‘या’ व्यक्तीच्या सांगण्यावरून सलमान खानने बदलला प्रोफाईल पिक्चर!

सलमानप्रमाणेच रितेश देशमुख, कतरिना कैफ,करण जोहर या सारख्या कलाकारांनीही त्यांचे सोशल मीडियावरील प्रोफाइल बदलले आहेत.

salman khan leaving going bigg boss 13 show for health issue
बॉलिवूड अभिनेता सलमान खान

कोरोना विषाणूला हरवण्यासाठी आज सगळेच प्रयत्न करत आहेत. देशात लॉकडाऊनही जाहीर करण्यात आला आहे. या काळात प्रत्येक जण घरात राहून स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घेत आहेत. लोकांच्या सुरक्षेसाठी पोलीस आणि अन्य कर्मचारी दिवसरात्र झटत आहेत. त्यामुळेच ‘या योद्धांच्या सन्मानासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने सोशल मीडिया अकाऊंटवर डीपी म्हणून महाराष्ट्र पोलिसांचा लोगो ठेवा’, असं आवाहन राज्याचे गृहमंत्री यांनी केलं होतं. त्यानुसार अभिनेता सलमान खानने त्याच्या डीपीमध्ये बदल केला आहे.

या कोरोनाच्या काळातही पोलीस आपले कर्तव्य विसरलेले नाहीत. महाराष्ट्र पोलीस अहोरात्र काम करत आहेत, २४ तास सेवा बजावत आहे. एकीकडे सामान्य नागरिक घरात राहून स्वत:ची काळजी घेत आहेत. तर घराबाहेर या नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात आहेत. त्यामुळे सलमानने त्यांचे आभार मानण्यासाठी त्याचं फेसबुक प्रोफाइल बदललं आहे.

अनिल देशमुखांनी केलं होतं ट्वीट

“सदैव देशसेवेस कर्तव्यतत्पर असणारे पोलीस एकटे नाहीत हे अधोरेखित करण्यासाठी त्यांच्या सन्मानार्थ मी फेसबुक, ट्विटर व इन्स्टाच्या अकाऊंटवर डीपी म्हणून महाराष्ट्र पोलिसांचा लोगो ठेवणार आहे. तुम्हीही आपला डीपी ठेवून पोलीस बांधवांच्या सन्मानात सहभागी व्हा”, असं ट्विट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं होतं.

सलमाननेही बदललं प्रोफाईल

सलमानने फेसबुकप्रमाणेच इन्स्टाग्राम आणि ट्विटर त्याच्या प्रोफाइलमध्ये महाराष्ट्र पोलिसांचा लोगो लावला आहे. त्यामुळे सध्या चाहते त्याचं कौतुक करत आहेत. सलमानप्रमाणेच रितेश देशमुख, कतरिना कैफ,करण जोहर या सारख्या कलाकारांनीही त्यांचे सोशल मीडियावरील प्रोफाइल बदलले आहेत.