आता ‘संजू’ची येणार वेब सिरीज !

संजय दत्तच्या आयुष्यातले चित्रपटात न दाखवलेले पैलू, वेबसिरीजमध्ये दाखवण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

sanjay dutt web series
संजय दत्त (सौजन्य- इन्स्टाग्राम)

अभिनेता रणबीर कपूर याची मुख्य भूमिका असलेला ‘संजू’ सिनेमा बॉक्सऑफिसवर चांगलाच गाजला. तुफान लोकप्रियता मिळवलेल्या संजू सिनेमाने ३०० कोटींचा टप्पा गाठला. संजू चित्रपटाच्या भरघोस यशानंतर आता लवकरच संजू बाबाची ‘वेब सिरीज’ येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. चित्रपटाप्रमाणेच ही वेबसिरीज संजय दत्तच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणार असल्याचं समजतंय. इतकंच नाही तर संजय दत्तच्या खासगी जीवनातील जे पैलू संजू चित्रपटात दाखवण्यात आले नव्हते, असेही पैलू या वेबसिरीजमध्ये दाखवणार असल्याचं बोललं जात आहे. अभिनेता संजय दत्तचे चाहते या बातमीमुळे नक्कीच खुश झाले असणार यात काही शंका नाही.

न उलगडलेल्या पैलूंचं दर्शन ?

चित्रपटामध्ये बरीच दृष्यं तसंच अनेक डॉयलॉग्ज हमखास सेन्सॉरच्या कात्रीत सापडतात. मात्र, इंटरनेटवर प्रदर्शित होणाऱ्या कोणत्याही कलाकृतीला सेन्सॉरचं बंधन नसतं. त्यामुळे संजू चित्रपटाच्यावेळी कात्रीत अडकलेला पार्ट आता वेब सिरीजमध्ये पाहायला मिळणार का? असा प्रश्न अनेकांना पडलाय. दरम्यान ही वेबसिरीज तीन भागांमध्ये प्रदर्शित केली जाणार असल्याचं समजत आहे. संजू सिनेमाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता संजूच्या वेबसिरीजला लोक कितपत पसंती देतात, हे येणारी वेळच सांगेल.

घोडदौड सुरुच…

मोठ्या गाजावाजासह प्रदर्शित झालेल्या रणबीरच्या संजू चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम रचले. पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करण्याचा रेकॉर्ड संजूने आपल्या नावावर केला. प्रदर्शनानंतर पहिल्या ५ दिवसांत सिनेमाने जवळपास २०० कोटींची भरघोस कमाई केली होती. आजपर्यंत बॉक्सऑफिसवर जवळपास ३०० कोटींची कमाई केलेल्या ‘संजू’ चित्रपटाची घोडदौड अद्याप सुरुच आहे.