली होती. अभिनेत्यावरील हल्ल्याप्रकरणी अटक झाल्यामुळे या व्यक्तीला त्याच्या वैयक्तिक आयुष्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. अटकेनंतर या व्यक्तीने त्याची नोकरी गमावली असून ठरलेले लग्नसुद्धा मोडल्याचे समजत आहे. याप्रकरणी आता ही व्यक्ती न्याय मागते आहे. (Saif Ali Khan Attack Case kanoujia slam cops for ruined his life)
पोलिसांवर गंभीर आरोप
एका नामांकित वृत्त वाहिनीशी बोलताना या व्यक्तीने आपला राग व्यक्त केला आहे. त्याने म्हटलंय, ‘पोलिसांमुळे माझे संपूर्ण आयुष्य उध्वस्त झाले आहे. मला न्याय हवा आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे माझे संपूर्ण जीवन विस्कळीत झाले आहे. माझी नोकरी गेली. होणारी पत्नी आणि तिच्या कुटुंबाला बदनामीचा सामना करावा लागला. ज्यामुळे त्यांनी लग्न तोडले’.
पोलिसांकडून संशयित म्हणून अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आकाश कनौजिया (वय 31) असे आहे. तो ड्रायवर म्हणून काम करतो. मुंबई पोलिसांकडून माहिती मिळाल्यानंतर रेलवे सुरक्षा दलाने 18 जानेवारी रोजी दुर्ग स्टेशनवर मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस – कोलकाता शालीमार ज्ञानेश्वरी एक्सप्रेसमधून आकाशला अटक केली होती. त्यानंतर 19 जानेवारीच्या सकाळी मुंबई पोलिसांनी बांगलादेशी नागरिक मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याला अटक केली. ज्यानंतर दुर्गच्या रेलवे सुरक्षा दलाने आकाशला सोडून दिले.
नोकरी गेली, लग्न तुटलं..
याप्रकरणी बोलताना आकाश कनौजियाने म्हटले, ‘मीडियाने माझे फोटो दाखवायला सुरुवात केली. सैफ अली खान हल्लाप्रकरणातील मी मुख्य आरोपी असल्याचा दावा केला. या बातम्या पाहून माझ्या कुटुंबियांना धक्का लागला. ते रडू लागले. मुंबई पोलिसांच्या एका चुकीने माझे आयुष्य उध्वस्त केले. सैफच्या बिल्डिंगचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता त्यात दिसणाऱ्या व्यक्तीला मिशा नव्हत्या. पण मला मिशी आहे, या गोष्टीवर त्यांनी लक्ष दिले नाही. सैफवर हल्ला झाल्यानंतर मला पोलिसांनी फोन केला होता आणि विचारले ‘तू कुठे आहेस?’ ज्यावर मी ‘घरी आहे’ असे सांगितले आणि फोन कट झाला’.
पुढे सांगितले, ‘जेव्हा मला दुर्गमध्ये अटक झाली तेव्हा मी माझ्या होणाऱ्या पत्नीला भेटायला जात होतो. पोलिसांनी अटक केल्यानंतर ते मला रायपूरला घेऊन गेले. मग मुंबई पोलिसांची टीम तिथे आली. मला मारहाण करण्यात आली. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी मला सोडल्यानंतर आईने मला घरी यायला सांगितलं. त्यानंतर माझ्या आयुष्यात उलथापालथ सुरु झाली. ऑफिसमध्ये फोन केला तेव्हा मला कामावर येऊ नको असे सांगण्यात आले. कुणीच माझं ऐकून घेतलं नाही. माझ्या आज्जीने सांगितले, पोलिसांनी अटक केल्यामुळे मुलीकडच्यांनी लग्न तोडले. बराच काळ उपचार घेत असलेल्या माझ्या भावाचे निधन झाले. बदनामीमुळे माझ्या कुटुंबाला नाईलाजाने विरारमधील घर विकून कफ परेडमध्ये एका चाळीत रहावे लागले. माझ्याविरोधात कफ परेडमध्ये 2 आणि गुडगाव मध्ये 1 केस फाईल आहे. पण याचा अर्थ असा नव्हे की, मला संशयित म्हणून अटक करून वाईट अवस्थेत सोडून दिले जाईल’.
सैफकडे काम मागणार
याविषयी अधिक बोलताना कनौजियाने म्हटले की, ‘मी सैफ अली खानच्या घराबाहेर उभा राहीन आणि त्याच्याकडे नोकरी मागेन. कारण माझ्यासोबत जे काही झालं त्यामुळे मी सगळं काही गमावलं आहे. देवाची कृपा म्हणून माझ्या अटकेनंतर काही तासांतच आरोपी शरीफुलला अटक झाली. नाहीतर कदाचित मला आरोपी म्हणून सिद्ध केलं असतं आणि माझं आयुष्य आणखी बिकट झालं असतं’.
हेही पहा –
Box Office Collection : करोडोंचा गल्ला करूनही Emergency फ्लॉप होणार, आजादचे भविष्यही धोक्यात