सैफ अली खान होणार नागा साधू

सेक्रेड गेम्स या सिरीजच्या यशानंतर आता सैफ अली खान नव्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. या आगामी रिवेंज ड्रामामध्ये सैफ एका सुडाने पेटलेल्या नागा साधुची भूमिक करणार आहे. या नव्या अवतारात सैफला पाहण्यासाठी त्याचे फॅन्स उत्सुक आहेत

Saif Ali Khan
सैफ अली खान (सौजन्य डीएनए)

सेक्रेड गेम्स या ऑनलाइन सिरीजमुळे सध्या चर्चेत असणाऱ्या सैफ अली खानला अजून एक लॉटरी लागली आहे. बॉलीवूडचा एकेकाळचा चॉकलेट बॉय सध्या वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका करत असल्याचे पाहायला मिळत आहे. सैफदेखील मिळालेल्या संधीचे सोने करत आहे. सेक्रेड गेम्समधील त्याच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे. या सिरीजमध्ये नवाजुद्दीन भाव खाऊन जात असला तरी सैफने त्याची छाप पाडली आहे. आता सैफच्या वाट्याला अशीच एक आव्हानात्मक भूमिका आली आहे. या नव्या प्रोजेक्टमध्ये तो एका नागा साधूच्या भूमिकेत पहायाला मिळणार आहे. सैफ सेक्रेड गेम्समध्ये एका सरदारच्या भूमिकेत पहायला मिळाला. या भूमिकेसाठी त्याने दाढी आणि केस वाढवले होते. आता तो नागा साधूच्या भूमिकेसाठी मोठे केस वाढवत आहे. साधुंइतकी मोठी दाढी त्याने आता वाढवली आहे. नव्या चित्रपटाच्या टीमने सैफचा नवा लूक अद्याप गुलदस्त्यात ठेवला आहे.

१९८० च्या काळातला रिवेंज ड्रामा

सैफ अली खान नवदीप सिंग यांच्या आगामी रिवेंज ड्रामामध्ये दिसणार आहे. सिंग यांच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘हंटर’ असल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये सैफला नागा साधूची भूमिका साकारायला मिळत असल्यामुळे या विशिष्ट भूमिकेसाठी त्याने होकार दिला आहे. हंटर हा चित्रपट १७८० च्या काळावर आधारित आहे. त्यासाठी राजस्थानमध्ये जुना काळ दर्शवणारे सेट्स उभे करण्यात आले आहेत. चित्रपटाबाबत सैफ म्हणाला की, ‘या चित्रपटाविषयी जास्त विचार करु नका. नागा साधू कसे असतात? कसे राहतात? हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे या चित्रपटामध्ये माझा लूक कसा असेल याचा सर्वांनाच अंदाज असेल. चित्रपटाच्या कथानकाविषयी अधिक माहिती विचारल्यानंतर सैफने सांगितले की, ‘या चित्रपटामध्ये मी ज्या साधूची भूमिका साकारणार आहे तो साधू सूड घेण्याच्या भावनेने पेटून उठला आहे’, त्यामुळे एक नागा साधू या चित्रपटात अॅक्शन करताना पहायला मिळणार आहे.

राजस्थानमध्ये चित्रीकरण

हंटरच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. राजस्थानमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आले आहे. नागा साधूच्या भूमिकेसाठी सैफने कान टोचले आहेत. या भूमिकेसाठी सैफला मेकअपसाठी २ तास लागत असल्याची माहिती मिळाली आहे. सैफ अली खानला नागा साधूच्या वेशात पाहण्याची त्याच्या फॅन्सना उस्तुकता लागली आहे.