संस्कृती बालगुडेची ‘बेभान’ चित्रपटामध्ये एंट्री

ठाकूर अनुपसिंगचा मराठीतील पदार्पणाचा चित्रपट म्हणून बेभान या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटात आता अभिनेत्री संस्कृती बालगुडेची एंट्री झाली आहे. संस्कृती या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून, ११ नोव्हेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात “बेभान” प्रदर्शित होत आहे.

मधुकर ( अण्णा ) उद्धव देशपांडे आणि शशिकांत शीला भाऊसाहेब पवार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘झाला बोभाटा’, ‘भिरकीट’ असे उत्तम चित्रपट केल्यानंतर ‘बेभान’ हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट दिग्दर्शक अनुप जगदाळे घेऊन येण्यास सज्ज झाले आहेत. अनुप जगदाळे यांच्याच आगामी ‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटाचीही चित्रपटसृष्टीत कमालीची उत्सुकता आहे.

दिनेश देशपांडे यांच्या कथेवर बेतलेल्या बेभान या चित्रपटाची पटकथा नितीन सुपेकर यांची आहे. चित्रपटाचे छायांकन कृष्णा सोरेन यांचे असून संकलक म्हणून विजय कोचीकर यांनी जबाबदारी निभावली आहे. मंगेश कांगणे यांच्या लिहिलेल्या गीतांना ए व्ही प्रफुल्लचंद्र यांनी संगीतबद्ध केलं आहे. आजवर अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर ठाकूर अनुपसिंग मराठीत अभिनेता म्हणून पदार्पण करत आहे. अनुपसिंगनं बॉडीबिल्डिंगची मिस्टर वर्ल्ड ही स्पर्धा जिंकली होती. अनुपसिंग ठाकूर यांच्यासोबत अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, संस्कृती बालगुडे, स्मिता जयकर आणि अभिनेते संजय खापरे ह्यांच्या मुख्य भूमिका आहेत.

चित्रपटाच्या पोस्टरवरून बेभान हा रोमॅंटिक चित्रपट असल्याचा अंदाज बांधता येतो. मात्र अभिनेता ठाकूर अनुपसिंग असल्यानं चित्रपटात धमाकेदार अॅक्शनही पहायला मिळेल का, याची उत्सुकता आहे. तसंच मृण्मयी देशपांडे, संस्कृती बालगुडे या अभिनेत्री चित्रपटात असल्यानं ही प्रेमत्रिकोणाची गोष्ट आहे, की आणखी काही वेगळं पहायला मिळेल याची उत्तरं काहीच दिवसांत मिळतील. येत्या ११ नोव्हेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा :

‘या’ 6 सुपरहिट चित्रपटांनी रेखाला बनवलं सुपरस्टार